जोतिबांची टीका ब्राह्मण्यावर होती; ते ब्राह्मणांच्या सरसकट विरोधी नव्हते हे स्पष्ट करताना घाटे यांनी म्हटले आहे की, ‘ब्राह्मणवर्गातसुध्दा फुल्यांचे विचार समजणारे व त्यांची कदर करणारे पुण्यात थोडेच होते, पण होते. जे होते ते शंभर नंबरी सोने होते; त्या वेळच्या सुजाण हिंदू समाजाचे सर्वमान्य पुढारी होते. फुल्यांनी १८५१ साली मुलींची शाळा काढली. ख्रिस्ती नसलेल्या माणसाने काढलेली ही पहिलीच शाळा. तिच्या आठ जणांच्या कारभारी मंडळात सहा ब्राह्मण होते. त्यांत कृष्णशास्त्री चिपळोणकर प्रमुख होते. छोट्या शास्त्रीबुवांना फुले समजले नाहीत, पण मोठ्यांना समजले. बेटासे बाप सवाई ! होतो असा उलटा प्रकार कधकधी. फुल्यांनी महारमांगांसाठी शाळा काढल्या, त्यांच्या समितीवर बहुसंख्य ब्राह्मणच. अस्पृश्यांच्या एका शाळेस जागा मिळेना तेव्हा फुल्यांचे जिवलग ब्राह्मण मित्र व सहकारी रावबहादूर गोवंडे यांनी आपले घर दिले. धन्य ब्राह्मणवीराची.’ (दिवस असे होते, पृ.२७९)
न्यायमूर्ती रानडे, रावबहादूर विष्णु मोरेश्वर भिडे, विष्णुशास्त्री पंडित इत्यादी फुल्यांचे मित्र व सल्लागार होते असे सांगून घाटे यांनी अशी पुस्ती जोडली आहे की, ‘फुल्यांनी काढलेल्या अनेक शिक्षणसंस्थांचे सखाराम यशवंत परांजपे हे ब्राह्मण गृहस्थ खजिनदार होते. फुल्यांनी मुलींनी शाळा काढली ती बुधवारातल्या ब्राह्मण वस्तीत; विश्रामबागेशेजारच्या एका ब्राह्मणाच्या वाड्यात. त्या शाळेत मुली आल्या त्या ब्राह्मणांच्याच. कोल्हापूर प्रकरणात फुल्यांनीच टिळकांना दहा हजारांचा जामीन मिळवून दिला. टिळक-आगरकर सुटून आले तेव्हा फुल्यांनी त्यांचे मुंबईत व पुण्यात सत्कार केले.’ हा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद केवळ महाराष्ट्रातच नव्हता. गुजरातेत एक काळ वैष्णव पंथाचा प्रभाव होता पण स्वामी नारायण पंथाने त्यास मागे टाकले. स्वामी नारायण पंथ हा पटेल लोकांच्या प्रभावाखाली होता व आहे. पटेल हे उत्तम शेती करत, शिवाय ते व्यापारातही होते. व्यापार व उद्योगामुळे त्यांची भरभराट झाली. पुढील पिढ्यांत शिक्षण व संपत्ती वाढत गेली. आज अमेरिका व इतर अनेक देशांत पटेलांची संख्या मोठी आहे. ते व्यापारात आणि कारखानदारीत आहेत, तसेच डॉक्टर, इंजिनियरिंग इत्यादी क्षेत्रांतही आहेत. त्यांचा आश्रय असलेल्या स्वामी नारायण पंथाची मोठमोठ मंदिरे अनेक देशांत आहेत. सरदार पटेल यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काँग्रेसमध्ये यावे असे आवाहन करताना, मराठे बहुसंख्य असताना तीन टक्के ब्राह्मणांची त्यांना भीती वाटण्याचे कारण काय, असे विचारले होते. हे सांगताना गुजरातमधील त्यांच्याच पटेल समाजाचे उदाहरण त्यांच्यापुढे असले पाहिजे.
महाराष्ट्राप्रमाणे वा त्याहीपेक्षा अधिक तीव्र प्रमाणात तामिळनाडूमध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद होता. त्या काळात तामिळनाडूमध्ये आजच्या आंध्रचाही समावेश होता. यामुळे दोन्ही भागांतल्या ब्राह्मणेतरांत साधारणत: एकाच वेळी जागृती झाली. तामिळनाडू वा महाराष्ट्र यांत सरकारी उपाययोजनेमुळे शिक्षणाचा प्रसार होऊ लागला होता. त्याची गती व व्याप्ती मोठी नसेल, पण जी होती तिच्या मुळे ब्राह्मणेतर वर्गात शिक्षणाचा प्रसार होऊ लागला. तसेच नुसत्या शेतीवर अवलंबून न राहता, मराठा समाजातील अनेक जण व्यापार करू लागले आणि सरकारी कंत्राटे घेऊ लागले. पहिल्या महायुध्दाच्या काळात अशी अनेक कंत्राटे दिली जात होती. यामुळे मराठा समाजात ज्यास श्रीमंत म्हणता येईल असा वर्ग तयार होऊ लागला.
तामिळनाडूमध्ये नाडर, मुदलियार, चेट्टी इत्यादी याच रीतीने पुढे आले. त्यात नाडर हे ताडी काढणे व विकणे हा धंदा करत आणि यात त्यांची मिरासदारी स्थापन झाली होती. धान्याची वाहतूक व व्यापार यांही बाबतीत ते पुढे होते. रॉबर्ट हार्डग्रेव्ह यांनी द नाडर्स ऑफ तामिळनाडू, असा ग्रंथच लिहिला आहे. तामिळनाडूमधील ब्राह्मणेतर वर्गाचा इतिहास समजण्यास त्यामुळे मदत होऊ शकते. नाडर हे पूर्णत: अस्पृश्य मानले जात नव्हते. पण ताडीची विक्री करणारे कलाल असल्यामुळे, सार्वजनिक विहीरीवर पाणी भरण्यास बंदी इत्यादी निर्बध त्यांना लागू होते. रामनाड या भागात नाडर यांची वस्ती अधिक होती.
त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार होऊ लागला होता आणि व्यापारामुळे त्यांतले काही धनिक बनले होते. नाडर मंडळींनी ‘नाडर महाजन संगम ’ या संस्थेची स्थापना केली. तिने वाचनालय, शाळा इत्यादी चालवण्याचा कार्यक्रम राबवला. ही संघटना ब्रिटिश सरकारच्या साहाय्याने नाडर लोकांची उन्नती करण्याच्या धोरणाने चालत असल्यामुळे २० सालानंतर प्रातिक कायदेमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची हाक गांधीजीनी दिली, तिला संगमने प्रतिसाद दिला नाही. या समाजातील कामराज नाडर हे विशेष शिकू शकले नाहीत, पण ते सार्वजनिक कार्य करताना एस. सत्यमूर्ती या राजकीय पुढा-याचे साहाय्यक बनले आणि मग कामराज यांच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला, आणि कामराज यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला थोड्याच काळात संघटनचातुर्यामुळे काँग्रेसमध्ये ते चढत गेले.