कळंबे यांच्याकडे कराड तालुक्याप्रमाणे वाळवे व पाटण तालुक्यातील अनेक जण येत असत व त्यांच्या चर्चा सत्यशोधक समाजाच्या विचारांबद्दल होत असत.
कळंबे हे शिल्पकार होते व त्यांनी संगमरवरी मूर्तीही बनवल्या होत्या. यशवंतराव सांगतात की कळंबे हे स्थिर बुध्दीचे नसल्यामुळे एक काम चालू असता नवी कल्पना सुचली की ते तिचा पाठपुरावा करत. त्यांच्या विजयाश्रमात यशवंतरावांचे वडील भाऊ गणपतराव शिक्षणासाठी दाखल झाले. सत्यशोधक समाज व त्यातून निर्माण झालेली ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ यांमुळे महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर दूरवरचे परिणाम झाले होते; आणि म्हणून त्याचा जरा तपशिलात जाऊन परामर्श घेणे अगत्याचे आहे. ‘ब्राह्मणेतर संघ’ या नावाने एक संघटना १२डिसेंबर १९२० रोजी पुण्यात जेधे मॅन्शनमध्ये स्थापना झाली आणि राजकीय कार्य तिच्यातर्फे होऊ लागले. या संघाचे लोक सत्यशोधक समाजाशी निगडीत होते. सत्यशोधक समाज व ब्राह्मणेतर चळवळ हे वासाहतिक एक सांस्कृतिक बंड होते, असे वर्णन या विषयावर अभ्यासपूर्वक लिखाण करणा-या गेल ऑम्वेट यांनी त्यांच्या पुस्तकात केले आहे. या उठावाचे स्वरूप व परिणाम केव्हाही अभ्यसनीय ठरतात.
सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते महात्मा जोतिबा फुले. त्यांचा जन्म झाला १८२७ साली. म्हणजे मराठी राज्य संपुष्टात येऊन ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आल्यावर नऊ वर्षांनी. अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाली, यापूर्वी देशाच्या काही भागांप्रमाणे महाराष्ट्रात काही व्यक्ती, संघटना स्थापन करून निरनिराळी समाजसेवेची व जागृतीची कामे करत होत्या. जोतिबांनी बहुजन समाजात, विशेषत: स्त्रियांत, शिक्षणाचा प्रसार करण्यास प्राधान्य दिले. यासाठी त्यांनी १८४८ व ५१ या सालांत शाळा काढल्या. जोतिबा जातिभेदाचे विरोधक असल्यामुळे त्यांनी हरिजनांत शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरवून, दलित समाजातल्या मुलींसाठी १८५२ मध्ये शाळा काढून एक क्रांतिकारक पाऊल टाकले होते. ही शाळा जोतिबांच्या पत्नी सावित्रीबाई या चालवीत. हे आणखी एक क्रांतिकारक पाऊल होते.
उल्लेखनीय गोष्ट ही की, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या सुधारक विचाराच्या काही ब्राह्मणांची जोतिबांना या शाळांच्या बाबतीत मदत झाली होती. न्यायमूर्ती रानडे यांनी जोतिबांच्या शाळेला शिष्यवृत्तीसाठी काही रक्कम दिल्याचे भास्करराव जाधव यांनी नमूद केले आहे.
जोतिबांच्या जीवनात १८७३ साल हे बरेच महत्त्वाचे ठरले. याच वर्षी त्यांचे गुलामगिरी हे पुस्तक प्रसिध्द झाले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. पुराणादी ग्रंथांच्या रूपाने ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला असल्यामुळे इतिहासाचे सत्य स्वरूप मांडले पाहिजे असे जोतिबांचे प्रतिपादन या ग्रंथात आहे. त्यांचे कार्यक्षेत्र पुणे व मुंबई असे होते. जोतिबांना मराठा समाजातून पाठिंबा मिळू लागला होता, तसेच मुंबईत तेलगू, माळी समाजाचाही मिळाला. माळी समाजातले जोतिबांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांच्या साहाय्याने त्यांनी ‘ दीनबंधु ’ हे पत्र सुरू केले. त्यानंतर आठ वर्षानी हे पत्र कामगारांची संघटना बांधणा-या नारायणराव लोखंडे यांनी चालवायला घेतले. जोतिबांचा लोखंडे यांच्या कार्यात सहभाग होता. सत्यशोधक समाजाचे कार्य पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील ओतूर या बाजारपेठेच्या गावात सुरू झाले आणि तीन वर्षात जोतिबांनी शेतक-याचा असूड हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले. शेतकरी समाजाच्या दुर्धर आर्थिक व धार्मिक अवस्थेचे वर्णन यात आले आहेत, पण ही अवस्था का आली, याची मीमांसा करून ती सुधारण्यासाठी उपाययोजन यात सुचवली आहे.