यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व -११

जोतिबांच्या विचारांचा व कार्याचा आढावा घेऊन मे. रेगे यांनी केलेले विवेचन उल्लेखनीय आहे. रेगे लिहितात, “ जोतिबांच्या धर्मविषयक विचारांत अनेक काहीसे परस्पर विसंगत असे घटक आहेत. पण त्यांची तर्कशुध्द व सुसंगत बांधणी करण्याचे प्रयत्न त्यांनी केलेले दिसत नाहीत. जोतिबा स्वत:तत्तवेत्ते किंवा अभ्यासक नव्हते. ते कृतिशील समाजसुधारक होते. तेव्हा त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले तर समजू शकते. पण महाराष्ट्रात नवीन सामाजिक विचार मांडण्यात आला आणि त्याला अनुसरून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन करण्यात आले. पण एक सुसंगत आणि समावेश सामाजिक तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे प्रयत्न फारसे झाले नाहीत. आपले बौध्दिक जीवन क्षीण होते ह्याचे ही वस्तुस्थिती एक गमक आहे.” (विवेक आणि न्याय, पृ.५५.)

मुंबई १८८८ मध्ये बहुजनसमाजाची प्रचंड सभा भरून जोतिबांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. त्यानंतर दोनच वर्षांत त्यांचे निधन झाले. जोतिबांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य थोडे मंदावले होते. पण १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे म्हणून छत्रपती शाहू महाराज यांना पूर्ण अधिकार मिळाले. त्यांच्यामुळे बहुजनसमाजास एका प्रमुख नेत्याचा लाभ झाला. पुण्याची डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही संस्था ब्राह्मण पुढा-यांनी स्थापन केली होती. त्यांनी शाहू महाराजांची मदत मागितली असता महाराजांनी ती दिली होती. असे असले तरी थोड्याच काळात महाराजांनी सत्यशोधक समाजाचे धुरीणत्व अनौपचारिकरीत्या सांभाळल्यावर वातावरण बदलत गेले.
 
सत्यशोधक समाजाच्या कार्याला १९१० नंतर गती आलेली दिसेल आणि शाहू महाराजांचा सहभाग यातील महत्त्वाचा घटक होता. महाराजांनी बहुजनसमाजाला पुढे आणण्याचे अनेक प्रयत्न केले. मुख्यत: बहुजनसमाजात शिक्षणप्रसार व्हावा म्हणून त्यांनी केलेली कामगिरी लक्षणीय होती. महात्मा फुले व त्यांचे कार्य महाराज महत्त्वाचे मानत असत. शिवाय जोतिबांनी दलितांना अलगपणाची अन्याय्य वागणूक न देता त्यांना सामावून घेण्याचे धोरण स्वीकारले होते आणि महाराज ते नुसते मानत नव्हते, तर आचरणात आणत होते. पण जोतिबा व शाहू महाराज यांच्यात काही मूलभूत वृत्तिभेद. होता. मुख्य भेद होता तो वैदिक धर्मासंबंधी. शाहू महाराज जोतिबांप्रमाणे वैदिक धर्म त्याज्य ठरवत नव्हते, तर आपण हिंदू आहोत, क्षत्रिय आहोत असे अभिमानाने सांगत असत. यामुळे वेदाचा अधिकार आहे असे प्रतिपादून त्यांनी लोकमान्य टिळकांशी वाद घातला. जोतिबांनी पुरोहित वर्गाची  आवश्यकता नाकारून शंकराचार्याचा अधिकार अमान्य केला तर शाहू महाराजांनी शंकराचार्य हे पद न झिडकारता क्षात्रजगदगुरूंची नेमणूक केली आणि धार्मिक विधी मराठा पुरोहिताच्या मदतीने करण्याची प्रथा पाडली.
 
सत्यशोधक समाजाची प्रगती शाहू महाराजांमुळे वेगाने होऊ लागली. त्याचप्रमाणे बाबुराव व केशवराव जेधे यांचे प्रयत्न यास कारणीभूत झाले. भोर संस्थानातले कारी-आंबवडे हे जेधे कुटुंबाचे मूळ गाव. या कुटुंबाचा पूर्वज कान्होजी याने अफझलखानाच्या वधाच्या वेळी शिवाजीमहाराजांना साथ केली होती. त्याला सर्जेराव हा किताब देण्यात आला होता. या परंपरेचा वारसा जेधेबंधू बाळगत होते. यामुळे दोघेही भाऊ नेकजात म्हणून ओळखले जात. यांपैकी बाबुराव जेधे कुटुंबाचा कारखाना इत्यादी व्यवहार बघत असत. केशवरावांनी इंटरपर्यत शिक्षण घेतल्यावर ते सोडून सार्वजनिक कामात लक्ष घालण्यास सुरूवात केली. बाबुराव व केशवराव हे दोघेही महात्मा फुले यांच्या शिकवणुकीमुळे भारावले होते व त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कामास वाहून घेतले. यातच बाबुराव जेधे यांचा शाहू महाराजांशी परिचय झाला व महाराजांचा त्यांच्यावर विश्वास व लोभ जडला. पुण्यातले जेधे मॅन्शन हे सत्यशोधक समाजाचे मुख्य स्थान झाले आणि अनेक चळवळी व संस्था यांना त्याचा आश्रय मिळत गेला.

वेदोक्ताचा वाद हा सत्यशोधक समाजाच्या वाढीला चालना देणारा ठरला. मराठे हे क्षत्रिय असून ते त्रैवर्णिक असल्यामुळे त्यांना वेदोक्ताचा हक्क आहे असे मत, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी मांडले. लोकमान्य टिळकांनी त्यांचे मत खोडून काढण्यासाठी प्रतिवाद केला. नंतर शाहू महाराजांनी हाच वाद पुढे चालवला आणि मग ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांत कटुता निर्माण होईल असे वादंत माजले. वास्तविक हा वेदोक्ताचा अधिकार नाकारण्यात लोकमान्यंची चूक झाली होती. तेली तांबोळ्यांचे पुढारी असे लोकमान्यांना त्यांचे नेमस्त विरोधक हिणवून म्हणत असत. पण या वेदोक्ताच्या वादामुळे लोकमान्य ब्राह्मणांचे पुढारी झाल्याचा देखावा निर्माण झाला. हे असे व्हायला नको होते. पण मोठे लोकही काही वेळा गफलत करतात, त्याचा अनुभव आला. वस्तुत: विष्णुशास्त्री चिपळुणकरांनी महात्मा फुले यांच्यावर बरीच टीका केली होती. पण लोकमान्यांच्या या भूमिकेमुळे अधिक बिघाड झाला कारण ते लोकमान्य होते आणि सामान्य लोक त्यांना आपले नेते मानत होते.