यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ६-११०६२०१२

पत्र- ६
दिनांक ११-०६-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.


दिवस उन्हाळ्याचे व्हते.  सुगी संपलीती.  कैकाड्यांची बिर्‍हाडं आता बेंडाच्या तायाची जुळवाजुळव करण्यात दंग व्हती.  तवा आमी शिंदी भांडवलीच्या वरकड माळावर आमची पालं मांडली व्हती.  आठरापगड जातीची माणसं.  अस्वलवाला, दरवेशी, सांगंढोंग करणारे बहुरूपी.  तुकादादा त्यातलाच एक.  पांढराधुवार अंगरखा, पांढरंधुवाट धोतर, त्याच्यावर जाकीट आन् डोस्क्याला डावीकडं कलल्याली झोकदार टोपी.  पायात वहाना.  अगदी डिक्टो यशवंतरावच.  जोडीला आत्माराम.  धडधडीत देहाचा, पण स्वांग घेतलेलं इंग्रज पोलिसाचं, गुडग्यात पाय बांधल्याला.  त्यात एक पाय लंगडा आन् एक पाय चांगला.  हातात काठी, अर्धी खाकी चड्डी, अर्धा खाकी सदरा खोचलेला, कंबरला पट्टा आन् डोस्क्याला इंग्रज पोलिस घालत तसली टोपी, डोळ्याचा काचा नसलेला चष्मा.  दोगं गाव मागायला निगालते.  बा तुकादादाला म्हणाला, 'तुका, आज अगदी यशवंतरावावानी मोठा पुढारी झालायास.  काय बेत काय हाय ?'

दादा म्हणाला, 'दहिवडीला यशवंतरावांची सभा हाय नव्हं.'

'कवा ?'

'हाय आठ-दहा दिसांनी, कालच शिंदीतली पुढारी मंडळी बोलत व्हती.  तवापस्नं आपूनबी यशवंतरावांवानी कापडं करावीत म्हण दोन दिस म्या आन् आत्माराम सोंगाच्या तयारीला लागलू.  आता पांढरा धोतार लागायचं, तर गाठलं पाटलाला.'

'पाटलानं काय सांगितलं ?  आसं स्वांग कर ?'

'नाही बापूदा.  आरं, त्याच्याकडूनच घितली नव्हं पांढरी जुनी कापडं, टोपी, सदरा, धोतार, जाकीट.  सारं जुनं.  मंग गेलू वाड्याला.  येस्करानं सांगितलं, गावातल्या म्हारूड्यांत शिपायाची कापडं हाईत.  त्यालाबी गाठला.  आणली जुनी शिपायाची कापडं.  हिंगणबिटक्याची हिंगण हुडकून आणली बायकूनं.  दोन दिस रोज वड्याला धुवायची.  मंग झालं तयार.  रातच्याला तांब्यात कोळसं घातलं.  पोत्याव धोतार हातारलं.  फिरवला तांब्या, झाली इस्तरी.  काय मंग, बायकू म्हणाली, घ्या उधाला.  घडी करुन उशाला घितली.  टोपी तर लय झॅक झाली बग.  टाकं कशी काढल्यात.  यशवंतरावानी दिसलं  पायजेल ना ?

'आन वहाना रं ?'  बानं इचारलं.

'वहानांचं बी रामायण.  सिताबायच्या मालतीचा इट्टल हाय नव्हं, त्यानं सांगितलंय, त्याच्या बापाच्या चपल्या अगदी डिक्टू यशवंतरावांच्या चपल्यावाणी हायेत.  फॅशनच हाय तसली.  तसल्या चपला घातल्या का म्हणत्यात, यशवंतरावांवानी पायतानं कुठनं आणलीस गा ?  मंग गेलू पळत माळवाडीवर आन् जुन्यापान्या चपला मागितल्या.  तो माळी म्हंजी स्वातंत्रसैनिक.  त्यानं पायजे तशा काढून दिल्या.  बग, काटा फुटल्याला न्हाय आजून.'

'आन् ह्या शिपायाचा पाय का बांधलागा ?  आरं, त्यो सांजपवतोर मरंलना.'  बा म्हणला.

'आगा, पोटाला का बिबं घालील.  नुसता आकडून तर बांधलाया ना.  त्योबी चड्डीत.  काटी हाय की टेकायला.  त्यानं भार तर पडत न्हाय.  नुसता रडतुया.  आता स्वांग आनायचं म्हंजी दुकनारच की रं उलीसा.  काय आत्माराम ?'

'व्हय. व्हय आम्ही दोघांनी इचार केला.  माझा पाय पत्री सरकारनं कापलाय.'

'आसं हाय व्हय !' बा म्हणला.

'इंग्रजांचा शिपाई ना ?  लय अत्याचार करीत व्हते.  तवा यशवंतरावांनी डिक्टेटर म्हणून शिक्षा दिलीती पत्र्या ठोकायची.'