मी नुस्ता बगायचो. त्याज्या भन काय झाला ? म्या धडा करून हळूच गेणानानाला इचारलं,
'नाना, काय झालां वं ?'
'हात तुज्या आयचं, येडपाट, तुज्या तुला एवडं कळंना. आरं आपण मिळावला ना महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र. आजपास्नं आपलं राज्य झालं.'
तवा मला संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही भानगड समाजली. पण म्हंजी नक्की काय झालं ते समाजलं नाय. ते सांच्याला रेडिओ लावला ना ग्रामपंचायतीचा, तवा उमाजलं. सार्या गावात एकच रेडिओ. त्यो लागायचा सांच्याला. शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम म्हणून एक संगीत वाजायचं. ते संगीत ऐकलं का समजायचं, की ग्रामपंचायतीत गावकरी हायेत. मंग रेडिओ लागला की सारं गावं जमायचं बातम्या ऐकायला. फार छान ! गावच्या चावडीम्होरं माती असल्यानं पायांनी मैंदाळा धुरळा उडायचा. नाकातोंडात मातीच माती. पोरांची दांडगी रेटारेटी, मस्ती. एकमेकास्नी खाली पाडून वर बसायची. बारकी-मोठी पोरं दंगा चालू होता. ऐवढ्यात मोठ्या माणसांनी जीवाचं कान करून ऐकायला सुरुवात केली. आमच्या गावचा रेडिओ म्हणजे लय भारी. नुसता मांजरावानी गुरगुरायचा. त्यानं ऐकणारानं कितीबी कान नीट ठेवला तरी घरघर चालूच र्हायाची. पण आजचा दिस येगळाचं होता. सारं गावं जत्रंला जमावं तसं जमल्यालं. सारी बाया पोरं, गटागटानं बसल्याली. गडबड, गोंधूळ सारं बंद. पोरास्नी दाबून गप्प बसावल्यालं होतं. कालवा सरला. तिन्हीसांजा व्हायला आल्यत्या. दिस बुडाय निगालाता. लालभडक गोळा हळूहळू मावळतीला निगाला. सोन्यावाणी पिवळं धमक ऊन पाटलाच्या वाड्याच्या कौलावरनं घरंगळत चावडीम्हारं मुजरा घालीत होतं. तेवढ्यात रेडिवन बोलंन सुरू झालं.
'आकाशवाणी मुंबई, नंदकुमार कारखानीस आपणास बातम्या देत आहे...'
तसं सारी माणसं चिडीचिप बसली. संयुक्त महाराष्ट्र राज्याचं उद्घाटन ३० एप्रिल १९६० रोजी रात्री १२ वाजून १ मिनिटांनी भारताचे प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते मुंबईत झाले.'
मध्येच खरखर, घरघर. 'हात तुज्या आयला. ये ती बटान फिरव.' दुसरा म्हणाला.
'आल्याका सरपंच हे रेडिव बदला राव, ऐन टायमाला गचाकतुया.'
'गप ये, गप ये.' सारे ओरडू लागले. पुन्हा आवाज सुरू झाला.
'हा समारंभ राजभवनाच्या पटांगणात भव्य स्वरूपात झाला. संयुक्त महाराष्ट्राचा नवा नकाशा तयार करण्यात आलेला होता. विद्युतदीपांनी चमचमणार्या या नकाशावरील रेशमी आवरण पंडितजींनी बाजूला केले आणि टाळ्यांच्या गजराने भव्य शामियाना निनादून गेला. प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरूंना आणि उपस्थितांना नव्या महाराष्ट्राचे दर्शन घडले. याप्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी उपस्थित होत्या.'
झालं ! बोंबलला रेडिवचं कायच ऐकायला इना. सारे गावकरी गपगार बसून होते. आवाज खरखर करीत पुन्हा बोलू लागला.
'आनंदाला उधाण आले. कार्यक्रम निमंत्रितांसाठी होता. याप्रसंगी गानकोकिळा लता मंगेशकर यांनी महाराष्ट्र गीत गायले. पसायदानाने कार्यक्रम संपला. आम जनतेसाठी दुपारी शिवाजी पार्क मैदानावर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. लक्षावधी लोक या समारंभाला उपस्थित होते. राष्ट्रध्वज, मंगलवाद्ये आणि लोकांच्या उत्साहाने वातावरण भारावून गेले होते.'
''महाराष्ट्राने आता नव्या पर्वात पाउल टाकले आहे. मराठी भाषिकांचे मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो, आपली भावी वाटचाल समृद्ध व्हावी.'' असे विचार प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांनी व्यक्त केले. त्याचवेळी यशवंतराव चव्हाणांचे अत्यंत मनोहर असे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले, ''शेती, उद्योग व शिक्षण यावर भर देण्याचा प्रयत्न राज्याला शुभेच्छा देताना आपणास आश्वस्त करतो आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर या नररत्नांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जो वारसा आपल्या हाती दिला आहे. तो अमोल ठेवा समजून महाराष्ट्राची व देशाची सेवा करण्याचे व्रत आपण सर्वजण घेऊया. शेती आधारीत उद्योगावर उभी राहिलेली समाजव्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्राच्या जगन्नाथाचा हा रथ चालविण्यासाठी सर्वांचा हातभार लागावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आजच विधिमंडळातील सर्व लोकप्रतिनिधींनी यशवंतरावांची नवा मुख्यमंत्री म्हणून निवड केली. भाषणाचा सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात.''