यशवंतराव चव्हाण :
आठवण आणि आख्यायिका
लेखक : लक्ष्मण माने
---------------------------
Ebook साठी येथे क्लिक करा |
मनोगत
माझ्या जडणघडणीमध्ये तथागत गौतम बुद्ध, म. जोतिराव फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आहे. आणखी दोन माणसे, जी मी एकही दिवस विसरू शकत नाही, ज्यांनी माझे जीवन घडवण्यासाठी, माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी मला प्रेमाने आपल्याबरोबर राहू दिले त्यात एस. एम. जोशी आणि आदरणीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांचा फार मोठा वाटा आहे. चव्हाणसाहेबांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं मी पाहिलेले, ऐकलेले, वाचलेले यशवंतराव, मला भावलेले यशवंतराव इतरांनाही सांगावेत म्हणून हा लेखनप्रपंच केला आहे. वाचकांना तो भावला, यशवंतरावांच्या संबंधी त्यांचे कुतूहल जागृत झाले आणि साहेबांचे आयुष्य वाचक समजावून घेऊ शकले किंवा ते समजावून घेतले पाहिजे इतकी जरी वाचकांमध्ये जाणीव निर्माण झाली तरी माझे हे लेखन सार्थकी लागले असे मी समजेन.
यशवंतराव दलित साहित्याचे स्वागत करतात, समर्थन करतात. दलित उपेक्षितांच्या राजकीय हक्कांना सामाजिक बळ न लाभल्याने आपल्या समाजजीवनात जो विसंवाद, संकुचितपणा निर्माण झाला आहे त्याची दलित साहित्य ही अपरिहार्य फलश्रुती आहे असे ते मानत असत. दलित साहित्यिकांनी मराठी साहित्यक्षेत्रात मोलाची भर घातली आहे. उच्चभ्रू साहित्याचे किंवा त्यांच्या संकल्पनांचे मानदंड लावून दलित साहित्याला जोखणे बरोबर होणार नाही. उच्चभ्रू साहित्यात पाश्चात्त्य वळणाची अशिललता आपल्याला चालते, मात्र दलित साहित्यातून येणारी भाषा आपल्याला चालत नाही. तिच्या शुद्धाशुद्धतेची आपण टवाळी करतो. नाके मुरडतो. हा नैतिक भेदभाव आहे. दुहेरी मानदंडाची भावना त्यामध्ये आहे असे ते स्पष्ट सांगत. (ॠणानुबंध पृष्ठ क्र. २१०) दलित साहित्याच्या भाषेला अशिष्ट व ओंगळ ठरवणार्या समीक्षकांना कानपिचक्या देऊन यशवंतराव त्या भाषेचे समर्थन तर करतातच, शिवाय यातून मराठी भाषेला आणि समाजाला होणार असलेल्या संभाव्य फायद्यांचे सूचनही करतात. त्यांच्या मते भाषेचे माध्यम जर अभिव्यक्तीसाठी असेल तर तिचा सामाजिक अभिव्यक्ती हाही अविभाज्य भाग मानणे क्रमप्राप्त ठरते. हजारो वर्षे दडपल्या गेलेल्या समाजाचा पहिला उद्गार रूढ कल्पनेप्रमाणे असू शकत नाही. तशी अपेक्षाच अनाठायी आहे. उलट तो उद्गार निघाला हेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे आपण त्याचे स्वागत करायला पाहिजे असे ते मानत. उपेक्षित सामाजिक स्तरांच्या भावनांची कोंडी फुटून त्याचा उपयोग सामाजिक सुधारणांसाठी व सामाजिक प्रक्रियेसाठी होऊ शकेल अशी खात्री ते बाळगतात. (यशवंतराव चव्हाण राजकारण आणि साहित्य - भा.ल. भोळे, पृष्ठ १५०)
आदिवासी व उपेक्षित जाती यांची भाषा आता नव्या मराठी भाषेत येणार आहे. हे सामुदायिक चिंतन किंवा देवाणघेवाण भाषेच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्याने मराठी भाषा समृद्ध होईल. म्हणून दलित साहित्याची भाषा कदाचित वेगळी वाटेल, तरी तिचा कस, तिच्यातील रग जर नव्या मराठीत उतरली तर ती हवीच आहे. (ॠणानुबंध पृष्ठ क्र. २११)
कलावंताची तरल संवेदनशीलता, सर्जनशील प्रतिभा, शब्दशक्तीच्या समर्थ किमयेच्या क्षमतेचे परिपूर्ण भान, व्युत्पन्नमती आणि उदंड व्यासंग, साहित्याबद्दलची चोखंदळ जाण आणि साहित्य व समाज यांच्यातील अन्योन्य नात्याचे यथार्थ भान, चतुरस्त्र अनुभवसंपन्नता, आश्वासक समीक्षाबुद्धी इत्यादी दुर्मिळ गुणांचा समुच्चय यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांच्यातल्या कलावंत लेखकाने योजलेले अनेक आराखडे मनातल्या मनातच राहून गेले. ते पुरे झाले असते तर मराठीला ललालभूत ठरेल असे वाङ्मय त्यांनी मराठीला दिले असते.