अचानक गावांत चर्चा सुरू झाली. आम्ही काही दिवस निरगुडीला, काही दिवस सोमंथळीला, काही दिवस काजडबोरीला म्हंजे इंदापूरला राहत होतो. माझे आईवडील गाढवांच्या पाठीवरनं माती वहाण्याचं कामं करीत होते. अचानक वडिलांना, चुलत्यांना गाढवावर माती वाहण्याचं काम मिळालं. निरा नदीवर पूल होणार, बारमाही नदीवरनं पलिकडं जाता येणार. आन् महत्त्वाचं म्हंजे वाहतूक सुरू होणार. गावात चर्चाच चर्चा. यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. निरा नदीवर पूल होणार होता. गावात माणसांला कामं मिळणार होती. त्यानं सारीच गरीब माणसं आनंदून गेली होती. आमच्याही गाढवांना रोजगार मिळाला होता. आता फलटण-बारामती रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार. स्वातंत्र्याचा पहिला धडा सारेजण गिरवत होते. फलटणचे महाराज बांधकाम खात्याचे मंत्री होते. बगता बगता कामांनी गती घेतली. पिलन उभे रहायला लागले. नदीत उभे राहणारं हे काम पाहायला माणसांची मोठी गर्दी व्हायची. मी तर शाळेला दांड्या मारून काम करू लागलो. आता मी बराच कळीत झालो होतो. बगता बगता पुलाचं काम आकाराला येऊ लागलं. स्लॅब पडला. सांगवी, सोमंथळी, शिरवली, अलिकडची सांगवी, सार्या गावात एकच चर्चा होती. यशवंतरावांनी पिढ्यांची सोय केली. दोन तालुके जोडले. दोन जिल्हे जोडले. पाउसकाळात होणारी कोंडी फुटली. हाताला कामं मिळाली. दोन येळा चूल पेटाया लागली. सारी गोरगरीब रयत यशवंतरावांना प्रेमानं 'साहेब' म्हणू लागली. सायबानं रस्ता केला. सायबानं पूल बांधला. फलटण-बारामती जोडलं गेलं. पुलाचा स्लॅब झाला आन् आम्ही पोरं पुलावरनं नुसतं पळत सुटायचो. बगता बगता वाहतूक सुरू झाली.
या पुलावरनं आठवलं म्हणून सांगतो, एकदा नदीला मोठा पूर आला होता. तुझे बाबा फार धाडसी. ते काही कामासाठी फलटणला आले होते. जीप होती तेंव्हा त्यांच्याकडे. ड्रायव्हिंगही तेच करीत होते. नदीला पाणी वाढलेलं. पुलावरनं पाणी वाहू लागलं होतं. पुलाचे लोखंडी कठडे तेवढे दिसत होते. साखळीला पाणी लागलं होतं. पूर केव्हा ओसरेल माहिती नाही. तुझ्या बाबांची जीप पुलाजवळ आली. गाडीतून खाली उतरले, अंदाज घेतला. सारे गावकरी त्यांना विनवत होते, आसलं नाही ते धाडस करू नका. पुरात गाडी घालू नका. पण शारदाबाईंचा हा तरणाताठ पोरगा कोणाचं ऐकेना. घातली ना त्यांनी पाण्यात गाडी. काळजाचा ठोका चुकावा आसं हे अचाट धाडस. माणसं दोन्ही बाजूला पुलावर श्वास रोखून बगत होती. तरणी पोरं प्रोत्साहन देत होती. तर शिट्ट्या वाजवणार्या पोरांना म्हातारी माणसं शिव्या देत होती. बगता बगता गाडी अर्ध्या पुलाला ओलांडून गेली. जर गाडी बंद पडली तर काय होणार, पाणी वरवर वाढत चाललंय. काळजाचं पाणी पाणी झालतं माणसांच्या. आणि गाडी पोहोचली पलिकडे. सारी माणसं शिट्ट्या, टाळ्या वाजवून शरदरावांची वाहवा करीत होते. त्यांच्या धाडसाचं कौतुक करीत होती. ज्याच्या त्याच्या तोंडी होते ते यशवंतराव, शरदराव आणि शारदाबाई. शारदाबाई म्हणजे आमच्या परिसरातल्या गोरगरीब माणसांची सेवा करणार्या मोठ्या नामवंत पुढारी. त्याकाळात तुझ्या बाबांपेक्षा बाईंनाच लोक जास्त ओळखत असत.
बाबांना, सौ. वहिनींना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका