अभिनंदन ग्रंथ -क्षात्रधर्म हाच राष्ट्रधर्म-3

ज्या वेळी राष्ट्रावर सर्व बाजूंनी मर्यादातीत संकटें व अत्याचारी शत्रूंची आक्रमणें कोसळत असतात त्या वेळीं राष्ट्रांतील सर्वच्या सर्व समाजाचा शस्त्र हातांत धारण करून सैनिक म्हणून उभे राहणें हाच एकमात्र धर्म असतो. महाभारताच्या शांतिपर्वांत भीष्म युधिष्ठिराला राष्ट्रधर्म सांगतांना म्हणतात.

"अमर्याद प्रवृत्ते: शत्रुमि सड्गरे कृते ।
सर्धे वर्णाश्वच दृश्येयु: शस्त्रवन्तो युधिष्ठिर ।। "

पण आयत्या वेळी सारें राष्ट्रच्या राष्ट्र शस्त्र हातांत घेऊन सैनिक म्हणून उभे ठाकावयास त्या राष्ट्रांतील सर्वच्या सर्व राष्ट्रघटकांना शस्त्रास्त्र विद्येचे व सैनिक जीवनाचे शिक्षण मिळणें आवश्यक असतें. याचसाठी लोकतंत्र राष्ट्रांत सक्तीचे सैनिक विद्येचें शिक्षण ही गोष्ट भारतीय गणराज्याच्या प्राचीन पुरस्कर्त्यांनी अनिवार्य मानलेली आहे. महाभारताच्या राजधर्म प्रकरणांत या गोष्टीचा पुरस्कार केलेला असून भगवान गौतमबुध्दाच्या जातककथांमधूनहि हा पुरस्कार केलेला आढळतो.

आज आपल्या राष्ट्रावर अशीच भीषण स्थिती येऊन कोसळलेली आहे. सध्या आपण चीनच्या आक्रमणाच्या छायेंत आहोंत. आपल्या सुजनेतला कसलीहि भीक न घालता आपलें शेजारी राष्ट्र पाकिस्तान आपलें आक्रमक धोरण पुढें दामटीत आहे. गोव्याचें चिमुकलें राष्ट्रसुद्धां आपल्याला किंमत द्यावयास सिद्ध नाहीं. ही बाह्य आक्रमणें व अंतर्गत फूट आणि भांडणें यांपासून राष्ट्राचें संरक्षण करण्यासाठी क्षात्रधर्माचें पुनरुजीवन ख-या अर्थाने आवश्यक आहे.

महाराष्ट्राचे कर्तृत्वसंपन्न मुख्य मंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी मागच्या वर्षी पुण्याला महाराष्ट्रीय मंडळाचे कार्यवाह कॅप्टन शिवरामपंत दामले यांच्या एकसष्टी समारंभाच्या अध्यक्षपदावरून श्री. काका कालेलकर यांना उत्तर देणा-या भाषणांत असे उद्गार काढले होते कीं, "भारतांतील लोकशाहीच्या संरक्षणासाठींच महाराष्ट्रांत सैनिक वृत्तीची जोपासना करणें आवश्यक आहे."

भारतांतील लोकशाहीचें भवितव्य उज्ज्वल राहण्यासाठी महाराष्ट्राचे क्षत्रिय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पुण्यश्लोक शिवरायाचा हा महाराष्ट्र ख-या अर्थाने  भारताचा खड्गहस्त बनवितील अशी आशा बाळगणे अनुचित ठरणार नाही !