अभिनंदन ग्रंथ -क्षात्रधर्म हाच राष्ट्रधर्म

क्षात्रधर्म हाच राष्ट्रधर्म

- साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण हे क्षत्रिय आहेत. त्यांच्या वाढदिवस-समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रसंरक्षणासाठी आवश्यक असलेल्या क्षात्रधर्माचें स्वरुप या लेखांत दिग्दर्शित करणें समुचित होईल.

विषमतापूर्ण व पशुभावविशिष्ट जगांत केवळ नैतिक आदर्शानी जीवन जगतं येण्याची कधींच शक्यता नसते. म्हणूनच महर्षि व्यासांनी म्हटलें आहे, "शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते ।" ("शस्त्राने संरक्षिलेल्या राष्ट्रांतच शास्त्रचिंतन व तत्त्वचिंतन शक्य असतें." ) नुसतें बाह्य आक्रमणापासूनच नव्हे, तर एक स्थिर व अनुशासनबद्ध समाजरचना चालवावयास व तिच्या द्वारे समाजाचा विकास घडवून आणावयास या सामर्थ्याची आवश्यकता आहे. प्रबल दंडशक्तीवरच कोणतींहि मूल्ये व व्यवस्था चिरस्थायी होणें अवलंबून असतें. या शक्तीचें महत्व ज्यांनी ओळखले नाहीं त्यांना समाजाचा विकास तर घडवून आणतां आला नाहीच; पण स्वत:चा व आपल्या राष्ट्राचाहि नाश मात्र त्यांनी ओढवून घेतला असें जगाचा इतिहास सांगतो. राजर्षि मनूनें त्रिगुणात्मक जगाच्या व्यवहाराचें व त्यांतील तमोगुणावर अधिष्ठित  असणा-या प्रवृत्तीचें अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करून असा सिद्धान्त सांगितला आहे कीं,

सर्वो दण्डजितो लोको दुर्लभो हि शुचिर्नर: ।
दण्डस्य हि भयात्सर्व जगद्भोगाय कल्पते ।।
देवदानवगंधर्वा: रक्षांसि पतगोरवा:।
तेsपि भोगाय कल्पन्ते दण्डेनैव निपीडिता: ।।
यत्र श्यामो लोहिताक्षो दण्डश्वररति पापहा ।
प्रजास्तत्र न मुह्यन्ति नेता चेत् साधु पश्यति ।।
( मनुस्मृति अ. ७ वा, श्लोक : २२, २३ व २५ )

"जगामध्ये कोणत्याहि बलाधिष्ठित अनुशासनाचा धाक नसतांना स्वयंप्रेरणेनें विशुद्धपणें वागणारा मनुष्य अत्यंत दुर्लभ आहे. वस्तुत: सर्व लोक दंडाच्याच समर्थ्याने नियंत्रित असतात. मनुष्यच काय पण देव, दानव, गंधर्व, राक्षस, पक्षी, सर्प इत्यादि जगांतील उच्च व नीच योनिविशेष सुद्धा केवळ दंडाच्याच धाकानें आपापल्या अनुशासनाच्या सीमारेषेंत असतात. ज्या ठिकाणीं श्मामवर्णाचा, आरक्त नेत्रांचा व पापाचा विनाश करणारा दंड सतत फिरत असतो त्याच ठिकाणी प्रज्ञांना कर्तव्याकर्तव्याच्या संबंधांत कधीं मोह उत्पन्न होऊं शकत नाहीं. मात्र दंडनीतीचा प्रेरक असणारा नेता तिचें रहस्य ओळखून योग्य प्रेरणा देणारा असला पाहिजे." या दंडनीतीचें प्रत्यक्ष प्रतीक म्हणजे राज्यसंस्था असून ही राज्यसंस्था ज्या वर्गांतून उत्पन्न होते व ज्या वर्गाच्या बळावर मुख्यत: अधिष्ठित असते त्या वर्गाला क्षात्रवर्ण असें भारतीयांनी म्हटलें आहे. तपस्वी वर्गानें या वर्णाची निर्मिति केली असें शतपथ ब्राह्मणांत वर्णन आहे. देश व धर्म यांसाठीं लढणारा योद्धयांचा वर्ग म्हणजे क्षत्रिय.

वस्तुत: इतिहासाच्या कोणत्याहि कालखंडांत युद्धें ही अनिवार्य आहेत. केवळ बाह्य परिस्थितीलाच युद्धाचे प्रधान कारण समजणें हेंहि चुकीचें आहे. बाह्य परिस्थिति व अंत:प्रवृत्ति या दोन्ही कारणांमुळे युद्धे निर्माण होत असतात. व्यक्तिजीवन हा समाजजीवनाचाच एक भाग असल्यामुळें व्यक्तीची इच्छा असो अगर नसो, पण सामाजिक मनाच्या प्रवाहांत व्यक्तीला पुष्कळदा वाहत जावेंच लागतें; व सामाजिक जीवनांत युद्धें अनिवार्य ठरतात. जगाच्या युद्धांचा इतिहास पाहून त्यांच्या उदभवांच्या कारणांची मीमांसा केली तर असें आढळून येईल की, सामान्यत: या युद्धांची कारणें पुढीलप्रमाणें आहेत :

१) युयुत्सु प्रवृत्ति, २) शांततेनें जीवन जगण्याचा कंटाळा, ३ )साहसीपणाची आवड व कांही तरी पुरुषार्थ गाजविण्याची महत्त्वाकांक्षा, ४) भांडखोरपणा व अपहरण करण्याची प्रवृत्ति, ५) स्वसंरक्षणाची आवश्यकता, ६) शीघ्रकोपी मनोवृत्ति, ७) मत्सरीपणा व स्पर्धा-प्रवृत्ति, ८) स्वामित्वाची  आकांक्षा, व ९) विजेतृत्वाच्या कीर्तीची आकांक्षा.