अभिनंदन ग्रंथ -महाराष्ट्राच्या इतिहासाची सामान्य रेखा 3

यादवांच्या राजवटींत विदर्भांत महानुभाव पंथाचा उदय झाला. या पंथाचे मूळ पुरूष गोविंद प्रभु ऊर्फ गुंडम राउळ हे कण्वशाखीत ब्राह्मण असून अमरावतीजवळ ऋद्धपूर गांवी राहत होते. त्यांचे शिष्य गुजराती नागर ब्राह्मण हरिपाल ऊर्फ चक्रधर यांनी विदर्भांत महानुभाव पंथाची स्थापना व प्रसार केला. यादव घराण्यांतील कांही पुरुष व स्त्रियांहि या पंथाचे अनुयायी बनले होते असें दिसतें. हा पंथ कृष्णोपासक व भक्तिमार्गी होता तरी त्याचे कांही आचार तत्कालीन लोकांस विचित्र व सनातन वैदिक धर्माच्या विरुद्ध होते असें दिसतें. त्यामुळे रामदेवराव यादवाच्या काळीं या पंथाचा थोडाबहुत छळ झाला असावा. तथापि हेमाद्रीच्या आज्ञेने श्रीचक्रघराचा वध झाला असें जें विधान कांही महानुभावीय ग्रंथांत केले आहे, त्याला पुरेसा आधार नाहीं. याच्या उलट श्रीचक्रधर बदरिकाश्रमास निघून गेले हें कांही महानुभाव पोथ्यांतील विधान जास्त संभवनीय वाटतें. चक्रधराच्या वधानंतर रामदेव राजास उपरति होऊन त्यानें हेमाद्रीला छळ करून ठार मारलें, हें कांही महानुभाव पोथ्यांतील विधान इतर बलवत्तर पुराव्यावरून आता असत्य ठरलें आहे.

श्रीचक्रधरांनी आपल्या पंथाचा उपदेश मराठींत करण्याचा उपक्रम केल्यामुळे त्या काळी मराठींत उत्तम ग्रंथरचना झाली. कवीश्वर भास्कर भट्टाचे 'शिशुपालवध' व 'एकादशस्कंध' दामोदर पंडिताचें 'वस्तहरण' नरेंद्र कवीचें 'रुक्मिणीस्वयंवर' इत्यादि ग्रंथांना महानुभावपंथांत पूज्य मानलें जातें. मराठीच्या आद्य वाङ्मयांत यांची गणना होते.

यादवांच्या राजवटींत वैदिक धर्मीयांनीहि मराठींत उत्कृष्ट ग्रंथरचना केली. मराठींतील आद्य ग्रंथकार मुकुंदराज यांचे विवेकसिंधु व परमामृत हे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. ज्ञानेश्वरीचा उल्लेख मागें केला आहेच.

तेराव्या शतकाच्या अखेरीस यादवांच्या राज्यावर मुसलमानांची स्वारी होऊन तींत रामदेवरावाचा पराभव झाला आणि त्याला शत्रूला जबर खंडणी देणें भाग पडलें. त्यानंतर यादवांच्या राज्याला उतरती कळा लागून लौकरच महाराष्ट्र मुसलमानांच्या अंमलाखआली गेला.

याप्रमाणे गेल्या शे-दीडशें वर्षांत अनेक पाश्चात्य व भारतीय संशोधनकांच्या परिश्रमांने महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची उभारणी झाली आहे. याकरितां त्यांना संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश व मराठी  भाषांतील वाङ्मय, कोरीव लेख व नाणीं, स्थापत्य, शिल्प व चित्रकलांचे अवशेष, परकी प्रवाशांची प्रवासवर्णनें इत्यादिकांचा सूक्ष्म अभ्यास करून कणाकणाने माहिती जमवावी लागली आहे. आतां महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची ठोकळ रुपरेषा माहीत झाली असली तरी त्यांत अनेक ठिकाणीं रंग भरणें अवश्य आहे. हें काम करण्यास अनेक उत्साही संशोधक पुढें येतील अशी अपेक्षा आहे.

"महाराष्ट्रांत गुणाची अवहेलना केलीं जाणार नाही. कोणल्याहि क्षेत्रांत सत्तास्थानांत निवडणुकीत गुणवत्तेला महत्त्व कायम टिकविलें जाईल असी माझी ग्वाही आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचें आपण भलें करूं शकणार नाही अशी माझी श्रद्धा आहे."
- श्री. चव्हाण ( सांगलीचे भाषण )