अभिनंदन ग्रंथ -महाराष्ट्राच्या इतिहासाची सामान्य रेखा 2

द्वितीय पुलकेशीच्या काळीं सुप्रसिद्ध चिनी यात्रेकरू ह्यूएन त्संग भारतांत आला होता. त्याने महाराष्ट्राचा राजा पुलकेशी याचें व महाराष्ट्रीयांचे वर्णन केले आहे. त्यांत तो म्हणतो, "पुलकेशी राजा क्षत्रिय असून स्वभावाने कृपाळू व उदार आहे. त्याचे प्रजाजन राजनिष्ठ आहेत. महाराष्ट्रीय लोक मोठे अभिमानी आहेत. कोणी त्यांचे कल्याण केलें तर ते त्याबद्दल कृतज्ञ असतात, पण कोणी त्यांचे नुकसान केले तर ते त्याचा सूड उगवल्याशिवाय राहत नाहींत. शत्रूला पूर्वसूचना दिल्याशिवाय ते त्याच्यावर हल्ला करीत नाहींत. ते पुळपुट्यांचा पाठलाग करतात. पण शरण आलेल्यांना जीवदान देतात. युद्धाच्या प्रसंगी ते सुरापान करून मस्त होतात, तेव्हां त्यांच्यापैकी एक एक दहा हजार प्रति-पक्ष्यांना भारी असतो. असे शूर लढवय्ये पदरीं असल्याने पुलकेशी राजा शेजारच्या राजांना कस्पटाप्रमाणें लेखतो." या शूर मराठ्यांच्या मदतीनें पुलकेशीने उत्तर भारताचा अधिपति हर्ष याचा नर्मदातीरीं पराभव केला आणि सर्व दक्षिणभर दिग्विजय केला.

चालुक्यांचा सन ७५० च्या सुमारास अस्त होऊन औरंगाबादजवळचे राष्ट्रकूट घराणें उदायास आलें. याची आरंभीची राजधानी मयूर खंडी येथें होती. तिचा अद्यापि निश्चित शोध लागला नाहीं. कांही कालानंतर ती मान्यखेट ( सध्यांचे मालखेड ) येथे नेण्यांत आली. या घराण्यांत ध्रुव, तृतीय गोविंद, तृतीय इंद्र, तृतीय कृष्ण इत्यादि शूर राजे उत्पन्न झाले. त्यांनी उत्तर हिंदुस्थानांत हिमालयापर्यंत स्वा-या करून सर्वत्र आपला दरारा बसविला. दक्षिणेंत यांचें फार विस्तृत असें साम्राज्य होतें. यांचे अनेक लेख महाराष्ट्रांत सर्वत्र मिळाले आहेत. यांच्या काळीं संस्कृत विद्येस व स्थापत्यादि कलांस चांगलें उत्तेजन मिळाले. वेरूळची जगद्विख्यात लेणीं यांच्याच काळीं कोरलीं गेलीं. त्यांतील कैलास हे लेणें तर जगांतील प्रमुख आश्चर्यांत गणले जातें. राष्ट्रकूट राजांचा जैन वाङ्मयासहि उदार आश्रय होता. त्यांच्या काळीं अनेक उत्कृष्ट प्राकृत  व अपभ्रंश भाषेंतील काव्ये निर्माण झालीं.

राष्ट्रकूटांनी सन ८०० च्या सुमारास कोकणांत शिलाहार राजांची मांडलिक म्हणून स्थापना केली. हे शिलाहार मूळचे तगर ( मराठवाडयांतील तेर ) या गांवाचे. म्हणून त्यांचे 'तगरपुरविनिर्गत' किंवा 'तगरनगर-भूपालक' असें वर्णन आढळतें. या वंशाच्या मुख्य तीन शाखा होत्या. एक शाखेचें राज्य गोवें, सावंतवाडी आणि रत्नागिरी या दक्षिण कोकणावर होतें. याच्या राजधआनीचा अद्याप निश्चितपणें शोध लागला नाही. दुसरी शाखआ उत्तर कोकणांत पुरी ( जंजि-याजवळची राजपुरी ) येथून राज्य करीत होती. या शाखेचे अनेक ताम्रपट सापडले आहेत. या शाखेच्या अपरार्क किंवा अपरादित्य राजाने याज्ञवल्क्य स्मृतीवर लिहिलेली अपरार्क टीका सुप्रसिद्ध आहे. तिचा प्रसारा उत्तरेंत काश्मीरपर्यंत झाला होता. तिसरी शाखा कोल्हापूर येथून राज्य करीत होती. हिच्या पन्हाळा आणि वळिवडें अशा दुस-याहि राजधान्या होत्या. कोल्हापूरची महालक्ष्मी ही या शाखेची कुलदेवता होती. क-हाड येथेंहि या शाखेचे राज्यकारभाराचें एक मुख्य स्थान होते.

शिलाहारांना कोकणांतील राज्य राष्ट्रकूट सम्राटांच्या कृपेनें मिळालें. तेहि आपल्या सम्राटांशी शेवटपर्यंत राजनिष्ठ राहिले.

राष्ट्रकूटांनंतर कल्याणीच्या चालुक्यांचा उदय झाला. यांचे अनेक कोरीव लेख महाराष्ट्रांत सर्वत्र सापडले आहेत. यांच्या काळीं उज्जयिनीधार येथील परमारांनी गोदावरीपर्यंत आक्रमण केलें होतें. पण पुढें तैलपानें मुंज राजाचा पराभव करून तें काही काळ परतवलें. या वंशांतील महापराक्रमी राजा सहावा विक्रमादित्य याचा शके १००८ ( सन १०८७ ) चा स्तंभलेख सीताबर्डीचा लेख म्हणून प्रसिद्ध आहे. तो मूळचा भांदक येथील विव्यासन टेकडीवर होता. या लेखांत एक ब्राह्मण अधिका-याने गाईच्या चराईकरितां कांही निवर्तने जमीन दिल्याचा उल्लेख आहे.

देवगिरीचे यादव

बाराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीचे यादव उदयास आले. यांचे साम्राज्य उत्तरेस गुजराथपासून दक्षिणेंत कर्नाटकापर्यंत पसरलें. यादव नृपति सिंघण याच्या काळीं त्याचा सेनापति खोलेश्वर हा मूळचा विदर्भांतील होता. त्यानें उत्तरेंत बारामासीपर्यंत स्वा-या केल्या होत्या. त्यानें विदर्भांत अनेक धार्मिक कृत्यें केलीं. त्याने आपल्या नांवें खोलापूर नामक अग्रहार स्थापून तो ब्राह्मणांस दिला. हें गांव अमरावतीजवळ अद्यापि आपल्या प्राचीन नांवाने विद्यमान आहे. यादव वंशांतील रामचंद्र राजाने वाराणसींतून मुसलमानांना पिटाळून तेथें शाङर्गधराचें देवालय बांधले. तसेंच त्याच्या राघव नामक अधिका-याने रामटेक येथें लक्ष्मणाचे देवालय उभारलें. महाराष्ट्रांत इतरत्रहि अनेक ठिकाणीं यादव काळांत देवळें बांधली गेलीं. त्यांच्या स्थापत्यपद्धतीला 'हेमाडपंती' असें नांव आहे.

देवगिरीच्या यादवांच्या राजवटींत संस्कृत वाङ्मयाला उदार राजाश्रय मिळाला. सुप्रसिद्ध हेमाद्रि पंडित हा महादेव व रामचंद्र यांच्या कारकीर्दीत 'श्रीकरणाधिप' म्हणजे सचिवालयाचा प्रमुख होता. त्यानें 'चतुर्वगचिंतामणी' नामक धर्मशास्त्राचा बहुत्कोश रचला होता. याशिवाय 'आयुर्वेदरसायन' आणि 'मुक्ताफलटीका' हे ग्रंथहि त्यांच्या नांवावर मोडतात. हेमाद्रीचा आश्रित बोपदेव यानें सव्वीस ग्रंथ संस्कृतांत लिहिले होते. त्यांमध्ये व्याकरणवैद्यक, तिथीनिर्णय, साहित्य, भागवत वगैरेंवर ग्रंथ आहेत. यानें तयार केलेलें मुग्धबोध व्याकरण समजण्यास सोपें असल्याने त्याचा प्रसार अद्यापि बंगाल प्रांतांत चालू आहे. रामदेवराव यादवाच्या काळीं सन १२९० मध्यें मराठींतील मूर्धन्य ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिला गेला.