ब्रिटिश राज्यसत्तेने १८५७ साली कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या तीन ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली. या विद्यापीठांचे शैक्षणिक कार्यदेखील या देशातील सामाजिक व राजकीय चळवळींना प्रोत्साहन देणारेच ठरले यात शंका नाही. ज्यांनी महाराष्ट्राच्या समाजमनात मानवतावादी प्रेरण पेरल्या आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय मनाचा पींड घडविला त्या सर्व विचारवंतांनी समाज सुधारकांनी व राजकीय नेत्यांनी इंग्रजी शिक्षणाचा लाभ घेतलेला होता. या देशावर राजकीय गुलामगिरी लादणा-या इंग्रजांच्या साहित्यातून व तत्वज्ञानातून त्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रेरणा शोधल्या ही गोष्ट आपल्याला अमान्य करता येत नाही. इंग्रजी भाषेच्या माध्यमातून आणि इंग्रजी शिक्षण प्रणालीतून त्यांना ह्या प्रेरणा शोधता आल्या. आणि म्हणूनच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हटले आहे. लोकहितवादी, महात्मा फुले, विष्णुबोवा ब्रह्मचारी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, पंडिता रमाबाई, दादाभाई नवरोजी आदींनी इंग्रजी शिक्षणातून आपल्या सामाजिक, राजकीय व आर्थिक कार्यासाठी आवश्यक असणारे विचारधन व प्रेरणा मिळविल्या. इंग्रजांना आपल्या राज्यकारभारसाठी इंग्रजी भाषा जाणणारा नोकर वर्ग तयार करावयाचा होता; पण त्यांनी येथे उपलब्ध करून दिलेल्या शिक्षणातून समाज सुधारकांची व राष्ट्रवाद्यांचीह पिढी महाराष्ट्रात जन्माला आली हे एक ऐतिहासिक सत्य आहे. याची जाणीव ब्रिटिशांना मुळीच नव्हती असे कसे म्हणता येईल? इंग्रजी शिक्षणाची नीति ठरविणा-या लॉर्ड मेकॉलेला या गोष्टीची पूर्ण जाणीव होती याची मी आपल्याला आठवण करून देत आहे. भारतात इंग्रजी सत्ता चिरकाल टिकणार नाही; एक दिवस असा उजाडेल की त्या दिवशी एतद्देशियांच्या हातात सत्तासूत्रे देऊन इंग्रज राज्यकर्ते भारताचा किनारा सोडतील. हे विधान लॉर्ड मेकॉले साहेबांनी केले होते. ते कशाच्या आधारावर केले होते? भारतीयांना इंग्रजी साहित्यातून व तत्वज्ञानातून स्वातंत्र्याच्या प्रेरणा मिळणारच आणि ते स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारणारच या गष्टीची त्याला पुरेपूर जीणीव होती.
शिक्षणाला एक सामाजिक किंवा सांस्कृतिक आशय असतो हे मी आपल्याला मघाशी सांगितलं. इंग्रजी शिक्षणाबरोबर आपल्या देशात इंग्रजी भाषेच्या माध्यमाद्वारे पाश्चिमात्यांचे साहित्य, कला, धार्मिक, सामाजिक व राजकीय तत्वज्ञान आणि भौतिकशास्त्रांचे ज्ञान आपोआपच आले. आणि जेव्हा या सर्व गोष्टी या ठिकाणी आल्या तेव्हा आमच्या देशात कुठल्याही प्रकारची वैचारिक किंवा सांस्कृतिक पोकळी नव्हती. हे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे. या ठिकाणचे सामाजिक जीवन परंपरावादी, स्थितिशील व विषमतेने पूर्णतः ग्रासलेले असेल तरी येथे कसल्याही प्रकारची सांस्कृतिक पोकळी नव्हती. आमच्या जवळ धार्मिक, सामाजिक व राजकीय तत्वज्ञान होते. आमच्या जवळ विविध भाषा होत्या; साहित्यही होते. विविध कला या ठिकाणी विकसित झाल्या होत्या व त्यांच्या समृद्ध माध्यमातून भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनाचा कलात्मक अविष्कार झाला होता. या समृद्ध संस्कृतीचा वारसाहक्क सर्वांना मिळालेला नव्हता ही गोष्ट नाकारता येत नाही. पण याचा अर्थ येथे सांस्कृतिक शून्यत्व होते असा होत नाही. पश्चिमेतून ज्ञान-विज्ञान, कला-साहित्य आणि धर्म तत्वज्ञानाचे नवीन वारे आमच्या देशात आल्यानंतर त्याचा येथील वैचारिक वातावरणाशी किंवा वा-याशी आरंभी संघर्ष आणि तदनंतर समन्वय होणे ही बाब अटळ होती. तेव्हां त्यांच्या संघर्षातून भारतात दुसरी एक अतिशय महत्वाची घटना घडली. वस्तुतः ती वैचारिक प्रबोधनाची घटना होती. भारताच्य आर्थिक, सामाजिक व राजकीय जीवनावर प्रखरपणे व प्रगल्भतेने परिणाम करणारी ती घटना होती. त्या घटनेने महाराष्ट्रात एक फार मोठे विचार मंथन घडवून आणले. त्या घटनेने या ठिकाणी वैचारिक प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची नांदी घातली. या वैचारिक प्रबोधनाने आमच्या विचारवंतांच्या धर्म व समाजसुधारकांच्या हातात एक नवीनच “टॉर्च” दिला.