मित्रहो, “यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाले” साठी यापूर्वी महाराष्ट्रातील काही थोर विचारवंतानी आपले प्रगल्भ विचार कराडच्या सुजाण व सुबुद्ध नागरिकांसमोर व्यक्त केलेले आहेत. पण या वर्षी महाराष्ट्राला ज्याचा फारसा परिचय नाही अशा एका सामान्य व्यक्तीला या व्याख्यान मालेत दोन व्याख्याने देण्यासाठी आपण पाचारण केलं आहे. नगराध्यक्ष श्री. पाटील साहेबांनी आपल्या प्रास्ताविकात माझा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विचारवंत म्हणून जो उल्लेख केला तो केवळ या प्रसंगाचे औचित्य दर्शविणारा आहे. माझ्या विषयी त्यांनी काढलेले उदगार हे उलट त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष देणारे आहेत. वस्तुतः या ठिकाणी येण्याचं मी जे कबूल केलं त्याचं मुख्य कारण माननीय यशवंतरावांच्या विषयी माझ्या मनात असलेला आदर व जिव्हाळा हे आहे, तो अभिव्यक्त करण्याची संधी कराडकरांनी मला दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. कृष्णा-कोयनेच्या काठावर वाढलेल्या एका थोर पुरुषाच्या विचारांशी नाते सांगणा-या मराठवाड्यातील तेरणा-वांजरेच्या थंडीवर वाढलेल्या माझ्या सारख्या एका सामान्य व्यक्तीला येथे येण्याची संधी मिळाली ही खरोखर त्या व्यक्तीच्या जीवनातील एक अपूर्वाई आहे. माननीय यशवंतरावजींचं अभीष्टचिंतन करावं आणि त्याच बरोबर आपल्याशी महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण या विषयावर थोडसं प्रकट चिंतन करावं या दुहेरी हेतूने मी आपल्या समोर उभा आहे. आणि म्हणून प्रथम मी श्री. यशवंतरावांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दीर्घायुरारोग्य चिंतितो.
माननीय यशवंतरावांना श्रद्धास्थान मानणारे जे अनेक लोक या महाराष्ट्रात आहेत त्यात मीही माझ्या परिने सहभागी आहे. भारतीय राजकारणात एक शक्तिकेंद म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव हे केवळ राजकारणी व्यक्ती नव्हेत. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाच्या प्रत्येक अंगावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटलेला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडघडणी मध्ये राजकारणाचा फार मोठा वाटा आहे यात शंका नाही. पण ज्या राजकारणाने त्यांना घडविलं ते राजकारण निव्वळ राजकारम नव्हतं व नाही हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. सामाजिक बांधिलकी सांगणा-या राजकारणानं त्यांना घडविलं आहे; हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सारस्वताच्या दरबारात एक उच्च प्रकारची सांस्कृतिक अभिरूची घेवून ही व्यक्ती उभी आहे हे मी आपल्याला सांगण्याची गरज नाही. आणि म्हणूनच यशवंतरावांच्या राजकारणामागे एक विचारसूत्र आहे, एक विचारमूल्य आहे. ते विचारसूत्र किंवा विचारमूल्य त्यांच्या अनेक वर्षांच्या सर्जनशील चिंतनातून आणि कार्यातून विकसित झालेलं आहे. यशवंतरावांच्या राजकारणाचे ‘रूटस्’ आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरेत खोलवर पसरलेले आहेत. या देशातील आशयगर्भ राजकारणाने यशवंतरावजींना घडविले; आणि त्याची परतफेड म्हणून यशवंतरावजींनी महाराष्ट्रातील राजकारणाला आपल्या विचारांनी घडविले. राष्ट्रीय पातळीवरचं राजकारणही त्यांनी विचार आणि विवेक बाजूला ठेवून केलं नाही. राजकारण करण्यासाठी विचार लागतातच असं नव्हे. विचारांचा आधार न घेता, अगदी अविचारानेही राजकारण केलं जाऊ शकतं हे सांगण्याची आवश्यकता तरी आहे का? पण असा प्रकारचं विचारशून्य राजकारण अधिककाळ पर्यंत टिकू शकत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पायाशिवाय वास्तू उभी करता येत नाही; तद्वत् विचाराशिवाय राजकारण निभविता येत नाही, ही गोष्ट सत्तास्पर्धेत बेभानपमे गुंतलेल्या मंडळींना कुणी व कशी सांगावी? महाराष्ट्राच्या विचारपरंपरेला अनुसरून ज्या ज्या नेत्यांनी आपले राजकीय जीवन घडविले त्यांच्या मालिकेत माननीय यशवंतरावांचे स्थान अगदी वरचे आहे, हे निदान महाराष्ट्राला तरी विसरता येणार नाही.
आणि म्हणूनच यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतल्या बरोबर त्याच्या सर्वांगीण विकासाचा सम्यक व समग्र विचार आपल्या समोर मांडला होता, विशद केला होता. आणि त्या विचाराला कार्यान्वित करण्यासाठी अतिशय चैतन्यदायी अशा भावनिक वातावणाची निर्मितीही केली होती, “सह्याद्रिचे वारे” वाचल्यानंतर आजही त्या चैतन्ययुक्त वातावरणाची कल्पना आपल्याला येऊ शकेल. यशवंतरावांचा संदेश व त्यांच्या शब्दातील अमृताशी स्पर्धा करू शकेल. असा गोडवा सह्याद्रिच्या वा-यांनी महाराष्ट्राच्या सर्व कानाकोप-यांपर्यंत नेऊन पोहोचवला होता ह्याची मी आपल्याला आठवण करून देत आहे. महाराष्ट्रात स्वेच्छेने सामिल झालेल्या आमच्या मराठवाड्याच्या मनालाही त्या वा-यांनी स्पंदित केले होते. आणि मग सातसे वर्षांच्या जुलमी इतिहासाने मराठवाड्याच्या डोळ्यात गोठवलेलं दुःख सह्याद्रिच्या वा-यांचा स्पर्श होताच आसवांची नदी बनून वाहिलं होतं. हरवलेलं नातं पुन्हा सापडल्याचा, तोडलेलं नातं नियतीनं पुन्हा जोडल्याचा, आनंद काय असतो हे मराठवाड्यातील लोकांनाच विचारला पाहिजे.