व्याख्यानमाला-१९८०-१४

महात्मा फुल्यांची तुलना एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीशी करावयाचीच असेल तर ती अमेरिकन नीग्रोंचा दुसरा क्रांतीकारक नेता जॉन ब्राऊनशीच करावी लागेल. महात्मा फुले हे सर्वार्थांनी क्रांतीकारक पुरुष होते. समाजकारणाचं, सामाजिक परिवर्तनाचं व सामाजिक क्रांतीचं व्याकर आम्हाला फुल्यांपासूनच शिकावं लागेल. ते समाजकारणाचे व समाज क्रांतीचे पाणिनी होते. आमच्या समाजकारणातील कोणत्याही शब्दाचे व्याकरण चालवायचे असेल तर आपल्याला फुल्यांकडेच जावे लागेल.

महात्मा जोतिराव फुले हे आमच्या समोर आजही एका आव्हानाच्या रूपाने उभे आहेत. त्यांनी हाती धरलेले समाजक्रांतीचे शिवधनुष्य पेलण्याची शक्ती आमच्या हातात नाही हे प्रांजळपणे कबूल केले पाहिजे. समाज जीवनाच्या सर्वांगांना त्यांनी क्रांतीस्पर्श केला होता. चातुर्वर्ण्याच्या चौकटीवर तर त्यांनी घणाघाती प्रहार केले होते. वस्तुतः त्यांना हवे होते विचार व मूल्यपरिवर्तन! त्या शिवाय समाज परिवर्तनाचा विचार करणे शक्य नव्हते. समाजातील खालच्या थरातील लोकांनी वरिष्ठ वर्गाची जीवनमूल्ये स्वीकारावीत व त्यांचे अनुकरण करावे असे त्यां कधीही वाटले नव्हते. त्यांना कनिष्ठ वर्गातील लोकांचे “संस्कृतीकरण” (Sanskritization) करणे मान्य नव्हते. इतर समाजसुधारकांनी व विचारवंतांनी आपल्या पुरोगामी विचारांच्या पुरस्कारासाठी आणि मान्यतेसाठी धर्मग्रंथात आधार शोधण्याचे प्रयत्न केले. फुल्यांनी तशा प्रकारची बौद्धिक कसरत कधीही केली नाही. धर्मग्रंथांनी त्यांच्या विचारांना, मूल्यांना व कार्याला मान्यता द्यावी (Sanction) असे त्यांना कधीही वाटले नाही.त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारांचा अर्थ विषद करण्यासाठी भूतकाळातले अन्वय त्यांना नको होते. त्यांची गरज फुल्यांना भासली नाही. कारण त्या अन्वयातून अर्थापेक्षा अनर्थच अधिक प्रमाणात हाती लागला असता. खरे तर आमचा भूतकाळ संपूर्णतः अंधारात सापडलेला होता. त्याच्या गाभा-यात कधी काळी एखादी पणती मिणमिणलीही असेल; आणि तिच्या एखाद्या प्रकाश किरणाने बाहेर येण्याचा अट्टाहास केलाही असेल, नाही असे नाही. पण अशा एखाद्या क्षीण प्रकाश किरणाला सूर्य मानण्याचा वैचारिक भावडेपणा फुल्यांना मान्य नव्हता. तशा प्रकारचा एखादा किरण हाती पकडून जीवनात प्रकाशाची आरास मांडता येत नसते. फुल्यांचा संघर्ष हा बहुजनसमाजाला वर्णश्रेष्ठत्व किंवा जातीश्रेष्ठत्व प्राप्त करून देण्यासाठी नव्हती. तो त्याला मूल्यश्रेष्ठत्व प्राप्त करून देण्यासाठी होता. त्यासाठी त्यांनी भूतकाळाचा दरवाजा ठोठावला नाही. समजाच्या खालच्या थरात ते स्वतः जन्मले व वाढले होते. पम त्यांचे मन कसल्याही न्यूनगंडाने पछाडले नव्हते. आशावादाने झपाटलेले मन त्यांना लाभले होते. माणसामाणसात कुठलाही भेद त्यांना मान्य नव्हता. आणि म्हणूनच हा विद्रोही मूर्तिभंजक मानवी स्वातंत्र्य व समतावादाचा सृजनशील शिल्पकार होऊ शकला. “गुलामगिरी” हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या विद्रोही मनाचा जितका आविष्कार आहे तितकाच “सार्वजनिक सत्यधर्म” हा त्यांचा दुसरा ग्रंथ त्यांच्या सृजनशील तत्वज्ञानाचा साक्षात्कार आहे. महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील सर्जनशील समाजक्रांतीचे खरेखुरे “निर्मिक” होते, असे माझे प्रामाणिक मत आहे. फुल्यांच्या साहित्याची निरमिती देखील समाज क्रांतीच्या उर्मीतून आणि प्रेरणेतून झालेली आहे, हा महात्मा आधुनिक महाराष्ट्राचा पहिला विद्रोही कवी आहे. या विद्रोही कवीच्या शब्दांनी स्पर्धा केली ती त्याच्याच क्रांतीकारी कर्तृत्वाशी! त्यांने आपले साहित्य कर्तृत्वाने “अक्षर” केले.

महात्मा फुल्यांनी बहुजन समाजाला, उपेक्षित व पीडित जनसामान्यांना मानवी अस्मिता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. या देशातील शोषित व दलित समाजाला विद्या मिळविण्याचा अधिकार असता तरजीवनातील अंधाराशी त्यांनी शतकानुशतके नको असलेले नाते जोडलेच नसते. अविद्या ही आमच्या समाजाच्या आत्मघातकी अवनतीचे व विनाशाचे मूळ कारण आहे असे फुल्यांचे मत होते. या वस्तुस्थितीची मीमांसा अगदी पोटतिडकीने केली :

“विद्येविना मति गेली; मतिविना नीति गेली; नीतिविना गति गेली! गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले.” वस्तुतः या शब्दात फुल्यांनी त्यांच्या काळातील समाजाची विवेचक समीक्षाच केली आहे. समाजाच्या विदारक अवनतीची ही मीमांसा आहे. फुल्यांनी पददलितांच्या व बहुजन समाजाच्या व्याधीचे मूळ कारण शोधले; त्यांचे योग्य व अचुक निदान केले. अविद्या घालवायची असेल तर लोकांना विद्या द्यावी लागेल; त्यांचे अज्ञान घालवायचे असेल तर त्यांना ज्ञान उपलब्ध करून द्यावे लागेल; हा विचार त्यांनी मांडला. पण नुसता विचार मांडून ते स्वस्थ बसले नाहीत. कोरडे पांडित्य त्यांना मान्य नव्हते. विचाराला त्यांनी कृतीची जोड दिली. शिक्षणकार्याचा आरंभ त्यांनी केला.