महाराष्ट्रातील दुष्काळ - १५१

१९८४ मध्ये मान्सूनच्या पावसाने देशातील दुष्काळीपट्ट्यात नसलेल्या अनेक व्यापक प्रदेशांनाही दगा दिला होता आणि ऑगस्टच्या अखेरपर्यंत भारतातील दोन तृतियांश भागात पर्जन्यवृष्टी झालेली नव्हती किंवा झाली असल्यास अत्यल्प होती !  त्यामुळे भारतात ह्यापूर्वी १८७६ अथवा १८९७ मध्ये ज्याप्रमाणे भीषण दुष्काळ पडला होता.  तसाच आताही दुष्काळ पडणार की काय असे भितीचे वातावरण निर्माण होऊ पाहात होते.  त्यापूर्वी ऑगस्ट अखेरीस देशातील बर्‍याच भागात बर्‍यापैकी पाऊस झाल्यामुळे खरीप पिकाचे जरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असले तरीही परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.  अशा ह्या पावसामुळे दुष्काळाचे सावट संपूर्णपणे दूर झालेले आहे असे मात्र म्हणता येणार नाही. 
ह्यावर्षी (१९८६) मान्सूनचा पाऊस केवळ भारतातच वेळेवर पडला नाही, असे नाही तर इतर देशातही त्याने वेळेवर न पडून, अनेक देशांची पंचाईत केली.  आशिया खंडातील अनेक देश मान्सून पावसाच्या पट्ट्यात मोडतात.  त्यापैकी श्रीलंका, इंडोशिया, कांपुचिया, व्हिएटनाम, थायलंड, लाओस, फिलिपाईन्स इत्यादी अनेक देशांना मान्सूनने यावर्षी दगा दिला आहे.  हवामान-शास्त्राची व एकूण विज्ञानाची गेल्या अर्ध्या शतकात कितीतरी प्रगती झालेली आहे.  आता हवामानासंबंधीचे अंदाज पाच ते दहा दिवस अगोदर वर्तविण्यांत हवामानशास्त्रज्ञांना बर्‍यापैकी यश मिळालेले आहे.  (कदाचित स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजाबाबत माझे हे विधान सर्वच मान्य करणार नाहीत.)  दीर्घ मुदतीचे हवामानाचे अंदाज वर्तविता यावेत म्हणून जागतिक पातळीवर बहुविध प्रयत्‍न चालू आहेत.  हवामानतज्ज्ञांचे लक्ष सध्या पॅसिफिक महासागरात होणार्‍या पाण्याच्या उष्णतामानातील फरेबदलाने वेधून घेतले आहे.  तज्ज्ञांच्या मते मान्सूनच्या पर्जन्यवृष्टीत जे फरेबदल होत आहेत त्याचा संबंध, पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागावरील उष्णतामान १० डिग्री सेंटीग्रेडने वाढले, ह्या घटिताशी आहेत.  'एल-निनो' म्हणून संबोधिल्या जाणार्‍या या प्रक्रियेमुळे पृथ्वीतलावावरील हवामानात आणि पर्जन्यवृष्टीत आश्चर्यकारक बदल होताना दिसत आहेत, असा या शास्त्रांचा दावा आहे.

आफ्रिकेतील साहेल प्रदेशातील आणि ऑस्ट्रेलियातील दुष्काळ, युरोपखंडातील उन्हाळ्यातील थंड हवामान आणि पाऊस, तसेच जगातील इतर भागातील दुष्काळ या सर्वांचा पॅसिफिक महासागरातील हवामान बदलाशी संबंध आहे.  असा हवामानतज्ज्ञांचा दावा आहे.  तसेच अलीकडे हिंद महासागरांतील उषण्तामानातही काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.  भारतातील मान्सूनवर याचा प्रतिकूल प्रभाव पडू लागला असावा असाही अंदाज आहे.  ह्या व्यतिरिक्त आणखी दोन महत्त्वाचे बदल जाणवणारे आहेत.  आफ्रिकेकडून भारताकडे नैॠत्य दिशेने वाहाणार्‍या वार्‍यांचा वेग तसेच हिमालयाच्या पायथ्याकडून पश्चिमेकडे वाहणार्‍या वार्‍यांचा वेग, कमी होऊ लागला आहे.  भारतातील पावसाळ्याचे दिवसही कमी होऊ लागलेले दिसत आहेत.  ह्या हवामानतज्ज्ञांच्या अंदाजामुळे पर्यावरणवाद्यांची मात्र मोठी पंचाइत होऊन बसली आहे.

वनसृष्टीचे आणि झाडांचे महत्त्व जीवसृष्टी व पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मृद्संधारण व भूगर्भात पाणी पुरविण्याच्या दृष्टीने असाधारण आहे हे सर्वच मान्य करतात.  झाडे व वनसृष्टीचा पर्जन्याशी अतूट संबंध आहे असे पर्यावरणवादी आग्रहपूर्वक सांगत असतात.  तथापि वृक्षसृष्टीचा पर्जन्यवृष्टीशी संबंध आहे किंवा काय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.  अलीकडेच वसंत व्याख्यानमालेतील माझ्या भाषणात या मुद्याचा मी उल्लेख केला होता.  कारण मध्ययुगात किंवा एक दोन शतकापूर्वीही म्हणजे जेव्हा सर्वत्र घनदाट जंगले व वृक्षसृष्टी होती तेव्हाही जगभर दुष्काळ पडतच होते.  म्हणून वृक्षसृष्टीचे इतर दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असले तरी वृक्षांचा आणि पर्जन्यमानाचा संबंध आहे असे वाटत नाही.  आता तर हवामान शास्त्रज्ञांचे निष्कर्ष पर्यावरणवाद्यांच्या ह्या निष्कर्षाशी जुळते मिळते नसल्यामुळे नवीनच वादाचा व चर्चेचा मुद्दा उपस्थित झालेला आहे.  ह्याशिवाय कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण आणि ओझोनच्या स्तराचा विनाश इत्यादी घटकांचा पाऊस कमी होण्याशी संबंध असावा असे पर्यावरणवादी म्हणू लागले आहेत.  ह्याउलट आणि हिंद महासागरातील कमी अधिक उष्णतामानामुळे पर्जन्यवृष्टीच्या स्वरूपात बदल होत आहेत असा हवामानशास्त्रज्ञ आता दावा करीत आहेत.