भाग १ विधानसभेतील भाषणे-६५

१९

होमगार्डस्च्या असमाधानकारक कामगिरीबद्दलच्या कपात सूचनेवरील चर्चा* (१६ मार्च १९६१)
----------------------------------------------------------------

होमगार्डस् या संघटनेने जनतेची उपयुक्त सेवा केली असल्याने मा. यशवंतराव चव्हाण यांनी या कपात सूचनेस उत्तर देताना विरोध दर्शविला.
---------------------------------------------------------------
*Maharashtra Legislative Assembly Debates, Vol.III, Part,II (Inside No. 30), 16th March 1961, pp. 1506 to 1509.

अध्यक्ष महाराज, होमगार्डसच्या निमित्ताने जी कपात सूचना या सन्माननीय सभागृहात मांडण्यात आलेली आहे, तिच्यासंबंधी मी माझे विचार मांडणार आहे. अध्यक्ष महाराज, कपात सूचनेच्या निमित्ताने या सभागृहामध्ये होमगार्डस् संघटनेसंबंधाने चर्चा झाली ही एक चांगलीच गोष्ट झाली असे मी मानतो. श्री. बर्धन यांनी भाषण करताना सुरुवातीलाच या संघटनेविषयी, विशेषतः या संघटनेच्या कामाच्या बाबतीत जे विचार व्यक्त केले आहेत, त्या संघटनेचा मी प्रमुख असल्याकारणाने याला उत्तर देणे मला आवश्यक आहे. मला ही गोष्ट मान्य आहे की, त्यांचा हेतू फक्त टीका करावयाचा नसून त्या संघटनेच्या कामाबद्दल त्यांना माहिती करून घ्यावयाचा आहे. म्हणून त्यांनी जे भाषण केले आहे ते कसल्याही प्रकारचे का असेना, त्याला उत्तर दिले गेलेच पाहिजे.

अध्यक्ष महाराज, मी आपणाला सांगू इच्छितो की, पोलीस खाते इनडिस्पेन्सिबल आहे, मी इनडिस्पेन्सिबल नाही, बर्धन नाहीत, परंतु हाऊस इनडिस्पेन्सिबल आहे. मला याच संदर्भात म्हणावेसे वाटते की, जगात कोणीही कोणत्याही कामाकरिता इनडिस्पेन्सिबल नाही. माझी अशी निश्चित भावना आहे की, परमेश्वराखेरीज कोणीही इनडिस्पेन्सिबल नाही. परंतु जर एखादा मनुष्य उपयुक्त असेल आणि तो १०-१२ वर्षापासून काम करीत असेल तर तो राहिला पाहिजे, अशा विचाराचा मी आहे, आणि तसे माझे मत असणे स्वाभाविक आहे. मागे होमगार्डस् संघटनेसंबंधी मी अनेक वेळा बोललो होतो. १५ वर्षापासून माझा या संघटनेशी संबंध आहे. होमगार्डस् संघटना चांगले काम करीत आहे असा माझा विश्वास आहे, कारण ही संघटना बर्‍याच दिवसापासून काम करीत आहे आणि त्याचा उपयोग आहे, म्हणून ती आजपर्यंत टिकली आहे. या संघटनेचे काम व्हॉलंटरी नेचरचे आहे. ती संघटना व्हॉलंटरी सर्विस करीत आहे, असे आपण समजले पाहिजे. नुसत्या एका महाराष्ट्रातच ही संघटना काम करीत नसून संबंध हिंदुस्थानातील प्रत्येक राज्यात ही संघटना आज काम करीत आहे. मला या सन्माननीय सभागृहाच्या नजरेला ही गोष्ट आणावयाची आहे की, महाराष्ट्रातल्या होमगार्डस्चे काम आणि त्या कामाचे स्वरूप पाहून पंडित पंत, जेव्हा ते १९५६-५७ मध्ये मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्या कामाची स्तुती आणि वाखाणणी करताना असे म्हटले होते की, सबंध हिंदुस्थानच्या होमगार्डस्च्या संघटनेपेक्षा आमची ही संघटना अती उत्तम स्वरूपाची आहे आणि ती संघटना चांगले काम करीत आहे. माझे मित्र श्री.बर्धन आपल्या भाषणात म्हणाले की, विदर्भात पूर्वी जी होमगार्डस् संघटना होती ती फार चांगल्या स्वरूपाची होती आणि तेथे या होमगार्डसचे रीजनल ऑफिस होते. परंतु विदर्भ महाराष्ट्रात आल्यापासून तेथील रीजनल ऑफिस अबॉलिश करण्यात आले आणि म्हणून पूर्वी मध्यप्रदेशमध्ये असताना ती संघटना चांगले काम करीत होती, ती आता तितकीशी उपयुक्त नाही. त्यांचे हे विधान मला बरोबर दिसत नाही.

मला तरी असे वाटते ही महाराष्ट्रातील होमगार्डस् संघटना सबंध हिंदुस्तानात उत्तम प्रतीची म्हणून गणली गेली आहे. आता विदर्भ हा भाग महाराष्ट्रात आल्यामुळे स्वाभाविकपणे तेथे जी संघटना काम करते ती देखील चांगलीच म्हणावी लागेल. कारण विदर्भ आज महाराष्ट्राचाच एक भाग आहे. मला जास्त काही या बाबतीत बोलावयाचे नाही. कारण विदर्भाबद्दल त्यांच्याइतकी मला कदाचित् माहिती नसेल त्यांना तेथील जास्त माहिती असू शकेल. अध्यक्ष महाराज, मी येथे असेही म्हणू शकेन की, जेथे घाण असेल, जेथे वाईट असेल त्याचे रक्षण करावे असे माझे मत नाही. मी याबाबतीत त्यांना चेंबरमध्ये भेटावयाला तयार आहे. त्यांनी केव्हाही मला भेटावे. ते जे सांगतील ते मी ऐकून घेईन. त्यांच्याजवळ जी माहिती असेल ती त्यांनी मजकडे द्यावी. मी अवश्य त्याबद्दल चौकशी करीन. त्यांच्या मताने या संघटनेची आता आवश्यकता राहिलेली नाही. ते असे म्हणाले की, पर्पज काही सर्व्ह होत नाही. मला त्यांचे हे विचार मान्य नाहीत, कारण ज्या पर्पज करिता ही संस्था निर्माण करण्यात आलेली होती, ते पर्पज अजून काही संपले आहे, असे मला वाटत नाही. याचा अर्थ असाच करावा लागतो की, ही संघटना आपले पर्पज सर्व्ह करीत आहे, आणि त्या संघटनेचे राहणे अनेक दृष्टीने उपयुक्त ठरेल असे मला वाटते.