भाग १ विधानसभेतील भाषणे-६१

१७

सहकार्याबद्दल कृतज्ञता* (२५ मार्च १९६०)
-----------------------------------------------------------
महाराष्ट्र व गुजरात या द्विभाषिक राज्याचे सर्व विधान-सभा सदस्य, मंत्रीमंडळ व अध्यक्ष यांनी आपणांस चांगले सहकार्य दिले याबद्दल सभागृहासमोर कृतज्ञता व्यक्त करून मा. यशवंतराव चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.
-------------------------------------------------------------
*Bombay Legislative Assembly Debates, Vol. 10, Part II (Inside NO. 16), Friday, 25th March 1960, pp. 1079 to 1081.

अध्यक्ष महाराज, आज ज्या स्वरूपात ही विधानसभा आहे त्या स्वरूपात आजचा या विधानसभेचा शेवटचा दिवस आहे. अशा प्रसंगी, आपल्या परवानगीने मी माझ्या काही भावना या सभागृहासमोर ठेवू इच्छितो. गेली १५ वर्षे या सभागृहाला सन्माननीय सदस्य या नात्याने काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. या सभागृहात वेगवेगळया ठिकाणी बसून सभागृहाच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव प्राप्त करण्याचे सदभाग्य मला लाभले आहे. या अवधीत ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या मदतीने, कधी वाटून, कधी एकमताने काम केले असे या सभागृहाचे अनेक सन्माननीय सदस्य आज या सभागृहापासून कायदेशीररीत्या का होईना परंतु दूर जाणार असल्यामुळे मन किंचितसे उदास झालेले आहे. आज ज्या स्वरूपात हे राज्य आहे ते राज्य असेच चालवून यशस्वी होऊ शकले असते तर चांगले झाले असते यात शंका नाही, परंतु तसे ते होऊ शकले नाही ही परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थितीला मान देऊन हा निर्णय घेतल्यानंतर ज्यांच्याबरोबर काम करण्याचे सदभाग्य गेली तीन वर्षे मला लाभले ते गुजरातमधील, सौराष्ट्रमधील, कच्छमधील या बाजूचे आणि त्या बाजूचेही आमचे सहकारी आज दूर जाणार आहेत. या वियोगाच्या कल्पनेमुळे मनात जी उदासीनता निर्माण झालेली आहे ती या सभागृहासमोर नमूद करणे मी माझे कर्तव्य समजतो.

अध्यक्ष महाराज, गेली तीन वर्षे या सभागृहाचा नेता या नात्याने काम करण्याची संधी मला मिळाली आहे. या काळात माझ्या पक्षातील माझ्या सहकार्‍यानी, माझ्या मंत्रिमंडळातील माझ्या सहकार्‍यानी जे उत्कृष्ट सहकार्य मला दिले तसे सहकार्य, मला वाटते भारतीय संघराज्यातील इतर प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांना क्वचितच लाभले असेल. माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असणार्‍या माझ्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यानी ज्या निष्ठेने आणि शिस्तीने मला हा राज्यशकट हाकण्यात सहकार्य दिले ती शिस्त आणि ती निष्ठा आठवली की माझे मन एक प्रकारच्या कृतज्ञतेच्या भावनेने भरून येते. निष्ठा कशी पाळावी, शिस्त कशी पाळावी हे गुजरातचे वैशिष्टय आहे आणि राजकारणातील शिस्तीचे, निष्ठेचे शिक्षण गुजरातकडून घेण्यात आम्हाला कमीपणा वाटण्याचे कारण नाही अशी परिस्थिती आहे, आणि ही त्यांची आठवण माझ्या मनात कायमची राहील. माझे सहकारी, डॉक्टर जीवराज मेहता ३४ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांचा उल्लेख मला विशेषेकरून केला पाहिजे. मुंबई राज्याचे अर्थमंत्रीपद सांभाळण्यापूर्वी एक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. १९५२ साली या राज्याच्या अर्थमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर एक तज्ज्ञ अर्थमंत्री म्हणून जो लौकिक त्यांनी मिळविला आणि ज्या तर्‍हेने या राज्याच्या अर्थकारणाचा पाया त्यांनी मजबूत केला त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे सदैव ऋणी राहू. या वयातही प्रत्येक गोष्टीच्या तपशिलात जाऊन काम करण्याची त्यांची दुर्दम्य शक्ती तरुणांनाही अंतर्मुख होऊन विचार करावयास लावील अशी आहे. मला विश्वास आहे की, तरुणांनाही लाजविणार्‍या ज्या उत्साहाने त्यांनी काम केले त्यामुळे या राज्याच्या वाटणीलाही काही उत्कृष्ट परंपरा आल्या आहेत.

या परंपरांचा उपयोग भावी महाराष्ट्र राज्यात त्यांच्या जागेवर बसणारे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री निश्चित करून घेतील आणि महाराष्ट्राचे अर्थकारण मजबूत करतील. गुजराती आणि महाराष्ट्रीय समाज आज जरी कायदेशीररीत्या विभक्त होत असला तरी हा सर्व भारत देश एक आहे अशी शिकवण देणारे महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांच्या प्रतिमा या सभागृहात आहेत आणि या दोन राष्ट्रनेत्यांनी एकराष्ट्रीयत्वाचा जो धडा आम्हाला दिलेला आहे तो धडा आम्ही कधीही विसरणार नाही, विसरू शकणार नाही, हे मी आपणाला ठामपणाने सांगू इच्छितो. माझ्या म्हणण्यावर आपण विश्वास ठेवावा. या मुंबई शहरात किंबहुना महाराष्ट्र विभागात गुजराती समाज फार मोठया संख्येने राहणार आहे आणि त्यांचे साहचर्य आणि सहकार्य आम्हाला मिळतच राहणार आहे हे सांगावयास मला अभिमान वाटतो. आता गुजरातचे नवे राज्य निर्माण होणार आहे. काही वेळी आमचे मतभेद झाले तरी ते मतभेद बाजूला सारीत सारीत भावी काळात आम्ही उत्तम शेजारी या नात्याने एकमेकांचे सहकार्य आणि मदत घेऊन चालणार आहोत. शेवटी आम्ही एकाच राष्ट्रीय शक्तीचे दोन भाग, दोन अवयव आहोत अशी दृष्टी ठेवून काम करणार आहोत असे मी सर्वांच्या वतीने एक आश्वासन देऊ इच्छितो.