भाग १ विधानसभेतील भाषणे-१०४

जरूर ती माहिती जमविण्याचा आणि स्मृती उजळण्याचा प्रयत्न मी केला. गेल्या दोन-तीन वर्षांत पोलिसांची संख्या वाढलेली आहे आणि पोलिसांवरील खर्चही वाढलेला आहे या गोष्टी खर्‍या आहेत, काही प्रमाणात हेही खरे आहे की अपघातांची संख्या वाढली आहे, काही प्रमाणात हेही खरे आहे की प्रॉसिक्यूशनच्या केसेसच्या संख्येत वाढ झालेली आहे, या ठिकाणी जी आकडेवारी सांगण्यात आली ती खरी आहे, पोलिसांची संख्या वाढल्यावर गुन्ह्यांची संख्याही वाढावी हा थोडा चमत्कार आहे, पोलिसांची संख्या का वाढली आहे, पोलिसांचा खर्च का वाढला आहे, गुन्ह्यांची संख्या का वाढली आहे हा प्रश्न आपण समजावून घेतला पाहिजे, मी तरी तो स्वतः समजावून घेतलेला आहे, पोलीस कारभाराची जिम्मेदारी मी आमच्या पक्षाच्या वतीने आणि या सरकारच्या वतीने माझ्याकडे घेतलेली आहे, मी एवढेच स्पष्टपणे म्हणेन की, या दोन गोष्टींवरून पोलीस खात्याच्या कारभाराची कसोटी लावता येणार नाही, इकडे पोलिसांची संख्या वाढली की तिकडे अपघातांची संख्या वाढते असा संबंध आपण लावावयाचा असे ठरविले तर अपघातांची संख्या कमी होण्याकरिता पोलीस कमी करा, पोलीस कमी केले तर अपघातांची संख्याही कमी होईल असे तर आपण म्हणणार नाही ना? तर्काचा हा दुष्ट उपयोग आहे असे मी म्हणेन. अपघातांची संख्या आणि पोलिसांची संख्या यांचा काही संबंध नाही. पोलिसांची संख्या वाढलेली आहे याला काही कारणे आहेत, आपल्या नवीन महाराष्ट्र राज्यात तीन विभाग एकत्र आले याचा अर्थ तीन पोलीस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन्स एकत्र आली असा आहे, या खात्यात सुसूत्रतता आणण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता या खात्याला वाटली. मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई राज्याचा जुना विभाग यातील सगळया गोष्टींचा विचार करून, चर्चा करून एक गज (यार्डस्टिक) तयार करण्यात आला. प्रत्येक विभागातील लोकसंख्या विचारात घेऊन प्रत्येक विभागात किती पोलिस व पोलिस अधिकारी असावेत हे ठरविण्याच्या दृष्टीने एक गज तयार करण्यात आला आणि असा निर्णय घेण्यात आला की, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमागे पोलिसांची संख्या वाढविली पाहिजे. त्याशिवाय पगारमान व इतर गोष्टींच्या बाबतीत सर्व ठिकाणच्या पोलीस दलात सुसूत्रता आणावयाची होती. त्यामुळे या खात्याच्या खर्चात वाढ झाली. या खात्याचा कारभार जसा पुढे चालत आहे तशी पोलिसांची संख्या वाढत आहे असा यातील हिशोब नाही. या खात्याच्या कारभारात मध्यंतरी महत्त्वाचे बदल घडले त्याचे ही वाढ म्हणजे थोडेसे प्रतिबिंब आहे असा याचा अर्थ लावावा लागेल. अपघातांची संख्या वाढली आहे हे मी कबूल केलेले आहे. पण त्याला पोलिस खात्याचा कारभारच जबाबदार आहे असे कसे म्हणता येईल? हल्ली अपघातांचे प्रमाण एवढे वाढले आहे की मला स्वतःला असे वाटू लागले आहे की, सुरक्षिततेच्या दृष्टीने पुण्या-मुंबईचा प्रवास मोटारने करण्यापेक्षा विमानाने करणे जास्त सोयीचे आहे. अपघातांची संख्या वाढत आहे याला कारण पोलिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असे जर कोणी म्हणू लागले तर त्यांना अपघातांचा प्रश्नच समजलेला नाही असे म्हणावे लागेल. याला मूळ कारण असे की मुंबई शहरात नेहमीच लोकसंख्या वाढत असते आणि येथील विशिष्ट प्रकारचे जीवन पाहता ही लोकसंख्या नेहमी वाढतच राहणार अशी अपेक्षा आहे.आपण ज्या तर्‍हेचे औद्योगीकरण करीत चाललो आहोत आणि ज्या तर्‍हेचे औद्योगीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत त्याचे स्वरूप लक्षात घेता या शहराची लोकसंख्या कमी होणार नाही ही गोष्ट आपल्याला गृहीत धरावी लागेल आणि त्या दृष्टीने या शहरातील वाहनांची संख्याही वाढतच जाणार आहे. मी आजच ह्या बाबतीत चौकशी केली आणि काही आकडे पाहून घेतले तेव्हा असे दिसून आले की मोटारसायकलींपासून तो ट्रक्स, टॅक्सीज, प्रायव्हेट मोटारी, बसेस इत्यादी जी वाहने आहेत, त्यांची संख्या मुंबई शहरात ७० हजार आहे आणि त्याशिवाय देशाच्या अन्य भागातून रोज येथे जी वाहने येतात त्यांची संख्या जवळ जवळ १० हजार इतकी होईल. म्हणजे मुंबई शहराच्या रस्त्यावर रोज ८० हजार वाहने धावत असतात. अर्थात हिंदुस्थानात जी इतर मोठी शहरे आहेत त्यांच्या तुलनेत येथे अ‍ॅक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त आहे ही गोष्ट खरी आहे, आणि इतके असूनही दुसर्‍या मोठया शहरांतील लोक असे मानतात तेथील ट्रॅफिकची व्यवस्था इतर शहरांच्या मानाने चांगली आहे. अ‍ॅक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त असूनही हे लोक ट्रॅफिकची व्यवस्था चांगली आहे असे म्हणतात याचा अर्थ असा की, शहराच्या विस्ताराच्या मानाने आणि येथील वाहनांची रोजची जा ये पाहता त्या मानाने अ‍ॅक्सिडेंट्स कमी होतात याचे लोकांना आश्चर्य वाटते.