थोडक्यात सांगावयाचे म्हणजे वर्तमानपत्राचा खप हा एक महत्त्वाचा भाग, त्यानंतर त्या वर्तमानपत्राचा वाचकवर्ग कोणत्या स्वरूपाचा असतो, त्या वर्तमानपत्राचा दृष्टीकोन कितपत वास्तववादी आहे, या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. निव्वळ निंदाव्यंजक स्वरूपाचा मजकूर असणारे, निव्वळ कुचेष्टा करणारे तर ते वर्तमानपत्र नाही ना, या गोष्टींचाही विचार जाहिराती देताना केला जातो. मी आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या विचारात घेऊन वर्तमानपत्रांना जाहिराती दिल्या जातात. याबाबतीत महाराष्ट्र सरकारने असे धोरण ठेवलेले आहे की इंग्रजी भाषेच्या वर्तमानपत्रांच्या जोडीला देशी भाषेच्या - मराठी भाषेच्या - वर्तमानपत्रांकडेही अधिक लक्ष दिले पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना जाहिरात देणार्या अधिकार्याना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा वर्तमानपत्रांनाही जाहिराती देण्याबाबत अधिक लक्ष घातले गेले पाहिजे असा आमचा दृष्टीकोन आहे. वृत्तपत्रीय जीवनात पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणांहून निघणार्या वृतपत्रांना जास्त महत्त्व आहेच, परंतु जिल्हा पातळीवर निघणार्या वर्तमानपत्रांना आजच्या काळात फार महत्त्व आहे. त्यांचे आजपर्यंतचे कामही मोठे आहे. त्यांनी केलेली महाराष्ट्राची सेवा डोळयांत भरणारी आणि अंतःकरणाला भिडणारी आहे. या मोठया शहरातील वर्तमानपत्रांच्या खपाच्या मानाने त्यांचा खप कमी असला तरी त्यांना जाहिराती देण्यातून वगळता कामा नये असा दृष्टीकोन आम्ही ठेवलेला आहे.
श्री.अत्रे यांनी आणखी एका गोष्टीचा उल्लेख या संदर्भात केला. त्यांनी असे म्हटले की आम्ही ज्या काही गोष्टी वर्तमानपत्रात छापतो त्या जोपर्यंत सरकारकडून कॉन्ट्रॅडिक्ट होत नाहीत तोपर्यंत त्या खर्याच आहेत असे मानले पाहिजे. आम्ही शक्यतो कॉन्ट्रॅडिक्शन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मराठयातील किती बातम्या दुरुस्त करणार? म्हणून त्यांच्या वाटेला मी जात नाही. अर्थात ते जे लिहितात ते सगळेच खोटे असते असे नाही, केव्हा केव्हा ते खरेही असते. आज त्यांनी जो उल्लेख केला तो थोडा फार खरा आहे.
त्यांनी आज ज्या गोष्टीचा उल्लेख केला ती गोष्ट त्यांनी आपल्या पत्रात टीकात्मक दृष्टीकोनातून लिहिलेली होती. 'महाराष्ट्र दर्शन' नावाचा एक अनुबोधपट महाराष्ट्र सरकारने श्री.के.जी.देशमुख आणि पार्टनर्स यांच्याकडून तयार करवून घेतला आहे. याच पद्धतीने इतरांकडूनही आम्ही अनुबोधपट तयार करवून घेत असतो. काही माणसांनी आपल्या कल्पना आणि अनुभव यांच्या साहाय्याने एखादा अनुबोधपट तयार केला किंवा करावयाचे ठरविले तर हे सरकार त्यांच्याकडून तो अनुबोधपट जरूर घ्यावयास तयार असते. या कंपनीचे पार्टनर्स कोण कोण व किती आहेत याची काही तपशीलवार माहिती मला नाही. या अनुबोधपटाची किंमत म्हणूनच त्या कंपनीच्या एका पार्टनरच्या नावाने महाराष्ट्र सरकारने एक चेक दिला. त्या कंपनीचा एक पार्टनर म्हणजे एक वर्तमानपत्राच्या संपादकाची मुलगी होती ही गोष्ट खरी आहे पण त्याला आम्ही काय करणार? त्या मुलीच्या नावाने आम्ही जर चेक दिला असेल तर त्यात बिघडले कोठे? श्री. अत्रे यांचा दुसरा प्रश्न असा की तो अनुबोधपट अजून दाखविला का नाही? तो अनुबोधपट अद्याप सेन्सॉरकडून पास होऊन यावयाचा आहे, तो तेथून आल्यानंतर जरूर दाखविण्यात येईल. झाकून ठेवण्याकरिता काही तो सरकारने विकत घेतलेला नाही. त्याचा आपल्या राज्याला उपयोग होणार असल्याने सरकारने तो विकत घेतलेला आहे. पूर्वीही 'मंगल कलश' नावाचा अनुबोधपट सरकारने घेतलेला आहे. रॉयल्टी देऊन या अनुबोधपटाच्या काही कॉपीज सरकारने घेतलेल्या आहेत. अनुबोधपटांच्या निर्मितीसाठी याच पद्धतीने काम करावे लागते. ही हकिगत यासंबंधात मी सभागृहासमोर ठेवलेली आहे.
सन्माननीय सभासद श्री. अत्रे यांनी श्री.ह.रा.महाजनी ५६ (टिपा पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांना सरकारकडून भाषांतराचे काम देण्यात आले आहे अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केला. अशा प्रकारचे काम राज्यातील अनेक विद्वानांना दिलेले आहे. श्री. महाजनी यांची या क्षेत्रातील योग्यता श्री. अत्रे यांनी कबूल केलेली आहेच. श्री. महाजनी हे पहिल्या प्रतीचे संपादक आहेत, बुद्धिमान गृहस्थ आहेत, पंचवार्षिक योजनेसारखे महत्त्वाचे पुस्तक भाषांतरित करण्याकरिता त्यांनी आपली शक्ती दिली, आपल्या बुध्दीचा उपयोग करू दिला या गोष्टीचे आपण स्वागत केले पाहिजे. श्री. महाजनी हे एक स्वतंत्र बाण्याचे संपादक आहेत. त्यांच्याकडून भाषांतराचे काम करवून घेतले यात वाईट काहीच नाही. श्री. महाजनी यांच्यावर काही फेव्हर करावी म्हणून त्यांना काही हे काम दिलेले नाही. ते स्वतंत्र वृत्तीचे संपादक आहेत. ते मला कधी चांगले म्हणतात तर कधी वाईटही म्हणतात. ते स्वतंत्र बुध्दीचे आहेत. आजचा अग्रलेख पाहा. त्यांनी काही आमच्या बाजूने लिहिलेले नाही. संपादकाने स्वतंत्र बुध्दीनेच लिहिले पाहिजे. संपादक हा असाच राहिला पाहिजे असे माझे मत आहे. मी एवढेच सांगेन की जाहिराती देण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची पक्षबाजी करून काम करावे असा आमचा दृष्टिकोन नाही. इतःपरही विरोधी पक्षाच्या माझ्या मित्रांना मी सांगेन की, यासंबंधी काही स्पेसिफिक सूचना त्यांच्याकडून आल्या तर त्याबाबतीत आम्ही जरूर विचार करू. विरोधी पक्षाच्या चांगल्या सूचनांचा सरकार सन्मान करू इच्छिते एवढेच मला या ठिकाणी सांगावयाचे आहे.
---------------------------------------------------------------------------
On 28th June 1962, Shri Y.B.Chavan, Chief Minister, replying to the cut motion brought before the House regarding adoption of his daughter's son by the Maharaja of Kolhapur and Government's role in the matter. He informed the House that he had conveyed to the Home Minister that in the case of adoption His Highness's wishes would be respected.