भाग १ विधानसभेतील भाषणे-९६

सन्माननीय सभासद श्री.म्हाळगी यांनी श्री.बर्वे ५२ (टिप पाहाण्यासाठी येथे क्लिक करा) यांच्यासंबंधी एक प्रश्न उपस्थित केला. याबाबतीत मी स्वतः फार जागरूक आहे. जेव्हा चीफ मिनिस्टर्स रिलिफ फंडाचे काम करण्यासाठी आम्हाला माणसांची गरज होती त्यावेळी मी स्पष्ट सांगितले होते की, ज्यांना निवडणुकीला उभे राहावयाचे असेल त्यांनी हे काम आपल्या शिरावर घेऊ नये आणि अध्यक्ष महाराज, मी आपणाला सांगू इच्छितो की, अशा लोकांना आम्ही हे काम दिले नाही. कारण हे काम दोनचार दिवसाचे नव्हते तर बरेच दिवस चालणारे असे हे काम आहे म्हणून जे लोक निवडणुकीला उभे राहणार असतील अशा लोकांना आम्ही हे काम दिले नाही. आज श्री.बर्वे हे निवडणुकीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडे कोऑर्डिनेशन कमिटीचे कोणत्याही प्रकारचे काम नाही. कोऑर्डिनेशन कमिटी डिफंक्ट झाली आहे, तेव्हा त्या कमिटीचे कोणत्याही प्रकारचे काम श्री.बर्वे करतील हे कसे संभवनीय आहे? सन्माननीय सभासद श्री.म्हाळगी यांनी येथे श्री.बर्वे यांच्या नावाचा उल्लेख केला तेव्हा ते त्यांच्याविरुद्ध उभे आहेत की काय असा मला संशय येत होता. सन्माननीय सभासद श्री.म्हाळगी यांच्याविरुद्ध कोण उभे आहे ही गोष्ट जरी मला माहीत नसली तरी असा संशय माझ्या मनात आल्यावाचून राहिला नाही. श्री.म्हाळगी यांच्या माहितीकरिता मी पुन्हा सांगू इच्छितो की, कोऑर्डिनेशन कमिटी डिफंक्ट झाली आहे; तेव्हा श्री.बर्वे यांना कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष म्हणून कोणी मत देण्याचा प्रश्न उत्पन्न होत नाही. येथे श्री.बर्वे यांचे नाव घेऊन उल्लेख करण्यात आला म्हणून मी ह्या सर्व गोष्टींचा खुलासा केला.

अध्यक्ष महाराज, मी सभागृहाला सांगू इच्छितो की, इलेक्शन कमिशन आणि हिंदुस्थान सरकार याबाबतीत फार जागरूक आहे, या देशातील मतदारसुध्दा फार जागरूक आहे आणि विरोधी पक्ष तर अत्यंत जागरूक आहे, तेव्हा कोणत्याही प्रकारे कोणाला तक्रार करावयास जागा राहणार नाही अशी सरकार खबरदारी घेईल इतके आश्वासन मी देऊ इच्छितो. हा ठराव सभागृहापुढे आणून सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याची संधी दिल्याबद्दल मी सन्माननीय सभासदांचा आभारी आहे. इतके बोलून मी आपले भाषण संपवितो.
-----------------------------------------------------------------------
On 8th December 1961, the Opposition tabled a cut motion regarding use of Government vehicles and administrative machinery during General Elections. Replying, the Chief Minister, Shri Y.B.Chavan, said that Government had issued instructions by bringing out circulars that Ministers and representatives of the Congress Party should not use Government vehicles for the General Election purposes, and that this order would remain in force for two months, one month before and after the Elections.