व्याख्यानमाला-१९९५-९६-६७

यशवंतरावांच्या पैलूंविषयी मी सुरुवातीस जे सांगितले की, असंख्य पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात कसे साध्य झाले हे एक कोडे आहे. राजकारणी विचारवंत असू शकतात, लेखक असू शकतात, त्यांला निरनिराळे छंद असू शकतात. पण कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीशी यशवंतरावांचा जेथे जेथे संबंध आला तेथे तेथे त्यांनी अशी भावना निर्माण केली की या माणसाने आपले जीवन त्याच क्षेत्रामध्ये का नाही घालविले ? एक उदाहरण म्हणून मी आपल्याला प्राध्यापक ना. सी. फडके यांनी लिहिलेल्या "इथे झाला सुंदर संगम तीन अनमोल गुणांचा", हे आपण जरूर वाचावे म्हणून विनंती करेन. आपल्या भाषाशैलीत एक आदर्श राज्यकर्ता म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या विषयी जेवढा आदर व्यक्त केला तेवढाच त्यांनी साहित्य आणि वक्ता म्हणून, एक साहित्यिक म्हणून यशवतरावांनी जगायचं ठरवलं असतं, तर मराठी भाषा कितीतरी पटीने समृद्ध झाली असती या विषयी काही शंका नाही. त्या विषयी ना.सी.फडके म्हणाले, 'यशवंतरावांची प्रभावी वाणी जशी स्पृहणीय आहे, तसाच त्यांच्या लेखणीचा संचारही कौतकास्पद आहे. यशवंतरावांचं पडलेलं भाषण जसं कधी कुणी ऐकलेले नाही. त्याचप्रमाणे त्यांचा फसलेला लेख मी कधी वाचलेला नाही.' भावनेने ओथंबलेले, प्रभावी भाषेनं नटलेले लेखन जी लेखणी करु शकते, ती साधी-सुधी लेखणी नाही. श्रेष्ठ दर्जाच्या अस्सल साहित्यिकाच्या हातात शोभावी अशीच ती आहे.

त्यांचे पुस्तकावरचे प्रेम कराडवासियांना सर्वश्रुत आहे आणि आपले सौभाग्य आहे की त्यांचे संपूर्ण ग्रंथालय वेणूताई चव्हाणांच्या स्मृतिप्रित्यर्थ कराडात आहे. त्यांचे पुस्तकावरचे प्रेम एवढे होते की परदेशात कोठेही आणि केव्हाही गेले तरी तेथील मोठमोठ्या पुस्तकालयांना जे जरुर भेट देत. पुस्तकांबद्दलच्या प्रेमाविषयी बोलताना ते म्हणाले, "ग्रंथवाचनाने माणूस मोठा झाला नाही तरी शहाणा मात्र जरुर होतो. " आपल्या अनुभवाबरोबर त्यांनी हेही पुढे म्हणले की, " जसे मोठे लोक शहाणे नसतात, त्याचप्रमाणे सर्व शहाणे लोक मोठे शकत नाहीत."

ते इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. आपण जर त्यांची पुस्तके पाहिली तर त्यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांच्या आठवणी, आत्मचरित्रे व इतिहासाची पुस्तके बघावयास मिळतील. ते करण्यामध्येही त्यांची काही तात्विक भूमिका होती. त्यांच्याच शब्दात म्हणावयाचे तर 'वर्तमान काळ समजण्यासाठी इतिहासाचे चिंतन करावे लागते. कारण वर्तमान काळांशी झगडणा-या माणसाला भूतकाळ समजण्याची जर अक्कल नसेल तर वर्तमान काळाशी तो फारसा झगडू शकणार नाही.'

मी सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे यशवंतरावांच्या अनेक पैलूपैकी काही निवडक पैलूंविषयीच मी आतापर्यंत बोललो आहे. ह्या सर्व पैलूंमध्ये, हि-यामधून जशी हिरकणी निर्माण केली जाते, तसेच थोडक्यात यशवंतरावांविषयी बोलले जाते की, "आता यशवंतराव एक व्यक्ती राहिली नसून तो एक विचार म्हणून राहिला आहे."

ह्या उपमेचा उगम, त्यांचा अनुभव, त्यांनी कारावासात काढलेले आयुष्य, निरनिराळ्या राजकीय शास्त्रांचे मनन, चर्चा व चिंतन ह्यात आहे. त्यांच्याच शब्दात म्हणावयाचे तर, "१९४० पासूनची वैचारिक बैठक, राजकीय प्रवासातील माझी कायमची सोबत झाली आहे. ह्या विचारमंथनात, आर्यभूषण भवनाच्या शेजारच्या गुडलक रेस्टॉरंटचाही भाग आहे. १९३९ साली लॉ कॉलेजला असताना गुडलकमध्ये पिवळा हत्ती सिगारेटचा धूर सोडीत व तो पहात मी तासन तास काढी."

ह्याच विचाराने परिपक्क झालेला नेता म्हणून व एक विचारवंत राजकीय पुरुष, व आपल्या विचारांचा वारसा पाठीमागे ठेवून, यशवंतरावांनी आपल्यासाठी एक अमाप खजिना ठेवला आहे. त्याचा उपयोग, तसाच त्याचा उपभोग कसा करावा हे आपल्यावर अवलंबून आहे.

मी या अगोदरच यशवंतरावांचे लोकशाहीवरील विश्वास व राज्यकारभाराच्या कसोटीच्या विषयी बोललो आहे. पण कित्येक वेळा विचारात आणि आचरणात बरीच फारकत होऊ शकते याचा यशवंतरावांना जाणीव होती. या विषयी एक आठवण म्हणून त्यांनी अहमदाबाद येथे २७ जानेवारी १९६१ रोजी केलेल्या भाषणाचा मी उल्लेख करु इच्छितो.