महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी शिक्षण किती आवश्यक आहे हे आग्रहाने सांगण्याचा पहिला मान म. जोतिबा फुले यांच्याकडे जातो. पेशवाई बुडाल्यानंतर इंग्रजांची राजकीय गुलामी सर्व देशावर पक्की स्वार झाली. पण या इंग्रजी गुलामीचे सर्वसामान्य लोकांनी स्वागतच केले म्हणजे त्यापूर्वीची अवस्था या गुलामीपेक्षाही अधिकच जाचक, भयंकर होती. तिचा शोध घेतांना म. जोतिबांना सामान्य माणसांच्या “मानसिक गुलामगिरीचा” शोध लागला ब्राह्मण धर्माने चातुर्वर्ण आणि कुटील विष्णुगुप्त चाणक्याने जो द्विवर्ण रूढ केला त्याचा अतिरेक पेशवाईने केला. ब्राह्मण सोडून सारे शूद्र, आणि शूद्र हे विद्या, सत्ता, संपत्ती धारण करण्यास जन्मतःच अपात्र अशी शिकवण धर्म समाज कसा जनावरांचे जिणे जगतो हे म. फुले यांनी समजून घेतले आणि त्यानंतरच इंग्रजी गुलामी विरुद्ध शस्त्र हाती घेण्यापेक्षा, या हाडीमांशी खिळलेल्या मानसिक गुलामी विरुद्ध बहुजन समाज जागा करणे, संघटित करून लढणे, हेच त्यांनी आपले जीवन कार्य मानले. सार्वत्रिक शिक्षण हाच सामान्य जनगणांच्या उद्धाराचा मार्ग आहे हे सत्य शोधून काढताच त्यांनी अस्पृश्यांच्या मुलींच्या शिक्षणापासून म्हणजे जातीवर्ण व्यवस्थेच्या उतरंडीतील तळच्या गाडग्याला हात घालून, आपल्या क्रांती कार्याला सुरुवात केली. त्यांचा तो “अखंड” अभंगासारखा सर्वतोमुखी आहे. “विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीतीवा गती गेली, गती विना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येनेकेले...”
१८८३ सालच्या सुमारास इंग्लंडच्या महाराणीचा पुत्र प्रिन्स ऑफ वेल्स हा हिंदुस्तानच्या भेटीस आला होता. त्यावेळी त्याच्या स्वागताचा एक दरबार पुणे येथे भरविला होता. त्या दरबारांत झाडून सारे मांडलिक राजे, महाराजे, संस्थानिक भरजरी वस्त्रे, झुली, दागिने, मानचिन्हे घालून हजर होते. इतर निमंत्रितात राव बहादूर, रावसाहेब, बडे बडे व्यापारी, कारखानदार, अम्मलदार होते. महात्मा जोतिबांनाही समाजसुधारक कार्यकर्ते म्हणून निमंत्रण होते. दरबाराच्या स्वागत कमानीतच म. फुलेंना अडविले. कारण ते साध्या शेतक-याच्या वेषात दरबाराला आले होते. स्वागत करणारांना वाटले, कोण हा भिकारडा माणूस एवढ्या मोठ्या दरबारात शिरतोय? पण तेवढ्यात कुणी तरी जोतिबांना ओळखले आणि त्यांना स्टेजवुर नेऊन बसवले. महाराणीच्या युवराजांच्या स्वागतासाठी इंद्राचा दरबारच सजविला होता. त्या दरबारांत प्रिन्स ऑफ वेल्सला उद्देशून मा. जोतिबा फुल्यांनी सात मिनिटाचे जे इंग्रजी भाषण केले ते सामान्य प्रजेच्या वतीने केलेले “वन मॅन डेमोन्स्ट्रेशन” च होते. जोतिबा म्हणाले..... "युवराज महाराज, साता समुद्रापलीकडून हिंदुस्थानातील आपल्या प्रजेला भेटायला आपण आलांत याबद्दल सारी प्रजा आपणांस धन्यवाद देत आहे. परंतु ती प्रजा म्हणजे या दरबारांत झुली, दागदागिने, भरजरी वस्त्रे लेवून बसलेली ही मंडळी नव्हे. खरी प्रजा अशी माझ्यासारखी फाटकी. तुटकी वस्त्रे लेवून, उपासपोटी जगणारी करोडोच्या संख्येने या दरबाराबाहेर आहे. त्या प्रजेच्या वतीने आपल्यापुढे एकच मागणे मागतो. ही प्रजा अशिक्षित, निरक्ष आहे. अशी १७ कोटी प्रजा निरक्षर असून जनावरांचे जिणे जगत आहे. त्यांना शिक्षण द्या. तुम्ही परत इंग्लडंला जाल त्या वेळी तुमच्या आईला राणीसाहेबांना माझा एवढा निरोप द्या, की हिंदुस्थानच्या प्रजेला शिक्षण हवे आहे. त्यांना शिक्षण द्या एवढे एकच माझे मागणे राणीसाहेबांच्या, तुमच्या आईच्या कानावर घाला.”
त्यानंतर प्रिन्स ऑफ वेल्स परत गेला. म. जोतिबाही गेले. काँग्रेसच्या एका अधिवेशनापुढे पुन्हा तसाच एक शेतक-यांचा पुतळा उभा करून गेले. स्वातंत्र्याची चळवळ झाली. इंग्रज देश सोडून गेला. इंग्रजांची राजकीय गुलामी संपली. स्वातंत्र्य मिळवून आता ५० वर्षे होत आली. पण परिस्थिती का आहे? म. फुल्यांच्यावेळी १७ कोटी निरक्षर होते. आता आपल्या भारतात ४५ कोटी निरक्षर लोक आहेत. आता कुणाच्या आईला कुणी जाऊन म. फुलेंचा सांगावा सांगायचा? की स्वतंत्र भारतात ४५ कोटी लोक निरक्षर असून जनावरांचे जिणे जगताहेत!
गोपाळ कृष्ण गोखले, राजर्षी शाहू महाराज, म. गांधी अशा राष्ट्रीय नेत्यांनी सार्वत्रिक शिक्षणाचा आग्रह धरला. महाराष्ट्रांत स्वातंत्र्यपूर्व काळातही कोल्हापूर, सातारा, अमरावती अशा ठिकाणी शिक्षणक्षेत्रांतील कर्मवीरांनी शिक्षण प्रसारासाठी रात्रीचा दिवस केला. भारतीय राज्यघटनेतही सार्वत्रिक शिक्षणाचे कलम घातले. चौदा वर्षे वयापर्यंत प्रत्येक मुलामुलीला सरकारने मोफत शिक्षण, सक्तीने द्यावे आणि ते घटना अमलात आल्यापासून १० वर्षात द्यावे. असा मुदतबंध कार्यक्रम सरकारला दिला.