व्याख्यानमाला-१९७६-१२

भारतीय समाजाच्या परिवर्तनाची दिशा व वेग हा विषय घेत असताना माझ्या मनासमोर हा वर्तमानकालोन संदर्भ होता. आणि माझी अशी खात्री आहे की या देशामध्ये याच्यापुढे एअरटाईट कंपार्टमेंट मधील विषयांची चर्चा कमी होईल तितकी बरी. पण त्यामुळे ज्याचं पोट उपाशी असतं त्याला काहीच मिळत नाही. आणि शब्दाच्या शृंगारिक आणि आकर्षित आतिषबाजीने भूकेपोटी व्याकुळलेल्या माणसाला समाधान लाभत नाही आणि म्हणून अशा एका वर्तमानकालीन संदर्भावरतीच आपण बोललं पाहिजे असे माझ्या मनांन ठरविल्यामुळे मी हा विषय घेतला. सामाजिक परिवर्तनाचा असा कोणता मार्ग आपण स्वीकारतो आहो? त्यातून काही कटुता येईल. मनाविरूध्द करावं लागेल, संयम पाळाला लागेल, स्व:ताच्या सुखाला कात्री लावावी लागेल आणि समाजाची तशी तयारी होण्यासाठी तशा प्रकारचा विचार समाजापर्यंत पोहोचला पाहिजे असं मला वाटतं. कारण या देशामध्ये ६० टक्यांहून लोक दारिद्रयाच्या रेषेखाली जगतात ही काही या देशाला मोठी भूषणावह गोष्ट नव्हे. हे ज्यांनी आतापर्यंत उपभोग घेतले त्यानी पहिल्यांदा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून आपली जादा जमीन काढून घेतली म्हणून दु:ख करण्याचे किंवा आपल्या हक्कांवरती गदा येते असं मानण्याचं काही कारण नाही. परंतु ज्या समतेचा, स्वातंत्र्यांचा, बंधुत्वाचा आपण उद्घोष करतो याच्यावरतीच आधारलेलं हे राजकारण आहे. याच्या बाहेरचं नाही. त्याला तडा जाऊ नये.

समाजवादाची आजची कल्पना बदललेली आहे. ती सगळ्या मनुष्यामात्रामध्ये असलेल्या एकत्वाचा शोध घेण्याच्या दृष्टीने जी एक नवीन रचना, अर्थरचना आणि सामाजिक रचना आपणाला करायची आहे. त्याला प्रौढ समाजवाद असं एक नवीन नांव आलेलं आहे आणि म्हणून काही विचारवंत त्याला मॅच्युअर सोशॉलिझम (Mature Socialism) असं म्हणतात. परिपक्व समाजवाद! कारण यापूर्वी होऊन गेलेल्या अनेक घटनांचा, अनेक अनुभवांचा आधार घेऊन त्यात काय काय बदल करायचे हे ठरवून त्याच्या प्रमाणें त्या मूल्यांची पुनर्रचना करत जायचं असल्यामुळे काही गोष्टी मुक्त ठेवून, कांही गोष्टी बंधनात टाकून या गोष्टी साधाव्या लागणार आहेत. असा विचार त्या दृष्टीने आज समाजामध्ये येतो आहे आणि म्हणून हा एक दुसरा विचार तुमच्या विचारासाठी मी ठेवतो. या आर्थिक परिवर्तनाच्या संदर्भामध्ये आमचं नियोजन काही ठिकाणी यशस्वी होऊनसुध्दा कृषि प्रधान अर्थ व्यवस्था दुष्काळाच्या तावडीतून पुन्हा बाहेर काढण्याचा उमेदीचा प्रयत्न करून सुध्दा, उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती करून सुध्दा ही आर्थिक पुनर्रचना करण्याच्या बाबतीत आपण यशस्वी झालो नाही असं दु:ख या सामाजिक परीवर्तनाच्या दृष्टीने महत्वाचे असल्यामुळे हा विचार मी आपल्यापुढे मांडला आणि त्याच्या संदर्भात तिस-या विचाराकडे येतो.

खरं म्हणजे हे सगळं करण्यासाठी जी एक मानसिक परिवर्तनाची बैठक लागते दुर्दैवाने तीच सबंध स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण गमावून बसलेलो आहोत. मार्क्स तत्वाज्ञानामध्ये सांगितलं गेलं की समाजाची बाह्य परिस्थिती सुधारली, त्याला खायला प्यायला चांगलं मिळालं, त्याला समाधान लाभलं, त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या, की त्याचे विचार आपोआपच बदलायला लागतात त्याच्या विचारामध्ये मुद्दाम क्रांतीकरण्याची गरज पडत नाही. त्याच्या बाह्यसृष्टीमध्ये त्याच्या बाह्य जीवनामध्ये फरक पडला की आपोआपच त्याच्या विचारांमध्ये फरक घडतो, दुर्दैवाने या देशामध्ये हे सत्य लागू पडणारं नाही. या देशामध्ये बाह्यकारी बदल जरी आपण केले, बाह्यकारी जरी लोकशाही आणली, बाह्यकारी आपण सामाजिक पुनर्रचनेचा, आर्थिक पुनर्रचनेचा विचार केला तरी मनामध्ये अजून जी क्रांती व्हायला पाहिजे ती झालेली नाही. म्हणून अप्रामाणिकपणे संपत्ती जमवणारे लोक या देशामध्ये जास्त संख्यने आहेत. म्हणून स्वार्थावर ती आधारलेली व्यक्तिजीवने उभारणारे लोक या देशामध्ये आहेत. त्याच कारण हे आहे की जी मानसिक क्रांती अभिप्रेत असते ती मानसिक क्रांती अजून या देशामध्ये झालेली नाही. हे मानसिक परिवर्तन झाल्याशिवाय या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिवर्तनाला पूर्ण अर्थ कधीच प्राप्त होणार नाही. हि छोटी छोटी उदाहरणे देऊन सांगता येईल राजकीय क्षेत्रामध्ये आपण जी लोकशाही आणली. मतदानाचे हक्क वगैरे आणले. मतदानाच्या हक्काची सामर्थ्ये अजून आपल्या मनाला कितपत कळलेली आहेत ? ब-याच वेळेला त्या बाबतीत निराशाच पदरात येते. आज एक लेख कुठेतरी वाचला. स्त्रिया फार सुधारल्या असं आपण म्हणतो. फार सुधारणा झाली. वैचरिक सुधारणा झाली, त्यांना कायद्याने अधिकार मिळाले. समान हक्क मिळाले. स्त्रीला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. पण मतदान कसे होत होते? पातिव्रत्याच्या कल्पनेचा तिच्या मनावरती इतका पगडा असतो की त्या पातिव्रत्याचा भंग करतो असं वाटत असल्यामुळे आपल्या नव-याचं जे मतअसेल तेच आपले मत; आपलंही मत त्याच पेटीत जाणार असं एक उदाहरण एका स्त्रीच्या संदर्भात आजच कुठेतरी एका लेखामध्ये वाचलं. वाचल्यानंतर लक्षात आलं की मी जी मानसिक क्रांती अभिप्रेत आहे असं म्हणतो ती मानसिक क्रांती इथं अपेक्षित आहे. पातिव्रत्याची एकाकाळी समाजाच्या आवश्यकतेनुसार निर्माण झालेली कल्पना लोकशाहीच्या मूल्याशी जर आपण जोडली तर ते लोकशाहीचं मूल्यच आपण गळा घोटून मारून टाकतो हे आपल्या लक्षात येत नाही. जे मूल्य एका काळामध्ये प्रतिष्ठित झालं  ते मूल्य नवीन काळामध्ये प्रतिष्ठित झालेल्या मूल्याला हात लावून त्या मूल्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तर  काहीच साधत नाही. धड पातिव्रत्यही साधत नाही धड लोकशाही ही साधत नाही. आपणाला नेहमीच्या उदाहरणांत आढळते की देवीच्या रोगाच्या बाबातीत किती अपसमज लोकांच्या मनात असतात. देवी म्हणजे कुठलीतरी आधिदैविक अशा प्रकारची शक्ती असल्यामुळे देवीची माहिती कळवायची नाही, अंगारे धुपारे करत रोग बरा होईल म्हणून प्रयत्न करायचे डॉक्टर वगैरे आला तर त्याला सांगायचे नाही ! मेडिकल सायन्स इतकं पुढं जाऊन सुध्दा, विज्ञानाने हे सिध्द करून सुध्दा, या माणसाच्या मनापर्यंत या विज्ञानाचा विचार पोहोचलेलाच नाही. म्हणून डॉक्टर आला की रोगी पळावयाचा. माहिती कळवायची नाही. नुकतेच एका घरात देवीची लागण झाल्याची बातमी एका मनुष्याने दिल्यामुळे त्या मनुष्याला जाळून मारण्यात आल्याचे उदाहरण वर्तमान पत्रांत मी वाचले. अशा विसंगती आपल्या जीवनात आहेत. ह्या विसंगती असल्यामुळे जे राजकीय परिवर्तन होतयं, जे सामाजिक, आर्थिक परिवर्तन होतंय त्या सामाजिक, आर्थिक राजकीय परिवर्तनाचे सगळे लाभ हे मातीत जिरून जाणा-या पाण्याप्रमाणे निष्फळ जिरून जातात. कितीतरी बाबतीत. अजूनही आधिदैविक, धार्मिक अशा प्रकारच्या समजुती वरती अवलंबून राहिल्यामुळे या नव्या मूल्यांची आज एक शोकांतिका होऊन एक संभ्रनावस्थेत आपला समाज सापडलेला आहे. म्हणून या मानसिक क्रांतीची आजच्या घटकेला आधिक गरज आहे.