व्याख्यानमाला-१९७६-१३

केवळ माणसाला पोटाला चांगलं खायला दिल्यावर भागणार नाही. हे चांगले खायचं ? ते कसं निर्माण करायचे ? हा विचार जर त्याच्या पर्यंत पोहोचणार नसेल तर त्याच्या नुसत्या खाण्याला अर्थ नाही, म्हणून त्याच्या पोटापर्यंत पोहोचत असताना त्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचा सुध्दा प्रयोग केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या गेल्या वाटचाली मध्ये आपण त्याच्या शरिरापर्यंत पोहोचण्याचा प्रयोग केला. त्याच्या बाह्यांगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सार्वजनिक जीवनाला आकार देण्याच्या दृष्टीनं, त्याला तसे शिक्षण देण्याच्या दृष्टीनं, तसे विचार रुजविण्याचा दृष्टिनं काही अल्पसे प्रयोग झाले असतील परंतु त्यात फारसे यश आले नाही. या देशात आगरकर जन्माला येवून सुध्दा बुध्दिनिष्ठा आणि विवेकनिष्ठा या देशात रुजलेली नाही. ज्योतिबा फुले या देशात जन्माला येऊन सुध्दा, राजर्षी शाहू सारखा एक समाजसुधारक नेतृत्त्व देणारा राजा होऊन सुध्दा, ख-या अर्थाने समानता अजून आमच्या समाजामध्ये आलेली नाही. याचे कारण काही एका संकेतांचं, काही एका जुन्या विचार प्रणालींचं, परंपरेचं असं एक प्रचंड दडपण आपल्या मनावरती असतं. त्याच्यातून अजून आपण बाहेर पडू शकत नाही. जातीभेदाचं उदाहरण घ्या. कितीतरी सामाजिक चालीरीती आहेत. हुंडयाच्या चालीरीती वरती पंतप्रधान तर रोजच बोलतात. अशा कितीतरी बुरसलेल्या कल्पनांच्या चौकटीत आमचे आत्मे गुदमरलेले असल्यामुळे; धर्मकल्पनांमध्ये, भूताखेताच्या कल्पनांमध्ये जुन्या चाली रीतीमध्ये हे सगळे आमचे आत्मे गुदमरलेले असल्यामुळे-बाह्य करणी आमच शरीर जरी सुधारल्या सारखं दिसत असलं तरी ख-या अर्थाने ते सुधारलेलं नाही. अंतर्गत विरोधामुळे प्रगतीची जेवढी फळं आम्हांला मिळाली पाहिजे. तेवढी मिळत नाहीत. हरिजनांना कायदयाने पूर्ण अधिकार दिले. समानता दिली सगळं काही दिल. पण अजूनही एखादा हरिजन गाडीमध्ये जवळ येऊन बसू लागला तर सवर्ण अंगचोरून बसतो. आपल्या अंगरख्याला माती लागेल म्हणून एखादा गरीब शेतकरी आतल्या बाजूला येऊन बसला तर आपण अंग संकोचतो.

भूमिपुत्र असल्यामुळे तो मातीत खेळणारच. आणि त्या मातीशी माझाही संबंध असल्यामुळे थोडी माती लागली तर चालेल. असं म्हणण्या इतकी आपल्या मनाची अजून तयारी झालेली नाही ही नेहमीच्या जीवनातील उदाहरणे दिसताहेत बहुसंख्य समाज असा असल्यामुळे जो पर्यन्त या आचारांमध्ये, विचारांमध्ये बदल घडत नाही तो पर्यन्त या आधुनिक मूल्यांचा कितीही उद्घोष केला, बाह्यकरणी ती आपल्या जीवनांत उतरत आहेत असे वाटले तरी ती निष्प्रभ ठरतात, त्याचे परिणाम म्हायला हवे ते होत नाहीत हे या विरोधाभासाचं उत्तर सापडतं. एवढं सगळं होऊन सुध्दा त्याची फळं का मिळत नाहीत ? काही वेळा पोटभर खायाला का मिळत नाही ?  त्यास प्रतिष्ठा का मिळत नाही ? हरिजन शिक्षक गावात आले तर त्यांना रहायला घर मिळत नाही. सरपंच सुध्दा त्याला विरोध करतो. म्हणजे लोकशाहीच्या आधारावरती, नव्या मूल्यावरती अधिकार प्राप्ती करून घेतलेल्या माणसाला सुध्दा लोकशाहीचे अधिष्ठान असलेली ही समता समजलेली नसते हा केवढा मोठा विरोधाभास ! ही मूलभूत अशा प्रकारची मूल्ये आपल्या जीवनामध्ये आणत असतांना सांकेतिक जुन्यापुराण्या मूल्यांशी जर टक्कर होत असेल तर ही सांकेतिक मूल्ये पहिल्यांदा उखडून टाकली पाहिजेत. या अंतरविरोधामुळे आपले जीवन समृध्द होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला दारिद्र्य दिसतं, म्हणून आपल्याला अज्ञान दिसतं किती अज्ञान, किती दारिद्र्य आपल्या देशामध्ये आहे. रस्त्यावरून नुसती फेरी मारली तरी तुमच्या लक्षात येईल. आरोग्याविषयी अज्ञान, शिक्षणाविषयी अज्ञान, समाजातल्या विज्ञानाविषयी अज्ञान अशी कितीतरी उदाहरणे पाहिली आहेत. एका खेड्यात जाण्याचा प्रसंग आला. वाद करावा लागला. कुठल्या विषयावरती ? आश्चर्य वाटेल तुम्हाला तो मला म्हणत होता की चंद्रावरती मनुष्य पाऊल ठेवणंच शक्य नाही. खोट नाटक अमेरिकेने केलं ! आता काय करणार याला ? त्याच्याशी वाद करताना तो मला विचारतो की तुम्ही पाहिला होता का चंद्रावरती मनुष्य चालताना, उतरताना ? असा वाद घालणारी मनाने मागासलेली सामाजिक परिस्थिती आपल्या भोवती दिसते. शंकराच्या मस्तकावरती असलेल्या चंद्रावरती मनुष्य पाय ठेवणार ? कसं शक्य आहे ? असा प्रश्न ज्यावेळी गावामधून अजूनही विचारला जातो. त्या वेळेला मग आपल्याला त्याच्या शेतामध्ये नवं अवजार, त्याच्या शेतामध्ये नवा विचार, त्याच्या शेतामध्ये नवं बी बीयाणं पोचवतांना किती कष्ट करावे लागत असतील ही गोष्ट तुमच्या लक्षांत येईल. ही  केवळ फुटकळ उदाहरणे दिली आहेत. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. अशिक्षितांची नव्हे, सुशिक्षितांची सुध्दा देता येतील. एखादी लुंगी लावलेली विद्यार्थिनी किंवा बेलबॉटम घातलेली विद्यार्थिनी मुंबईमध्ये फेरफटका मारताना तर तुम्हाला त्या प्रभादेवीच्या सिध्दी विनायकाच्या रांगे मध्ये दिसली तर आश्चर्य नाही वाटायचं ! बाह्य वेषाने अत्यंत आधुनिक झालेली ही मंडळी आपल्या विचाराने किती मागासलेली असतात ? धर्मश्रद्धा वेगळी ! वैयक्तिक धर्माच्या विचारात मी येथे शिरत नाही. परंतु विज्ञानाच्या कॉलेजात शिकणा-या विद्यार्थी आणि विद्यार्थीनी ज्यावेळी अशा प्रकारचे वर्तन करताना दिसतात त्या वेळेला आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. हे जे आंतरविरोध आहेत त्यांनी आम्हाला खाऊन टाकलेले आहे.