marathi matich

मराठी मातीचे वैभव

लेखक : प्रा. उत्तम सूर्यवंशी
--------------------------------

pdf inmg  Ebook साठी येथे क्लिक करा

कृतज्ञता

महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्यावर एखादे पुस्तक संपादित करावे, अशी मूळ कल्पना माझे मित्र व सुप्रसिद्ध कवी बा. ह. कल्याणकर यांनी मांडली.  त्या दृष्टीने मी महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांना पत्रे लिहिली.  त्यांनी प्रतिसाद दिला व हा ग्रंथ आकाराला आला.  थोर समाजवादी नेते व महाराष्ट्र-भूषण कै. एस. एम. जोशी यांनी स्वतःला कॅन्सर झालेला असतानासुद्धा यशवंतरावांवरील प्रेमापोटी लेख दिला.  त्यांची कृतज्ञता कोणत्या शब्दाने व्यक्त करावी ?  कै. आण्णांनी माझ्यासारख्या असंख्य अनोळखी व्यक्तींवर निरनिराळ्या मार्गाने उपकार केले आहेत.  नांदेडच्या यशवंतराव महाविद्यालयाचे उपप्राचार्य भुजंगराव वाडीवर, ख्यातनाम समीक्षक, गीतकार व आघाडीवर तळपत असलेले कवी प्रा. फ. मु. शिंदे यांनी वेळोवेळी सूचना व मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांच्या ॠणात राहणेच पसंत करतो.  आमच्या महाविद्यालयाचे लिपिक श्री. शंकर विधाते व विद्यार्थी नागोराव जोंधळे यांनी लेखाचे उत्तम टायपिंग केले.  त्यामुळे मला हे पुस्तक प्रेसकडे निर्धोकपणे देता आले.  या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ व आतील समर्पक चित्रे सुप्रसिद्ध चित्रकार व कवी श्री. भ. मा. परसवाळे यांनी समर्थपणे चितारली आहेत.  हे अवघड काम आपले घरचे काम समजून त्यांनी अल्पावधीत पार पाडले.  त्यांचे व माझे संबंध आभार मानण्यापलीकडचे आहेत.

माझे एक स्नेही व निकटवर्ती डॉ. प्रा. प्रल्हादराव डावळे यांनी पुस्तक पूर्ण करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून सतत आग्रह धरला होता व सौंदर्यदृष्टी असलेले सुप्रसिद्ध कवी व लेखक आमचे प्रकाशकमित्र प्रा. भगवंत क्षीरसागर यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याचे मान्य केल्यामुळे 'मराठी मातीचे वैभव' वाचकांच्या हाती देता आले.  या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो.  शेवटी या पुस्तकात आपले लेख समाविष्ट करण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल सर्व महनीय लेखकांचा मी आभारी आहे.

या पुस्तकाच्या सुबक छपाईबद्दल कल्पना मुद्रणालयाचे श्री. चिं. स. लाटकर व त्यांच्या सर्व कामगारवर्गाचे मी मनापासून आभार मानतो.

प्रा. उत्तम दिपाजी सूर्यवंशी
धर्माबाद
जि. नांदेड ४३१८०९