अभिनंदन ग्रंथ -समाजवाद आणि महाराष्ट्र राज्य 1

नुसती ठोकळेबाजी करून चालणार नाही. वेळोवेळी सुधारणा आणि दुरुस्ती करण्याची तयारी महाराष्ट्र राज्याने ठेवली पाहिजे. या दृष्टीने पाहिल्यास ग्रामपंचायती, सहकारी संस्था आणि कामगारसंघ या संघटना पायाभूत होणार आहेत. सहकारी संघटना आणि कामगारसंघ यांना उत्पादनाच्या कार्यात महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. त्यांनी केवळ हक्कासाठी झगडून भागणार नाही. विधायक पुरुषार्थाच्या प्रेरणेने त्यांनी काम केले तरच नवसमाजाला आधारभूत अशा कार्यक्रम संस्था उभ्या राहूं शकतील. पूर्वी जातीजमातींच्याकडे व्यक्तीला शिस्त लावण्याचें काम होतें. त्यांची शिस्त करडी होती. जन्मावर आधारलेल्या जातिसंस्था आणि उच्चनीचतेच्या कल्पना आम्हांला आतां नकोत. परंतु त्याचा अर्थ असा नव्हेकी, आमचें शिस्तीशिवाय भागं शकेल. शिस्त लावण्याचें कार्य या नव्या की, आमचें शिस्तीशिवाय भागूं शकेल. शिस्त लावण्याचें कार्य या नव्या संस्थांच्या द्वारा करुन घ्यावें लागेल.

जीवनसमृद्धीची ईर्षाच प्रेरक शक्ति व्हावी.

आर्थिक विषमतेप्रमाणेंच सामाजिक विषमता दूर करण्याचें कार्य लोकशाही पद्धतीनें करतां येईल. त्याला उच्छेदवादाची आवश्यकता नाही, ही गोष्ट आम्हीं सिद्ध करून दाखविली पाहिजे. जुन्या समाज व्यवस्थेंत सामान्य जनांना विकासाची संधि मिळत नव्हती. उत्पादनतंत्रच इतकें मागासलेलें होतें कीं, बहुसंख्य लोकांची पिळवणूक करूनच मूठभर लोकांना सुखाचें जिणें जगता येत असे. त्यांना हीन दर्जाचें लेखण्यांत येई. या अन्यायाविरुद्ध दलितांच्या मनांत जीड येत नव्हती असें नाही. अधून मधून त्यांचे उठाव होत. परंतु ते चिरडले जात. स्वाभाविकच त्यांच्या मनामध्ये उच्चवर्णीयांबद्दल विद्वेषाची भावना दृढमूल होई; आणि त्यांच्या प्रेरणा आणि लढे उच्छेदक स्वरुप धारण करीत. स्वातंत्र्यपूर्व काळांत दलितांच्या आणि मागासलेल्यांच्या चळवळी होत. त्या वेळीं विद्वेषाची भावना प्रखर होऊन त्या चळवळींना विकृत स्वरुप येई. त्याचें कारण हेंच होतें. परंतु आतां परकीय सत्ता जाऊन लोकशाहीचा जमाना सुरू झाला आहे. जगामध्ये विज्ञानाची वाढ होऊन उत्पादनतंत्रांत झालेल्या सुधारणांचा उपयोग आपल्याला करून घेतां येण्यासारखी परिस्थिती प्राप्त झाली आहे. सार्वत्रिक मतदानाच्या हक्कामुळे आतां बहुसंख्यांच्या हातीं राजसत्ता येऊं शकते आणि बहुसंख्य श्रमजीवी समाजाचें जीवन सुसह्य करून त्यांना विकासाची संधि उपलब्ध करून देतां येते. म्हणून उचित मार्गदर्शन लाभल्यास सामाजिक विषमतेविरुद्ध चाललेल्या आंदोलनाला विधायक वळण देणें सहज शक्य आहे. त्यांतील उच्छेदक प्रवृत्तींचा हळुहळू निरास करतां येईल. मराठी जनतेचें मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी याबाबतची आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. जातीय भावना नष्ट झाली आहे, अथवा एकदम नष्ट होईल अशी खुळसट कल्पना कोणीहि करून घेऊं नये. दलितांच्या आणि मागासलेल्या समाजाच्या मनांतून ती एकदम नष्ट होऊं शकत नाही. मात्र तिची धार बोथट झाली आहे हें निश्चित. राजकारणांत त्या भावनेचा उपयोग करून घेतला जाण्याची शक्यता असली तरी ती महत्त्वाची शक्ति नाही, आणि नसावी. नव्या जमान्यांत आपलें भवितव्य घडविण्याची बहुजनसमाजाला जी संधि उपलब्ध झाली आहे तिचा उपयोग करून आपलें जीव समृद्ध करण्याची ईर्षा हीच त्यांची मुख्य प्रेरक शक्ति आहे, आणि असली पाहिजे.

राजकीय आचारसंहिता आतां आवश्यकच

हिंदु समाजांतील जातिसंस्थेमुळे निर्माण झालेल्या जातीयतेची प्रखरता कमी झाली असली तरी धर्मभेदामुले उत्पन्न होणा-या जातीयतेचें स्वरुप अजून बदललेलें नाही. ते सौम्य होण्याऐवजी अधिकच उपद्रवकारी होऊं पाहत आहे. कारण दि्वराष्ट्रवादीची कल्पना निघून देशाची फाळणी झाली. पाकिस्तान आणि भारत अशीं दोन सार्व्रभौम राज्ये निर्माण झालीं. हिंदू आणि मुसलमान या दोन्ही जमातींतील सामान्य जनतेला अपार हालअपेष्टा कराव्या लागल्या. रक्ताच्या नद्या वाहवल्या आणि माणुसकीचा बळी द्यावा लागला. एवढ्या मोठ्या आहुतीनंतर जातीय विद्वेषाचा अग्नि शांत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती खोटी ठरली. पाकिस्तानचे राज्यकर्ते आपणच जणुं सा-या मुसलमानांचे विश्वस्त आणि रक्षक आहोंत अशा थाटांत जनतेची दिशाभूल करीत आहेत. भारतांतील मुसलमानांना नीट वागवलें जात नाही, त्यांच्यावर अन्याय होतो, अशी खोटी हाकाटी करून ते भारतांतील जातीयतेला अराष्ट्रीयतेची जोड देत आहेत. भारतांतील मुसलमानांपैकी कांही मंडळी त्यांच्या या कारस्थानाला बळी पडतात हें नाकारतां येणार नाहीं. मुसलमानांनी भारताला आपलें राष्ट्र समजूं नये, कारण येथील राज्यकर्ते इस्लामचे अनुयायी नाहीत, असा विषारी प्रचार ते करूं लागले आहेत. विद्यमान जगामध्ये निरनिराळ्या धर्मांची अलग अलग सार्वभौम राज्यें होऊं शकत नाहींत. तसा प्रयत्न कोणी करूं पाहील तर सा-या सुजाण आणि शांतताप्रिय जगाचा रोष त्यांना आपल्यावर ओढवून घ्यावा लागेल. भिन्न भिन्न धर्मांच्या लोकांनी एक राज्यांत राहून आपला विकास करून घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीं.