अभिनंदन ग्रंथ -स्वातंत्र्य साधनांत भारत महाराष्ट्र संबंध -3

भारतीय लोकशाहीची प्रकृति

- न. वि. गाडगीळ, राज्यपाल, पंजाब

आजकाल सर्वत्र भारतांतील लोकशाहीबद्दल टीका केली जात आहे. जगामध्ये कोणीहि निर्भेळपणे चांगला नाही. कोणतीहि राज्यपद्धति निर्भेळपणे व निरपेक्षपणे चांगली नाही. मानवी समाजांत जें मूल्यांकन करावयाचे असतें तें विद्यमान परिस्थितीचे संदर्भात आलेल्या व येत असलेल्या अनुभवाच्या दृष्टीने करावयाचें असतें. भारतांत प्राचीनकाळी लोकशाही शासनव्यवस्थेची बीजें दिसून येत असत हें सामान्यपणें मान्य आहे.

पण ज्याला आधुनिक पद्धतीची लोकशाही म्हणतात तिची बीजें भारतात मागल्या शतकाच्या मध्यानंतर दिसूं लागली. जेव्हा रिपनसाहेबाच्या कारकीर्दीत कांही स्थानिक संस्थांना प्रतिनिधी धाडण्याचे अधिकार मिळाले तेव्हापासून लोकशाहीच्या कार्याला सुरुवात झाली असें म्हणतां येईल. लोकशाही, जिला संसदीय लोकशाही म्हणतात, ती १९३५ च्या कायद्याप्रमाणे मोठ्या प्रमाणांत येथे सुरु झाली. १९१९ च्या कायद्याने थोडीशी सुरुवात झालीच होती. १९४७ मध्ये हल्लीच्या स्वरुपांत ती दिसूं लागली व घटना कायदा पास झाल्यानंतर आज ती पूर्णतया त्या स्वरुपाची आपल्याला दिसून येत आहे. लोकशाही मार्गातील ही वाटचाल भारतांत सुरु झाली असें नव्हें, तर गेल्या २० वर्षांत जगभर अनेक नूतन स्वातंत्र्य मिळालेल्या राष्ट्रांतून सुरू झाली. आशियांतील गेल्या २५ वर्षांतील राजकीय प्रक्षोम ही या शतकांतील एक क्रान्तिकारक गोष्ट आहे. त्याच क्रान्तीचा प्रवाह आता आफ्रिका खंडांत वाहूं लागला असून पुढील दहा वर्षांचे आंत अफ्रिकेचे राजकीय स्वरुप बदलून जाणार आहे. गेल्या दहा वर्षांत २९ राष्ट्रांतून सुमारें ६० कोटी लोक स्वातंत्र्य मिळविण्यांत यशस्वी झाले. कांही ठिकाणी विद्यमान राज्यकर्त्यांनी आपण होऊन सत्तादान केलें. प्रजेचें स्वातंत्र्य मान्य केलें व सर्व गोष्टी कमीजास्त प्रमाणांत शान्ततेने घडून आल्या तर कांही राष्ट्रांतून हिंसा व अत्याचार या मार्गाने स्वातंत्र्य परिषद भरली होती. त्यानंतर हिदुस्थआन स्वतंत्र झाला. इंडोनेशिया त्याच सुमारास स्वतंत्र झाला व आशियांतील राष्ट्रांमध्ये एक आशियाविषयक भाव उत्पन्न झाला. आशियांतील राष्ट्रे राष्ट्रभावाने प्रेरित असल्यामुळे सर्वत्र राष्ट्रीय स्वातंत्र्याचा जयजयकार झाला. ही राष्ट्रीय स्वातंत्र्याची प्रेरणा पाश्चात्य राजकीय विचार व पाश्चात्य तत्त्वज्ञान यांमुळे मिळाली ही गोष्ट मान्य केली पाहिजे.  महात्मा गांधी, सन्यत सेन, मस्ताफा कमालपाशा, नाहास पाशा हे सर्व महान नेते आशिया खंडांतील क्रान्तीचे मार्गदर्शक व प्रणेते होते.

लोकराज्याचीं अंगे

सामान्यपणे असें म्हणतां येईल की, आशिया खंडांतील राष्ट्रांत जी स्वातंत्र्याची चळवळ झाली तिचा उद्देश परकीय राज्याचा अंत करणें एवढाच नसून लोकांची सत्ता प्रस्थापित करणें, लोकराज्य स्थापन करणें हाच दिसून येतो. या राष्ट्रांतून जें शासनाचें स्वरुप दिसून येतें तें विविध असलें तरी राज्य हें लोकांचें, राज्याचा स्वामी लोक, ही कल्पना सर्वत्र आढळून येते. लोकराज्याची बांधणी कशी याबाबत विविध विचार-सरणीमुळे लोकराज्याचें स्वरुप निरनिराळे असलें तरी सामान्यपणें सार्वत्रिक मतदानाचा हक्का, कार्यकारी सरकार विधिमंडळाला जबाबदार, न्यायसत्ता स्वतंत्र, नागरिकांच्या हक्कांना मान्यता, मुद्रणस्वातंत्र्य इत्यादि गोष्टी कमीजास्त प्रमाणांत आपल्याला आढळून येतात. प्रातिनिधिक सरकार असल्याने तें बदलण्याचा हक्क लोकांचा व त्यासाठी मतदान करावयाचें मनगटशाही करावयाची नाही हें मुख्य लक्षण मानलेलें दिसून येतें. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे राष्ट्रवाद व लोकशाही यांचा समन्वय दिसून येतो अगर येत होता असें म्हटलें पाहिजे. कारण  आज तर आपण आशिया खंडांतील या शतकांत स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांकडे पाहिलें तर लोकशाही उभी असली तरी तिचे पाय लटपटत आहेत. लोकशाहीचा मुखवटा असला तरी त्यामागे हुकूमशाहीचा राक्षस प्रबल झाला आहे, असें दिसतें. या गोष्टीला अनेक कारणें असूं शकतील.