अभिनंदन ग्रंथ -अस्पृश्य व नवदीक्षित बौद्ध -2

महाराष्ट्रांतील सामाजिक समस्या

महाराष्ट्रांतील सामाजिक समस्यांची पूर्ण जाणीव ना. यशवंतरावजी यांना आहे आणि त्या दृष्टीने ते नेहमीच आपले विचार मांडतात; एवढेंच नव्हे, तर या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ते सतत प्रयत्नहि करीत असतात हेंच त्यांचें वैशिष्टय आहे. महाराष्ट्रनिर्मितीचा संधिकाळ जवळ आलेला होता. त्यावेळीं मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असतांना ना यशवंतरावजी यांनी ता. ६-१-१९६० रोजीं सांगली येथें महाराष्ट्रांतील समस्यांवर मूलगामी असे विचार मांडलेले आहेत. इतर समस्यांबरोबरच त्यांनी त्या वेळीं सामाजिक समस्यांचाहि मूलग्राहि विचार मांडला. "उद्याच्या महाराष्ट्रांतील राज्य 'मराठा' राज्य होणार नसून, तें 'मराठी' राज्यच होईल" या त्यांच्या विचारांत सर्वच महाराष्ट्रीयांबद्दल त्यांच्या मनांत वसत असलेली समभावना दिसतेच; पण त्याचबरोबर महाराष्ट्रांत सामाजिक समता निर्माण करण्याचा उद्देशहि स्पष्ट दिसतो.

सांगलीच्या भाषणांत ना. यशवंतरावजी यांनी नव-दीक्षित बौद्धांचा प्रश्न प्रामुख्याने पुढे मांडलेला आहे. ते म्हणतात, "महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनांत दुसरा तितकाच महत्त्वाचा प्रश्न 'नव-बौद्धां'चा आहे. महाराष्ट्रांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक नव-जागृति निर्माण केली आहे. आपण काँग्रेसजनांनी व सर्वांनीच विचार केला पाहिजे कीं, हजारो वर्ष आपल्या समाजाचा एक घटक अंधारांत होता. तो आता जागृत झाला आहे. त्याची जिद्द, जागृति तडफ आपण ओळखली पाहिजे. त्यांचे मागणें हें दया, दान म्हणून त्यांना देतां कामा नये. तें दानाच्या स्वरुपांत त्यांना नको आहे. जिद्दीच्या जागृत मनाची हक्काची मागणी म्हणून त्यांचे माणुसकीचे अधिकार त्यांना आनंदाने दिले पाहिजेत. मोठ्या शहरापेक्षा खेड्याखेड्यामधून या समतेच्या भावनेची आज गरज आहे. मला नेहमी वाटतें की, महार वतनांचा प्रश्न डॉ. आंबेडकरांच्या ह्यातींत आपण सोडवू शकलों असतो तर हा समाज आज दुरावलेला आढळतो तसा दुरावला नसता."

या त्यांच्या विचारावरून नव-दिक्षित बौद्धांच्या प्रश्नाबद्दल त्यांच्या मनात वसत असलेली चिता व तळमळ प्रकर्षाने जाणवते. त्याचप्रमाणे ना. यशवंतरावजी दिनांक १९-१२-१९५७ रोजीं जिल्हा पोलिस अधिका-यांच्या बैठकींत बोलतांनाहि अस्पृश्यांची गा-हाणीं निवारण्याच्या बाबतींत त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केलें आहे. ते म्हणतात, "पददलित म्हटल्या जाणा-या 'हरिजनांना' आपण सर्व त-हेची मदत दिली पाहिजे. अशा घटनेची व्यवस्था स्थानिक अधिका-याकडे सोपवून भागणार नाही; कारण त्याचे हात अनेक कामांत अगोदरच गुंतलेले असतात. हातांतल्या केसेसचा छडा लावण्यासाठी त्याला अनेकांना भेटावें लागतें. कांही जण त्याचे नेहमीचे टेहळ्ये असतात. अशा लोकांच्या कोंडाळ्यांत तो अधिकारी गवसला म्हणजे गावांतील जमातप्रमुखाकडून त्याच्यावर नाना त-हेचे वजन आणलें जातें. साहजिकच दलितांची दु:खें तशींच राहून जातात. ही गोष्ट मला पसंत पडणार नाही. अशा घटनांची वार्ता आली की, नुसता अहवाल मागवून थांबूं नका. स्वत: जातीने तपास करून सत्य शोधून काढा. आपण लोकांत अशी जाणीव निर्माण केली पाहिजे की, चुकीच्या गोष्टी शासनाशिवाय सुटणार नाहीत. आपण लोकशाही जमान्यांत राहत आहोत. मतामतांचें अंतर कितिहि असो, पण समाजांतल्या कोठल्याहि वर्गाला कोणी दहशत दाखवितां कामा नये. 'हरिजनां' ना असा विश्वास वाटला पाहिजे कीं, आपली छळणूक होणार नाही. मी मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख केला याचें कारण मला या गोष्टीची बोच तीव्रतेने वाटते. अशा प्रसंगी जरुरी वाटेल तेव्हा जिल्हादिका-यांना सांगून सर्वपक्षीय शांतता कमिट्यांची स्थापना करावी."

ना. यशवंतरावजी यांच्या या विचारांवरून खेडोपाडी अस्पृश्यांवर होणा-या छळाची जाणीव त्यांना किती आहे हें उत्कटतेने व्यक्त होते.

महाराष्ट्रापुढील सामाजिक समस्यांत अस्पृश्य, नवदिक्षित बौद्ध यांच्या समस्या मुख्य आहेत हें यशवंतरावजींनी मान्य केलें आहे. अस्पृश्यता कायद्याने नष्ट झाली असली तरी आता अस्पृश्यता अस्तित्वांतच नाही अशा अंतराळी विचारांत ते वावरत नाहीत. जो प्रश्न आज आहे तो प्रामाणिकपणे मान्य करून तो सोडविण्यासाठी त्यावर इलाज करणें हीच ना. यशवंतरावाजी यांची या प्रश्नाबाबत खरी भूमिका आहे.