अभिनंदन ग्रंथ - लोकमान्यांनंतर -1

यशवंतरावजींची शिवनिष्ठा

प्रतापगडवरच्या मोर्चाचा ठराव माझ्याच अध्यक्षतेखाली पास झाला होता. मी स्वत: त्या मोर्चात पुढे होतो. मध्यवर्ती संयुक्त महाराष्ट्र समितींत हा ठराव पास होण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा समितींत मीं तो ठराव पास करून घेतला होता. प्रतापगडावरील शिवाजीमहाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचें उद्घाटन पं. नेहरूंच्या हस्तें करण्यांत यशवंतरावजींचा राजकीय डाव होता, महाराष्ट्रांतील शिवभक्तांना चकवण्याचा व आपल्याकडे वळवून घेण्याचा तो डाव होता अशी माझीहि समजूत झाली असल्यामुळे मीं त्याला विरोध केला व विरोधांत पुढाकार घेतला होता. यशवंतरावजींची शिवभक्ति ही तकलुबी आहे अशी माझी समजूत होती. तशी मीं अनेक भाषणेंहि  केलीं होती. या वेळी सर्वांनी या समारंभात पक्षीय दृष्टीने विचार करूं नये अशा प्रकारचें आवाहन त्यांनी केलें होतें. तेव्हा आपणहि त्यांचा शिवनिष्ठेचा कस घ्यावा म्हणून व ते स्वत: अशाच प्रसंगी पक्षीय दृष्टि बाजूस ठेवतात काय तें पाहावे म्हणून मीं यशवंतरावजींना एक पत्र लिहिलें.

मुंबई येथे दादर येथील शिवाजीपार्कवर शिवछत्रपतींचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची कल्पना कित्येक वर्षांची. त्यासाठी शिवस्मारक कमिटीहि स्थापन झाली होती. पण इतकी वर्षे उलटून गेलीं तरी पैसे जमले नव्हते. तीर्थस्वरुप केशवरावजी ठाक-यांची तेवढी सारखी धडपड चाललेली असते. इतर कोणालाहि खरी आस्था दिसन येत नव्हती.

केशवरावजी ठाकरे यांचे एक पत्रक शिवजयंतीचे अगोदर लोकांना जागें करण्याकरता म्हणून प्रसिद्ध झालेलं कोल्हापूरच्या दैनिक 'पुढारी' त मी वाचलें. पैशाबद्दल जनतेला त्यांनी आवाहन केलें होते. त्यांना साथ द्यावी म्हणून मीहि एक पत्रक 'पुढारी'त ४-४-५८ ला प्रसिद्ध केलें. महाराष्ट्रातील सर्व शिवजयंत्युत्सव मंडळींना, सरदार-इनामदारांना, कोल्हापूरच्या छत्रपतींना व मुंबई कॉर्पोरेशनच्या सभासदांना मदतीसाठी आवाहन केलें.

मुंबई कॉर्पोरेशन त्या वेळीं सं. म. समितीच्या ताब्यांत होती. निवडून येण्यापूर्वी तर समितीच्या उमेदवारांनी घसा फुटेपर्यंत शिवनामाची घोषणा केलेली. त्यांनी मनावर घेतल्यास फड जमायला जराहि वेळ लागणार नाही, म्हणून त्यांना आवाहन केलें. माझ्या पत्रकाला अनुलक्षून फक्त समितीचे जनरल सेक्रेटरी एस. एम्. जोशी यांनी पत्रक काढलें. पण याला सक्रिय पाठिंबा असा कोणीच दिला नाही. हा कार्यक्रम समितीने हातीं घेतला नाही. सरदार दरकदार व राजेसाहेब यांनी तिकडे लक्ष दिलें नाही. तेव्हा यशवंतरावजींना एक पत्र टाकून पाहावें म्हणून मीं लिहिलें व या प्रश्नाकडे आपण अपक्ष भूमिकेंतून पहावे आणि साहाय्य करावें अशी विनंती केली. मी विरोधी पक्षांत आणि व्यक्तिविषयकहि टीका करणारा. म्हटलें, पाहूं तरी काय परिणाम होतो ! बहुधा उत्तर येणार नाही असें मी धरूनच चाललों होतो. मलाहि टीकेला आणखी साधन मिळणार होतें. -

आश्चर्याची गोष्ट - मला वाटत होतें की यशवंतराव मौन स्वीकारतील कांहीच उत्तर देणार नाहीत. पण उत्तर आलें आणि सहानुभूतीचे आलें. नव्हे-सक्रिय सहानुभूतीचें आलें. तें सारांशाने देत आहें. पत्राचें स्वरुप सार्वजनिक असल्यामुळे शिष्टाचारमंगाला आरोप मजवर येईल असें वाटत नाही.

"प्रिय माधवरावजी -

आपलें पत्र पोचलें. आपण मोकळ्या मनाने पत्र लिहून आपल्याशी पत्रव्यवहार करण्याची संधी दिली याबद्दल मी आपला अतिशय आभआरी आहे... ध्येयवादाला मुरड न घालतां व मतभेद राखूनहि सोज्वल वातावरण निर्माण करण्याचें तत्त्व हेंच खरें लोकशाही तत्त्व आहे. आणि याचा विजय जर महाराष्ट्रांत झाला तर येथे ध्येयवादी विचारांची सुंदर बाग फुलेल असा मला विश्वास वाटतो... मुंबईच्या ( शिवाजी पार्कवरील) शिवस्मारकाबाबत श्री. ठाकरे यांच्याशी मी पुष्कळ बोललों आहें. व्यक्तिश: या बाबतींत माझ्याकडून आपण व श्री. ठाकरे सुचवाल तें साहाय्य देण्याचें मी जरूर करीन.

आपला
यशवंतराव चव्हाण
१४-४-५८