अभिनंदन ग्रंथ - दिल्लींतून दिसणारें प्रादेशिक मुख्यमंत्री -2

या दोन्ही मुख्य मंत्र्यांचे आणखी एक वैशिष्टय असें आहे की, त्यांनी विरोधी पक्षांतील लोकांना नुसतेंच नामोहरम केलेले नाही तर त्यांना आपले पक्षपाती बनविलें आहे. दिल्लीच्या राजकीय वातावरणांत आधीच नेहरूंनी अशी कांही एक मोहिनी निर्माण केली आहे की, येथे येणा-या विरोधी पक्षाच्या पुढा-यांत राज्यकर्त्यांबद्दल तेवढा कडवटपणा राहत नाही. तशांत चव्हाण व कामराज नादर यांचे विरोधक मनांत खंत बाळगीत नेहमी प्रांजलपणे कबूल करतात कीं, "या दोघां मंत्र्यांनी आपल्या समजूतदार धोरणामुळे आमचा सारा विरोधच दुबळा करून टाकला आहे." दिल्लीमध्ये की कीर्ति इतर फारच थोड्या मुख्य मंत्र्यांबद्दल ऐकूं येते. साहजिकच येथे अशी दाट समजूत झाली आहे की, राज्य-कारभाराच्या दृष्टीने कार्यक्षम, आणि अंतर्गत सत्तास्पर्धेपासून मुक्त अशी जर कोणतीं प्रदेशराज्ये असतील, तर तीं मद्रास व महाराष्ट्र ही होत.

प्रादेशिक मुख्यमंत्र्यांवर जी जबाबदारी पडते ती दुहेरी असते. एक म्हणजे त्यंना आपलें राज्य काबूंत ठेवावें लागतें आणि दुसरें म्हणजे त्या प्रदेशराज्यावरील आपल पकड अधिक मजबूत करण्यासाठी दिल्लीवर त्यांना प्रभाव टाकावा लागतो. कांही मुख्यमंत्री हे आधीच भारतीय राजकारणांत प्रभावी ठरलेले असल्यामुळे त्यांना तेवढी दिल्लीची आराधना करावी लागत नाही किंवा दिल्लीच्या स्पंदनावर बोट ठेवून त्यांना आपलीं धोरणें ठरवावीं लागत नाहीत. उदाहरणार्थ, बंगालचे मुख्यमंत्री बिधनचंद्र रॉय यांचे महात्म कांही वेगळेंच आहे. नेहरू व काँग्रेसश्रेष्ठ आणि सारे मंत्रिमंडळ यांच्याशी त्यांचे नातें असें आहे की, वेळप्रसंगी दिल्लीलाच त्यांच्याकडे धाव घ्यावी लागते. खुद्द बंगालमध्ये त्यांच्या मिटवावयाचा असला तर महामंत्री व गृहमंत्री यांना न्यायाचा कांट त्यांच्याकडे झुकवावा लागतो. एखादी नेमणूक करावयाची झाली तरी बिघन रॉय यांनी नुसता शब्द टाकला तर त्याचा अपमान करणें दिल्लीला शक्य होत नाही. दिवसेंदिवस जुने वजनदार पुढारी कालवश होत चालल्यामुळे बी. सी. रॉय यांची दिल्लींतील प्रतिष्ठा वाढतच चालली आहे. मध्यंतरी राज्यपुनर्रचना होत असतांना नेहरूंनी सा-याच मुख्य मंत्र्यांना विचारविनिमयासाठी दिल्लीला बोलाविले. सारे मुख्यमंत्री आले आणि तडक नेहरूंच्या भेटीला गेले. पण बिघन रॉय यांना आणावयाला नेहरु स्वत: पालमच्या विमानतळावर गेले. आज जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा व वजनाचा उल्लेख होतो तेव्हा सर्व जण एक गोष्ट नि:शंकपणें मान्य करतात की बिघन रॉय यांचे वजन कांही आगळेंच आहे. 'जवाहर'म्हणून नेहरुंना हाक मारणारा आणि प्रेमाच्या अधिकाराने त्यांना दटावणारा दुसरा मुख्यमंत्री आज अस्तित्वांत नाही !

याच प्रकारची प्रतिष्ठा मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असतांना मोरारजी देसाई यांना प्राप्त झालेली होती.  आधीच भारतीय नेतृत्वांत त्यांची गणना झाल्यामुळे त्यांना दिल्ली परकी नव्हती व दिल्लीलाहि ते परके नव्हते. शिवाय गांधीजींच्या गुजरातचे नेते, सरदारांचे वारसदार आणि औद्योगिक दृष्टया अग्रभागीं असलेल्या मुंबई राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री या तिन्ही नात्यांनी त्यांचा लौकिक झाल्यामुळे दिल्लीमध्ये त्यांचे विशेष वजन असे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे एक सभासद म्हणून ते तेथे येण्यापूर्वी 'नेहरूंच्या नंतर कोण, ' या प्रश्नाचें उत्तर देतांना त्यांचे नांव प्रामुख्याने घेतलें जात असे. इतका त्यांचा दिल्लीवर प्रभाव पडलेला होता हें लक्षात ठेवण्यासारखें आहे.

- पण हीहि गोष्ट विसरतां कामा नये की, दिल्लींतील राज्यकर्त्यांनी मोरारजी देसाई यांच्या राज्यपद्धतीचा नमुना कधीहि आदर्शवत् मानला नाही. येथे गृहमंत्र्यांच्या राजवटींत महाराष्ट्रीय सत्याग्रह्यांना सौजन्याची वागणूक मिळाली यांत विशेष नाही. पण हिंसेला प्रवृत्त झालेल्या अकाली दलावरहि गृहमंत्र्यांनी कोणतें हत्यार उगारलें असेल तर तें अश्रुधूर सोडणें हेंच होय. सुव्यवस्था राखण्याचा दिल्लीचा दंडक मोरारजी देसाई यांच्यापेक्षा वेगळा आहे हेंच येथे लक्षांत ठेवण्यासारखें आहे. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे दिल्ली आकर्षित झाली ती या कारणामुळे की, प्रथम अनुनय, नंतर विचारविनिमय, नंतर तडजोडीच्या वाटाघाटी आणि अखेरीस निर्वाणीचा उपाय म्हणून संयमपूर्ण दंडप्रयोग ही यशवंतरावांच्या राजनीतीची सुसंकृत पद्धति आपल्या लोकमतानुवर्ति पद्धतीशीं जुळते असें तिला वाटलें म्हणून ! पंडितजी व पं. पंत हेच केंद्रीय राज्यकारभाराचे खरे मार्गदर्शक. त्या दोघांचीहि मन:प्रवृत्ति कोणत्याहि प्रकारच्या विघ्वंसनाला वा हिसेला विरोधी. राज्यकारभार करतांना समाजहितासाठी सुद्धा दंडयोजना करावी लागते, हें त्यांना ठाऊक आहे. आपल्या देशांत समाज-विरोधी प्रवृत्तींना धर्माच्या, पंथाच्या, भाषेच्या नांवाखाली चेतविलें जातें आणि त्यांना आळा घालण्यासाठी कांही ना कांही जरब बसविणें आवश्यक आहे, याचीहि त्यांना जाणीव आहे. पण म्हणून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बेधडक गोळी चालविणे हा होय, असें मात्र त्यांना मनोमन वाटत नाही. पक्षाबद्दलच्या निष्ठेमुळे किंवा सहका-यांबद्दलच्या आत्मीयतेमुळे वेळींप्रसंगी त्यांना स्वत:ला जी दंडयोजना अवास्तव वाटली असेल तिचेंहि समर्थन करावयाला ते पुढे सरसावले असतील. पण 'मुंबईच्या गोळीबारामुळे व पंजाबमधील अतिरेकी दडपशाहीमुळे त्यांची मनें दुखावलीं गेलीं होती यांत संशय नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या राजवटीबद्दल त्यांना विश्वास आणि आस्था वाटली ती यामुळे की, या राजवटींत त्यांना कार्यक्षमता व लोकभिमुखता, खंबीरपणा व संयम, पक्षनिष्ठा व परमतसहिष्णुता आणि प्रादेशिक परंपरेबद्दलचा अभिमान व सार्वदेशिक दृष्टिकोणाबद्दलची जाणीव यांचा सुंदर मिलाफ झालेला आढळून आला.