पर्यायी पक्षाची भूमिका यथायोग्य रीतीने पार पाडावयाची, तर त्यासाठी विरोधी पक्षाजवळ संसदीय कामकाज, राज्यकारभार, प्रशासन इत्यादि आवश्यक विषयांवर अभ्यासपूर्ण आणि नेमकेपणाने विचारांची मांडणी करू शकतील, असे विशेष प्रवक्ते असावे लागतात. ब्रिटनमध्ये असे विशेष प्रवक्ते नियुक्त करण्याची त्यांची नवी पण परिणामकारक प्रथा आहे. भारताचा विचार करताना अलिकडील काळात या देशातील प्रश्नांची गती आणि गुंतागुंत वाढली असल्याचे आढळते. यांतील काही प्रश्न स्वतंत्रपणे हाताळावे लागणार असल्यामुळे केवळ त्यासाठी अभ्यासू प्रवक्ते तयार करावे लागतील. पर्यायी पक्षाचे शॅडो कॅबिनेट तयार व्हावयाचे, तर अशा अभ्यासू प्रवक्त्यांमधूनच ते आकाराला येऊ शकते.
देशांतर्गत प्रश्न सोडविण्याची ताकद काँग्रेस पक्षामध्ये आजही शाबूत आहे. हे प्रश्न सुटण्यासाठी काँग्रेसने आजवर जी वाटचाल केली, तीतून ही ताकद पक्षाला मिळालेली आहे. या ताकदीचा वापर पुढच्या काळात करीत राहून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे आणि त्यासाठी जनतेशी असलेला जागता व जिव्हाळ्याचा संपर्क कायम ठेवणे, वाढवीत राहणे, यालाच मी काँग्रेसचा कार्यक्रम म्हणेन. देशासमोर असलेले महत्त्वाचे व मूलभूत प्रश्न आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाचे आहेत. वर्षानुवर्ष या प्रश्नांशी काँग्रेस झुंज घेत आहे आणि यापुढेही तिला ती घ्यावी लागणार आहे. देशाच्या आर्थिक-रचनेत बदल आणि उत्पादन-पद्धतीत क्षमता वाढवून बहुसंख्य लोकांना रोजगार मिळण्याची व त्यांच्या किमान गरजा भागविण्याची व्यवस्था करणे याला अग्रक्रम दिला आहे. आर्थिक क्षेत्र, तंत्रज्ञानाचे क्षेत्र, उद्योग, शेती, आधुनिक विज्ञान, शिक्षण अशी जी महत्त्वाची क्षेत्रे आहेत, त्यांमध्ये कोणत्याही कारणासाठी परावलंबन राहणार नाही आणि त्याचबरोबर देशाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या पूर्ण करून सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असणारी शक्ती आपण निर्माण करू शकतो, याचे प्रत्यंतर काँग्रेस पक्षाच्या गेल्या तीस वर्षांतील धोरणात्मक निर्णयाने आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीने आणून दिले आहे. देशांतर्गत प्रश्न सोडविण्याची ताकद काँग्रेस पक्षात निश्चित आहे, अशी खात्री मी त्यामुळेच व्यक्त करू शकतो.
मूलभूत विचार असा आहे, की ज्या राष्ट्राजवळ आधुनिक तंत्रज्ञानाची भरभक्कम सामग्री असते, तेच राष्ट्र जगात श्रेष्ठ ठरते. बदलत्या गतिमान दुनियेत ज्या राष्ट्राने ही तंत्रज्ञानाची अमोघ शक्ती प्राप्त करून घेण्याचे, वाढविण्याचे सामर्थ्य संपादन केलेले असेल, ते राष्ट्र किंवा तो देश, संरक्षण दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर राहू शकतो. आत्मनिर्भरता निर्माण होण्यासाठी सरकारला तसे धोरण ठरवावे लागते. कार्यक्रमाची दिशा निश्चित करावी लागते. जनता पक्षाच्या सरकारवरची टीका या संदर्भात ही आहे, की या सरकारला काही दिशाच नाही.