२६. पक्षावर अभंग निष्ठा
'केसरी' १२ नोव्हेंबर १९७७ मधील लेखाच्या आधारे.
हिंदुस्थानची सर्वांगीण बांधणी करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध असलेल्या काँग्रेस पक्षाचे सध्याचे स्वरूप हे निश्चित धोरण आणि निश्चित कार्यक्रम स्वीकारलेला, अखिल भारतीय स्वरूपाचा एकसंध पक्ष, असे आहे. संसदेत आणि संसदेबाहेर काँग्रेस पक्ष आज विरोधी पक्षाची भूमिका बजावीत आहे.
स्वातंत्र्यसंपादनानंतर पक्षाच्या धोरणाची आणि कार्यक्रमाची दिशा निश्चित करून काँग्रेसने गेली तीस वर्षे राज्यकारभार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि स्वातंत्र्योत्तर काळातील प्रेरणा आणि अनुभव यांतून पक्षाची धोरणे आणि दिशा निश्चित झालेल्या आहेत. सर्वसामान्य जनतेच्या संसदेत हा पक्ष आज विरोधी पक्ष म्हणून काम करीत असला, तरी धोरणे आणि कार्यक्रमाची दिशा यांपासून तो मुळीच विचलित झालेला नाही. होऊ शकणार नाही.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात काँग्रेस ही बहुसंख्य जनतेशी एकरूप झाली होती. समाजोपयोगी कार्यक्रमाच्या आधारे नंतरच्या काळातही बव्हंशी हीच भूमिका टिकून राहिली. कार्यक्रमावर आधारलेल्या कार्यामुळे गेली पन्नास-पाऊणशे वर्षे, 'एकजीव, प्रवाहित पक्ष', असे या पक्षाचे स्वरूप बनलेले आहे. या पक्षाच्या पिढ्यांमागून पिढ्यांचा जो इतिहास आहे, त्यामध्ये प्रत्येक पिढीनंतर नवा विचार उदयाला येत राहिलेला असून विचाराचा नवा धागा पकडून पक्षाने देशाला नवा कार्यक्रम व नवी दिशा दिली आहे. माणसांच्या मनात उत्साह निर्माण करून त्यांना उज्ज्वल भवितव्याकडे खेचण्याचे कार्यच या पक्षाने केले आणि त्याच्या जोडीला प्रागतिक धोरणांचा आणि कार्यक्रमाचा पक्का पाया तयार केला.
विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेसला जिद्दीने, आत्मविश्वासाने हेच ऐतिहासिक कार्य पुढे करावयाचे आहे. त्याच भूमिकेतून संसदेत हा पक्ष कार्य करीत आहे. माझी मूलभूत धारणा अशी आहे, की धोरणाच्या आणि कार्यक्रमाच्या निश्चित दिशा असलेल्या काँग्रेस पक्षाने संसदेत व बाहेरही विधायक 'पर्यायी पक्ष' म्हणून काम केले पाहिजे. जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि लोकशाहीला शोभायमान ठरणा-या प्रतिष्ठेने हे काम करावयाचे आहे.
'पर्यायी पक्ष', म्हणून काँग्रेसची लोकमानसात प्रतिमा तयार व्हावयाची, तर पक्षाची एकजीव संघटना अधिक भक्कम करणे, लोकशाहीची प्रतिष्ठा व शक्ती वाढेल, अशा विचारानुरूप प्रत्यक्ष कार्य करणे आणि त्यासाठी येणा-या सर्व अडचणी ओलांडून डोळ्यासमोर फक्त सामान्य माणूस आणि त्याचे हित व राष्ट्राचे भवितव्य एवढीच उद्दिष्टे ठेवून प्राणपणाने कार्य करीत राहणे, हेच विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचे कार्य राहील. देशहित साधणे, सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे, परराष्ट्रिय धोरणात अलिप्ततेचा अवलंब करणे आणि देशांतर्गत स्वयंपूर्णता प्रस्थापित करणे अशा कोणत्याही कसोटीवर काँग्रेस पक्ष हा 'पर्यायी पक्ष' बनू शकतो, हे मान्य करावे लागेल. योग्य क्षण येताच स्वत: सरकार बनविणे आणि आपल्या धोरणांची मांडणी त्या पद्धतीने करणे हे काम विरोधी पक्षाला करावेच लागते. संसदीय प्रथांची प्रतिष्ठा ठेवून, पण काहीशा आक्रमक पद्धतीनेच हे काम काँग्रेस पक्षाला करावे लागणार आहे.