२५. लोकमताचा कौल आणि त्याचा अर्थ
५ एप्रिल १९७७ रोजी विरोधी पक्षाचे नेते म्हणून
राष्ट्राला उद्देशून आकाशवाणीवरून केलेले भाषण.
काँग्रेसने आपल्या स्थापनेपासून राष्ट्राच्या जीवनामध्ये ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व तर केलेच, शिवाय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीस वर्षे देशाला स्थिर आणि प्रागतिक शासन दिले. या कालावधीत तिने लागोपाठ पाच सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. लोकांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या या विश्वासामुळे काँग्रेसने देशाची अनेकविध क्षेत्रांमध्ये प्रगती घडवून आणली.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र प्रथमच काँग्रेसला लोकसभेतील बहुमत गमवावे लागले. काही राज्यांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असले, तरी ब-याच राज्यांतील मतदारांनी काँग्रेसऐवजी नवोदित जनता पक्षाला यशस्वी केले. लोकमताचा हा कौल आम्ही मानतो आणि नव्या सरकारला आणि पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई यांना सुयश चिंतितो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीने पुन्हा एकदा भारतीय लोकशाहीच्या आंतरिक सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे. भारतीय जनतेने कमालीची राजकीय प्रगल्भता आणि सुज्ञता दाखविली, याचा सा-या देशाला अभिमान वाटतो. कोणता पक्ष यशस्वी वा पराभूत झाला, हे या संदर्भात महत्त्वाचे नाही.
लोकमताच्या ताज्या कौलावरून केवळ काँग्रेसनेच नव्हे, तर सा-या देशाने योग्य बोध घेतला पाहिजे. राष्ट्रिय एकता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही यांचा काँग्रेसने नेहमीच पुरस्कार केलेला आहे. लोकमताचा कौल या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध गेलेला आहे काय? शतकानुशतकांचे आर्थिक दारिद्र्य, सामाजिक कुचंबणा आणि सांस्कृतिक ऱ्हास यांच्या गर्तेतून देशाला बाहेर काढून लोकांच्या जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध विकास आवश्यक आहे, असे काँग्रेस मानते. लोकमताचा कौल या भूमिकेविरुद्ध आहे काय? उद्योगधंद्यांचा द्रुतगतीने विकास करून आर्थिक जीवनाच्या अधिकाधिक क्षेत्रांत देश स्वयंपूर्ण व्हावा, हे काँग्रेसचे धोरण आहे. गेल्या ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षामध्ये देशातील पोलाद कारखान्यांनी उत्पादनाचा नवा विक्रम प्रस्थापित केला, हे या धोरणाचेच निर्देशक आहे. लोकमत याविरुद्ध गेले काय? देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषत: ८० टक्के भारतीय जेथे राहतात, या ग्रामीण भागाच्या समन्वित विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा उपयोग करून घेतला पाहिजे, असेही काँग्रेसचे धोरण आहे. गेल्या वर्षात आपल्या शेतकऱ्यांनी अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केले आहे. सुयोग्य नियोजनामुळेच देशात ही हरित-क्रांती घडून आली. ती लोकांना मान्य नाही काय? अलिप्ततावाद, आफ्रिकी देशांच्या मुक्तिलढ्यांना पाठिंबा, अरब लोकांच्या न्याय्य मागण्यांचा पुरस्कार आणि शेजारी देशांबरोबर मैत्रीचे संबंध ही काँग्रेस सरकारच्या परराष्ट्रिय धोरणाची सूत्रे होती. लोकांनी त्याविरुद्ध मतप्रदर्शन केले काय?