आमचा इतिहास म्हणजे फक्त आर्यांचा इतिहास, फक्त आर्यावर्ताचा इतिहास, असेच शिकविले गेले. हेहि अर्धसत्य आमच्या मानसिक गुलामगिरीस पोषक झाले. आर्यापूर्वीचा किमान वीस हजार वर्षांचा अनार्य संस्कृतीचा आमचा वारसा “राक्षसी” म्हणून बदनाम करून, कालप्रवाहात बुडवून टाकला आहे. मोहोंजोदडो, हडप्पा अशा प्राचीन नगरांचे अवशेष, “इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो” अशा फक्त आठवणी, चुकूनमाकून शिल्लक राहिल्या. पण त्यांचा काहीही तपशील आम्हाला ठाऊक नाही. आर्येतरांचा इतिहासच आम्हाला कुणी नीट सांगत नाही. आर्यांच्यापूर्वी द्रवीड संस्कृती होती, द्रविडापूर्वी नाग संस्कृती होती. नागापूर्वी मुंडावी संस्कृती होती, मुंडावीपूर्वी गोंड संस्कृती होती आणि ती अर्ध्या जगांत पसरली होती, याचे भानसुद्धा राहू नये अशी व्यवस्था केली गेली आहे.
परवाच मी अमेरिकेसंबंधीच्या इतिहासाचे एक पुस्तक वाचीत होतो. पुस्तकाचे नांव “पीपल्स हिस्ट्री ऑफ युनायटेड स्टेटस्” असे आहे. अमेरिकेतील मूळचे लोक “रेड इंडियन” नांवाने ओळखले जातात. आपल्याला सांगण्यात येते, कोलंबस हिंदुस्थानचा रस्ता शोधायला निघाला, वाटेत त्याला अमेरिकेची भूमी सापडली, त्याला हिंदुस्थानचीच भूमी भेटली असे वाटले. तिथल्या मूळ रहिवाशांना त्याने “इंडियन” म्हटले, नंतर तेच नां रूढ झाले. परंतु तेथील मूळ रहिवाशी हे कोलंबसने गफलतीने म्हटले म्हणून “इंडियन” नाहीत, तर खरेच ते इंडियामधून सुमारे २५ हजार वर्षापूर्वी अलास्काच्या सामुद्रधुनीतून, आशियातून अमेरिकेत आलेले लोक आहेत असं पुस्तकाच्या लेखकाने म्हटले आहे. अलास्काची ती सामुद्रधुनी आता पाण्याखाली गेली आहे आणि पूर्वी ती पाण्याच्या वर असलेली, दोन खंडाना जोडणारी भूपट्टी होती, असंही तो लेखक म्हणतो. अमेरिकेतले रेडइंडियन हे आमचेच पूर्वज आहेत, मेक्सिकोमधील सूर्योपासना करणारी माया-संस्कृती आमच्या प्राचीन संस्कृतीशी निगडित आहे, पण जग आणि जागाचा इतिहास हा युरोपियन लोक सांगतील तोच. असं डोळे झाकून मानण्याची गुलामी वृत्ती आज रूढ झाली आहे. ब्राह्मण सांगेल तोच धर्म, तोच देव आणि तीच संस्कृती, हे जसे या देशांत पक्के रुजले आहे, तसेच आज जगांत युरोपियन बोलेल तोच आदर्श, तेच सत्य आणि तेच अनुकरणीय असे रुजवले गेले आहे.
इंग्लंडहून प्रसिद्ध झालेले आणखी एक चित्रमय पुस्तक माझ्या वाचनांत आले. “प्लेसेस ऑफ विल्डरनेस इन द वर्ल्ड”, अशा नावाची १०० खंडाची एक मालिका लंडनहून प्रसिद्ध झाली आहे. मी वाचलेल्या खंडात ब्राझीलमधल्या अँमेझॉन खो-यातील घनदाट जंगलाची माहिती होती. त्या प्रचंड पानथळीच्या जंगलात अजूनही मनुष्य जाऊ शकत नाही अशी बरीच ठिकाणे आहेत. त्या जंगलातील खडकांचा अभ्यास करून लेखक म्हणतो की, ब्राझीलमधील हे खडक आफ्रिका खंडाच्या पश्चिम किना-यावरील खडकासारखे आहेत. आफ्रिकेतील खडक हे सह्याद्रीच्या कातळाशी जुळणारे आहेत. अती अती प्राचीन काळी, द. अमेरिका, आफ्रिका आणि द. भारत हा सलग भूभाग होता असे आता अनेकांनी अनुमान काढले आहे. अँमेझॉन खो-यातील त्या जंगलाचे प्राचीन नांव “गोंडवन फॉरेस्ट” असे होते असं तो लेखक म्हणतो. आता वन म्हणजे फॉरेस्ट हे त्याला माहित नसेल. गोंडवनाची प्राचीनता आणि त्याखालचा अवाढव्य भूप्रदेश याची कल्पना केवढी विस्मयजनक आहे? गोंडाची राज्ये नागपूरकडे होती. त्यांचे किल्ले आजही साक्षीला उभे आहेत. परंतु गौंडाची राज्ये नागपूरकडे होती. त्यांचे किल्ले आजही साक्षीला उभे आहेत. परंतु त्या गौंड संस्कृतीची आम्हाला कुणी माहिती देत नाहीत. आर्यांच्या पूर्वी विकसित झालेल्या नागा, द्रविड यांच्या संस्कृतीबद्दलही आम्हाला कुणी फारसे सांगत नाहीत. आम्ही या सर्व संस्कृतीचे वारस आहोत. हे आमच्या नव्या पिढ्यांना, स्पष्टपणे शोधून, उचित रीतीने, सातत्याने सांगितले पाहिजे.
महाराष्ट्र हा अनेक प्राचीन संस्कृतीचा प्रीती-संगम आहे. याचे तरी भान आमचे कुठे शिल्लक आहे? इरावती बाई कर्वे यांनी आर्यांच्या दक्षिणेतील प्रेदशासंबंधी लिहिले आहे. विंध्य पर्वत ओलांडणे त्याकाळी कित्येक शतके आर्यांना दुर्धर झाले होते. दक्षिणापथावर आर्य आले, ते कोकणमार्गे दक्षिण भारताकडे उतरले. दक्षिणेतले द्रविड पूर्व किना-याकडे उत्तरेकडे गंगाखो-यांत पसरले होते. या दोन संस्कृतीच्या प्रवाहांचा भोवरा कित्येक शतके कृष्णा खो-यांत फिरत राहिला. उत्तर दक्षिण संघर्षाची सरहद्द कृष्णा खो-यात बराच काळ रेंगाळली. या सरहद्दीच्या संघर्षात, कित्येक पिढ्या सतत रणभूमीवर उभा राहिला तो मरहट्टा. कैक शतकानंतर आर्य-अनार्य संघर्षाचा शेवट समन्वयांत झाला. त्या सांस्कृतिक ऐक्याचे निशाण प्रथम प्रीतिसंगमावरील मराठ्यांनी, खांद्यावर घेतले. ही प्रखर विरोधी संस्कृतीचा प्रीतीसंगम घडवून आणणारी, मराठी संस्कृती ही उज्वल समन्वयाची प्रतीक आहे. सहनशील सह्यगिरी ज्याच्या पाठीचा कणा आहे, आणि विविध संस्कृतीच्या समन्वयाचे, एकात्मतेचे निशाण ज्याच्या खांद्यावर आहे, त्या महाराष्ट्राचा वारस आमच्या नव्या महाराष्ट्रगीताने अभिमानाने सांगितला पाहिजे.