व्याख्यानमाला-१९८९-७

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मणेतरांच्या अवनतीचे कारण सत्ता व ज्ञान यांच्या अभावात आहे. असे त्यांना फुल्यांच्या प्रमाणेच जाणविले. हिंदुस्थान हा देश म्हणजे केवळ सामाजिक आर्थिक विषमतेचे माहेरघर आहे. आणि हिंदू समाज हा एक मनोरा असून एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला आहे. पण या मनो-यास शिडी नाही. एक मजल्यावरुन दुस-या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. एक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.

"भारत स्वतंत्र होण्याने सर्व कार्यभाग साधेल असे नाही.  भारत हे असे राष्ट्र बनले पाहिजे की, ज्यात प्रत्येक नागरिकाला धार्मिक, आर्थिक आणि राजकीय हक्क सारखे असून व्यक्ति विकासाला प्रत्येक नागरिकाला वाव मिळेल इंग्रजी राज्यविरुद्ध घेतलेला आक्षेप ब्राह्मणांच्या मुखात एकपटीने शोभते. तर तोच आक्षेप ब्राम्हणी राज्यांनी एका बहिष्कृताने घेतल्यास हजारपटीने शोभेल म्हणून असे स्वराज्य द्या की, थोडेबहुत आमचे राज्य आहे"

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र हिंदू समाजाच्या पुनर्घटनेची मागणी आपल्या चळवळीतून सुरू केली. जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या चळवळीतून हिंदू समाजाच्या समग्र पुनर्रचनेचा आग्रह धरला. मनुस्मृती ही हिंदूंच्या धार्मिक, सामाजिक आणि नैर्वंधिक नियमांचा संग्रह होता. मात्र अस्पृश्यांवर सामाजिक, आर्थिक व धार्मिक अमानुष गुलामगिरीची निर्बंध घातलेले होते. अस्पृश्य म्हणजे एक मूर्तिमंत महापातक आहे असे मनुस्मृतीचे सांगणे होते. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीची होळी केली त्याचे हे कारण होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्धीवादाच्या बळावर दलित समाजाला माणूसपणाचा दर्जा मिळवून देण्याची प्रचंड मोठी चळवळ उभी केली. त्यांच्या धर्मांतराचा निर्णय दलितांना मानवी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीच होता. धर्मांतर करतांना त्यांनी दलित समाजाला बजावलं होतं.

"बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. या देशाची संस्कृती, इतिहास यांच्या परंपरेला धोका लागणार नाही अशी मी खबरदारी घेतली आहे. मी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. बौद्धधर्म सांभाळण्याची मोठी जबाबदारी तुमच्या शिराव पडली आहे. आणि जर तुम्ही कडकपणे व उदात्तपणे तत्त्वे पाळली नाहीत तर महार आणि बौध्दधर्माचे वाटोळे केले असे जग म्हणेल"

या सर्व सामाजिक चळवळीचा भाग म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी १९५९ साली एक क्रांतीकारी निर्णय घेतला. आर्थिकदृष्टया मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या फीमध्ये सवलत देण्याचा. त्याचा निकष जात नाही, धर्म नाही तर आर्थिक दुर्बल घटक म्हणून. एकदा यशवंतरावजीना कुणीतरी मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता, 'राजर्षी शाहू महाराज नसते तर काय झालं असतं?' यशवंतरावजीनी सांगीतलं 'आज हा जो यशवंतराव आहे तो यशवंतराव तुम्हाला दिसला नसता आणि हा यशवंतराव कुठेतरी क-हाडच्या माळावर, कृष्णेच्या काठावर डोक्याइतकी उंच काठी हातात घेऊन गाई-म्हशींच्या मागे फिरला असता ' त्यांच्या या विचाराचे स्मरण मला यासाठी होते. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या फी माफी करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी बाळासाहेब देसाई शिक्षणमंत्री होते, यशवंतरावाजी मुख्यमंत्री होते. शेतकरी, दलित, आदिवासी सगळ्या सामान्य कुटुंबातील लाखो मुलं महाविद्यालयाच्या दारात आली. कदाचित तो निर्णय घेतला नसता तर बा.ह.कल्याणकर हा तुमच्यासमोर विचार मांडायला आला नसता. तर मी माझ्या गोगदरी या गावात थांबलो असतो. फारतर माज्या गांवाचा मी सरपच झालो असतो नाहीतर आमच्या केशवराव धोंडगे यांचा कार्यकर्ता झालो असतो इतकंच.

यामुळं मला यशवंतरावजींचं स्मरण यावेळी येत.  त्यांच्या विचाराचं मोल मला जाणवतयं.