व्याख्यानमाला-१९८९-४५

जोतिराव फुले आज आपल्यात नाहीत पण त्यांनी दलित, शोषित, पीडीत, कामकरी, शेतकरी, कष्टकरी गोरगरीब या सर्वसामान्य माणसांना आधार दिला, दिलासा दिला, चळवळ दिली, विचार दिला. ध्यास दिला. प्राण दिला आणि त्या माणसाला जीवन दिलं, त्या माणसांच्या देहामधअये माणूसपण ओतलं त्या माणसाचं स्मरण पुन्हा पुन्हा करावं असं वाटणारं स्मरण आहे. ही माणसं मरत नसतात. त्यांचे विचार अमर असतात. जोपर्यंत दु:ख शोषण आहे, जोपर्यत माणसाच्या डोळ्यांत पाणी आहे, अश्रू आहे, जोपर्यंत माणसाच्या घामाची लुबाडणूक होत आहे, तोपर्यंत जोतिराव फुल्यांचा विचार, आंबेडकरांचा विचार कुणीही विसरणार नाही. शेवटी बहिणाबाईची एक ओवी आहे. ती सांगून मी आजच्या व्याख्यानाचा समारोप करतो.

'जग जग माझ्या जीवा । असं जगनं तोलाचं ।।
उंच गगना सारखं । धरित्रीच्या रे मोलाचं ।।

मला वाटतं बहिणाबाईनी जणू जोतिराव फुल्यांसाठीच ही कविता केली असावी. इतकी सुंदर समर्पक कविता त्यांनी आपल्यासमोर मांडली आहे.

मित्र हो तास-सव्वातास होऊन गेलेला आहे. आणि जोतिराव फुल्यांचा सामाजिक विचार आणि सामाजिक संदर्भ मग ते सामाजिक क्रांतीच्या संदर्भातील असो, आमच्या सामाजिक विषमतेच्या संदर्भातील असो, भांडवलदारी अर्थव्यवस्थेच्या आक्रमणाच्या बाबतीतील असोत, गरीबागरीबांमध्ये फूट पाडण्याचं राजकारण असो, अंतर वाढण्याच असो, हे सगंळं अंतर वाढत चाललेलं आहे. आणि समतेच्या चळवळी क्षीण होत आहेत. अशा वेळी आपण सर्वजणांनी हा विषय समजून घेतलात. काल आणि आज फक्त दोन दिवसापुरता विषय नाही तर लोकांपर्यंत स्वातंत्र्य पोहोचण्याचा हा विषय आहे. लोकांपर्यंत संस्कृति पोहोचण्याचा हा विषय आहे. त्यालाच चांगला माणूस म्हणतात, जो स्वत:साठी जगत नाही, दुस-याच्या जीवनामध्ये सुंदरता निर्माण करतो. असा एक चांगला विचार घेऊन आपण सगळे गेलो तर मला वाटते जोतिराव फुल्यांना त्यांच्या समाज परिवर्तनांच्या चळवळींना आपण चांगल्या प्रकारे अभिवादन केलेलं आहे आपण दो दिवस माझे विचार अतिशय शांतपणानं समजून घेतले आणि अतिशय जाणतेपणाने दाद दिलीत त्याबद्दल आपणासर्वांचे, क-हाडवासियांचे मी मनापासून आभार मानतो,

धन्यवाद !