व्याख्यानमाला-१९७६-२६

व्यक्तिस्वातंत्र्य ही मूलभूत अशा प्रकारची भावना असल्यामुळे तिला आपण धक्का लावायचा नाही परंतू समाजाचा उत्कर्ष ही देखील महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे समाज तर सतत पुढे गेला पाहिजे. तेव्हा धनार्जन करणारी जी माणसे असतील जी आपल्या कर्तृत्त्वानं आपल्या हिंमतीनं संपत्ती वाढवतील की, समाजाने विश्वासाने माझ्या स्वाधीन केलेली ही समाजाची संपत्ती आहे, ती तू गरजेप्रमाणे वापर. आणि समाजाला ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या त्या वेळेला ती विश्वस्त म्हणून परत दे धनवान हा निधिधारक आहे, हा ट्रस्टी आहे, हा विश्वस्त आहे. अशी खाजगी क्षेत्रासंबंधीची, व्यक्तिगत स्वातंत्र्यातून निर्माण होणा-या धनार्जनाची सांगड समाजवादाशी घालण्याच्या दृष्टीने हा असा विश्वस्त मार्गाचा निधिधारकांचा सिध्दांत महात्माजीने मांडला होता. पण प्रत्यक्षात आपणाला दिसतं काय ? तर कामगारांवरती ज्यास्तीत ज्यास्त जुलूम कसे करता येतील. शेतक-याला वेठबिगारीमध्ये ज्यास्तीत ज्यास्त कसा बांधून घेता येईल, हरिजनांवरती ज्यास्तीत ज्यास्त अत्याचार कसे करता येतील, गरीब दुबळ्या अशा जनतेला लुबाडून आपला फायदा कसा करता येईल, कर कसा चुकवता येईल, स्मगलिंग करून या देशाची संपूर्ण अर्थ व्यवस्था कशी कोलमडून पाडता येईल, याच्या मध्ये ज्यांच्या हातात धनार्जनाची सूत्रं होती, धनार्जनाची साधनं होती अशी माणसं सतत गुंतल्यामुळे त्या थोर महात्म्यांची स्वप्नं सगळी धुळीला मिळाली आणि म्हणून मी काल जाता जाता माझ्या भाषणामध्ये म्हटलं की राजकीय विचाराच्या पातळीवर ज्या कोणाला वाद घालायचा असेल तर त्याला तो घालू द्या. या देशात गेल्या सहा महिन्यांमध्ये आणीबाणीची परिस्थिती पुकारून त्याला एक निश्चित अशा प्रकारच्या कुठल्यातरी एका बंदिस्त अशा प्रवाहामध्ये आणून सोडण्याचा हा जो प्रयोग होतोय तो जर या देशात चांगल्या गोष्टी आणणार असेल तर खरोखरच आपण त्याचं स्वागत केले पाहिजे. संपत्ती मिळविण्याचे, जमीन बाळगण्याचे, कारखानदारी निर्माण करण्याचे, वेगवेगळ्या प्रकारचे मूलभूत हक्क आम्हाला दिलेले असताना घटनेने ते काढून घेतले जातात म्हणजे काय ? अशा प्रकारचे प्रश्न ज्या वेळी विचारले जातात त्या वेळी आपल्याही मनांत संभ्रम निर्माण होतो. मूलभूत हक्कासारखी पवित्र अशा प्रकारची गोष्ट ! व्यक्तिस्वातंत्र्यासारखी अत्यंत पवित्र अशी गोष्ट ! आणि त्याच्यावरती अन्याय होतो!! विचार करताना थोडं आपल्याला सुध्दा चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. पण जरा खोलात गेला तर त्यातील सत्य तुमच्या लक्षात येईल.

श्रेष्ठ मूल्यांच्या, व्यक्तिस्वातंत्र्याच्या बुध्दिवादाच्या मूलभूत हक्कांच्या नावाखाली स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी ही आपली बुध्दी कशी वापरावयाची आणि खोट्या गोष्टी कशा दडवायच्या व साधायच्या याचे प्रयोग करणारे लोक या जगामध्ये ज्यास्त हुषार असतात. ही माणसं अशा प्रकारचा आभास नेहमीच निर्माण करत आलेली आहेत. या माणसांनी ज्या गरिबाच्या पोटाला दोन वेळच काय, एक वेळेला सुध्दा खायला मिळत नाही, त्या माणसाच्या आयुष्याचा कधी विचार केलेला नाही. गिरणीत काम करून घाम गाळणा-या माणसाला आपल्या मुलाचं शिक्षण कसं होईल याची भ्रांत कशी पडते याचा ज्यांनी कधी विचार केला नाही. शेतामध्ये घाम गाळणा-या माणसाच्या पोटामध्ये दोन अन्नाचे कणही जात नाहीत, याचा ज्यांनी कधी विचार केला नाही त्यांनी स्वत:च्या हक्कांची, स्वत:च्या स्वातंत्र्याची, स्वत:च्या विचारांची प्रौढी मिरवावी आणि कुठल्यातरी बुध्दिवादाच्या, युक्तिवादाच्या जोरावरती आमजनतेची, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करावा ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. या विषयावरती मी मुद्दाम बोलणार आहे. मूलभूत कल्पनेचा अर्थ काय? मूलभूत हक्काची संकल्पना खरोखरच पवित्र आहे काय? समाजाचा इतिहास जरा पहा. या मालकी हक्काच्या कल्पना कुणी निर्माण केल्या? मालकी हक्काच्या कल्पना या जुन्या जमान्यातल्या कल्पना आहेत. ज्या जमान्यामध्ये अर्थार्जनाची साधनं अत्यंत दुर्बळ व किरकोळ होती. निसर्गाचे माणसांवर जबरदस्त बंधन होतं. तुम्ही ठरवलं तरी तुम्हाला वाटेल तितके निर्माण करता येत नव्हते. अशा काळामध्ये व्यक्तीला प्रेरणा देऊन त्याच्याकडून उत्पादन काढण्यासाठी म्हणून ही कल्पाना जन्मली होती. आजचा काळ बदलेला आहे. आजच्या काळामध्ये धनार्जनाची साधनं इतक्या प्रचंड प्रमाणांत वाढलेली आहेत, इतक्या प्रचंड गतीने वाढलेली आहेत, आणि इतक्या वेगवान रीतीने ती सतत वाढत आहेत की अशा प्रकारची साधनं जर काही मूठभर लोकांच्या हातात ठेवली तर बहुसंख्य समाज बेकार बनल्याशिवाय राहणार नाही. बहुसंख्य समाजाचं स्वातंत्र्य रक्षण करण्यासाठी, बहुंसंख्य समाजाला प्रगतीचे मार्ग प्राप्त करून देण्यासाठी, प्राथामिक संधी प्राप्त करून देण्यासाठी, मूठभर लोकांच्या हक्कावरती कधी – कधी जर नियंत्रण घालावं लागलं तर ती आवश्यक गोष्ट आहे. अशी काळाप्रमाणे बदललेली ही कल्पना आहे. आणि दुसरा विचार असा की ज्यावेळेला मूलभूत हक्कासंबंधी आपण बोलतो तर खरोखर कशासंबंधी बोलतो ? ज्यावेळेला असं म्हणतो की सगळे समान आहोत ! त्याचा अर्थ काय ? एखाद्या शर्यतीमध्ये सोळा वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षांचा मुलगा यांना उभं करायचं आणि आपण म्हणायचं की तुम्हाला समान हक्क दिलेले आहेत. धावण्याची समानसंधी आहे. शर्यतीचे अंतर सारखंच धावायचं आहे, शंभर मीटरच धावायचं आहे. वेळ तुम्ही घ्याल तितका आहे.  त्यामुळे या शर्यंतीमध्ये कोण जिंकेल हे तुम्ही आपोआपच मनाशी ठरवू शकाल. सहा वर्षांचा मुलगा त्या सोळा वर्षाच्या मुलाबरोबर धावूच शकणार नाही.  कारण त्याच्या पायांमध्ये ती ताकदच अजून निर्माण झालेली नाही. आणि म्हणून या समान हक्काचा, या मूलभूत हक्काचा त्याच्या दृष्टीने काडीचाही उपयोग नाही. आणि म्हणून मग समाजाची जबाबदारी अशी पडते, राज्ययंत्रणेची जबाबदारी अशी पडते की या सहा वर्षांच्या मुलाच्या मध्ये ज्या वेळेला सोळा वर्षाच्या मुलाची पात्रता निर्माण होईल, त्याच्या पायामध्ये ज्या वेळी धावण्याची शक्ती निर्माण होईल, त्याच्या मध्ये त्या स्पर्धेचा खरा गुण त्याच्या अंगातून, राक्तातून, धमन्यांतून वाहायला लागेल त्या वेळेला मग आम्ही सांगू आता धावायला लागा म्हणून त्याला पहिल्यांदा हात देऊन वर काढण्यासाठी त्या १६ वर्षाच्या मुलाला सांगाव लागेल, की जरा थांब जरा मागे रहा, इतक्या अंतरावर उभा रहा आणि नंतरच या स्पर्धेमध्ये तू भाग घे. मूलभूत स्वातंत्र्याच्या कल्पनेमध्ये हा जो विरोधाभास दिसतो त्या विरोधाभासाचे उत्तर आपल्याला इथं सापडतं.