व्याख्यानमाला-१९७६-२४

तेव्हा हा विचार ज्ञानाच्या एका विशिष्ट पातळीवरती या देशामध्ये चाललेला असताना त्याच्या खालच्या पातळीवरती मात्र हा ज्ञानाचा प्रवाह जितका झिरपायला पहिजे होता तितका झिरपलेला आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून हे नवं ज्ञान, ही नवी वैज्ञानिक दृष्टी, ऐहिकतेची दृष्टी, नव्या कल्पना शोधण्याची दृष्टी आपल्या लहान मुलांना उपजतच मिळाली पाहिजे. त्यांच्या कुटुंबामध्ये जर खोट्याच समजुती आज असतील, भुतेखेते, जादुटोणे, नवससायासाचे आणि व्रतवैकल्याचेच जर त्यांचे वरती संस्कार असतील तर त्यांची मनं त्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत आणि जगाच्या चाललेल्या या स्पर्धेतल्या ज्ञानाची ही शिदोरी आहे. ती त्याला कधीच अवगत करता येणार नाही आणि त्यांची मनं सतत मागासलेली राहतील. म्हणून वरच्या राष्ट्रीय पातळीवरती निर्माण झालेल्या ज्ञानाचा प्रवाह हा जेव्हा झरत झरत खालपर्यंत येईल त्यावेळी युरोपमध्ये एक धर्मनष्ट कुठल्याही बाह्य बंधनापासून मुक्त अशा प्रकारचा समाज निर्माण झाला तशा प्रकारचा समाज आपल्याला या ठिकाणी निश्चितच निर्माण करता येईल. म्हणून या अज्ञानासंबंधी आपण जितका खोलवर विचार करू तर तुमच्या असं लक्षात येईल की ते फारच प्रचंड आहे. आणि पुरुषांच्या साक्षरतेकडून तुम्ही स्त्रियांच्या साक्षरतेकडे वळलात तर २० टक्क्यांची साक्षरता. त्या २० टक्क्यांमध्ये तशा ख-या अर्थाने सुशिक्षित, सुसंस्कृत, ज्ञानवंत अशा किती स्त्रिया मिळतील? आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिराजी आहेत म्हणून स्त्रियांनी सगळंच कर्तृत्व गाजवलं आहे असं म्हणून अपवादाला नियम समजण्याची चूक आपण करू नये असे मला वाटते हे आपल्याच देशामध्ये दिसतं. ज्या प्रमाणामध्ये स्त्रियांमध्ये बुध्दीचा, ज्ञानाचा साठा पोहोचायला पाहिजे तितका अजून नाही पोहोचलेला. अजून लिहावाचायलासुध्दा आपल्या स्त्रिया शिकलेल्या नाहीत. ग्रामीण भागामध्ये पुरुषांची गुलाम याच्या पलीकडे स्त्रीला महत्त्व नाही.

राष्ट्रात जो नवा विचार येत असतो त्या नव्या विचाराला जुळवून घेणारी मन:स्थिती लोकांची नसेल तर लोक पुढे जात नाहीत. फॅमिली प्लॅनिंगचे उदाहरण घ्या, कुटुंब नियोजनाच्या बाबतीत किती अडथळे खेड्यांतून आपल्याला येतात ? लोकांना नानात-हेने समजावून सांगावं लागतं तरी देखील त्यांच्या मनावरती जुनी असलेली दडपणं, पुरुषांचा असलेला त्यांच्या मनावरती दाब कमी होत नाही कुटुंबनियोजनाच्या शिबिरामध्ये पुरुषांचे शिबीर असले की पुरुष लोक येतच नाहीत आणि स्त्रियांचं शिबिर असलं की स्त्रिया येत असल्या तरी अडवणारे पुरुष असतात. हे प्रत्यक्ष वास्तव चित्र दिसतं, हे अज्ञानातून निर्माण झालेलं आहे. राष्ट्राच्या समस्यांच पूर्ण ज्ञान न झाल्यामुळे, पुढे एक संकट आपल्याला गिळणार आहे याची कल्पना न आल्यामुळे, हे निर्माण झाले आहे. हे समाजाला सांगायचं कोणी ? हे अज्ञानाचं पटल आहे. असे अनेक क्षेत्रांमध्ये आहे. काल मी देवीच्या रोगासंबंधी उदाहरण दिलं आपल्याला रस्त्यावर लिहावं लागतं, “देवीची केस कळवा नि हजार रुपये मिळवा” हे कशाचं प्रतीक आहे? हा सिंबॉल आहे, आमच्या अज्ञानाचा ! आमच्या अज्ञानाचे, धर्मभोळेपणाचे, आमच्यामध्ये असलेल्या संस्कारातून बाहेर न पडण्याच्या वृत्तीचे ते दर्शन असल्यामुळे हे भेदण्याचे काम शासानाने व सामाजिक कार्यकर्त्यांनी, संस्थांनी जर हातांत घेतलं नाही तर सगळे फरक फक्त कागदावर घडताना दिसतील. प्रत्यक्ष जीवनात दिसणार नाहीत. म्हणून या अज्ञानाचा या ठिकाणी मुद्दाम मी उल्लेख केला.

दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे दारिद्र्य, दारिद्र्य या देशाच्या पाचवीला अगदी शतकानुशतकं पुजलेलं आहे. एक काळ असा होता की देशातले प्रत्येक खेडं स्वयंपूर्ण होतं. आणि महात्माजींसारख्या थोर पुरुषानं या देशाचं जे स्वप्न रंगवलेलं होतं, ते स्वयंपूर्ण खेड्यांतून निर्माण झालेल्या स्वयंपूर्ण राष्ट्राच होत. ते कितपत यशस्वी झालं असतं या चर्चेत आपणाला शिरायचं नाही परंतू त्याच्या मागची भावना मात्र निश्चित समजावून घेता येईल. त्यांना त्यावेळी म्हणायचं होत की या देशातला खरा माणूस हा खेड्यामध्ये राहतो. त्याची सुखदु:खं ही वेगळी आहेत. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणून त्यांची उत्तरे वेगळी शोधली पाहिजेत. मोठे कारखाना घालून त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून खेड्यापासून विकासाला सुरवात करा आणि ग्रामोद्योगाची संघटना बांधा. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राम शिक्षणाची योजना आणा. आणि या ग्रामापासून सुरवात केली की या ग्रामराज्यातून सुराज्या निर्माण होईल. त्यांच्यामागे हा स्वयंपूर्णतेचा आणि स्वयंपूर्णतेतून तिथल्या माणसाचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयोग होता.