कृष्णाकांठ१७४

१९४२ च्या उग्र आंदोलनानंतर होत असलेली ही पहिली निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीचा प्रचार हा या चळवळीच्या यशाचा प्रचार होता. लोकांचे मन उत्साहाने इतके तुडुंब भरून गेले होते, की आम्ही उमेदवार भाषण करण्याऐवजी नुसता नमस्कार करण्याकरता जरी लोकांच्या पुढे राहिलो, तरी टाळ्यांचा कडकडाट होत असे. लोकांचे प्रेम काठोकाठ भरून आले होते. आम्ही जेथे जाऊ, तेथे हजारोंनी माणसे ताटकळत वाट पाहत बसलेली असत. शक्यतो प्रयत्न करून आम्ही चारही उमेदवार एकत्र प्रचारासाठी हिंडलो आणि त्याचाही अतिशय योग्य तोच परिणाम झाला. माझे निवडणुकीचे काम सुरू झाल्यानंतर श्री. गणपतरावांनी हॉस्पिटल सोडून दिले आणि सरळ कराडमध्ये मुक्काम ठोकून ते निवडणुकीच्या कामात लक्ष घालू लागले. त्यांना मी सांगून बघितले, पण त्याचा उपयोग झाला नाही. आपला भाऊ मुंबई विधानसभेसाठी निवडणूक लढवितो आहे, याचाच त्यांना अतिशय आनंद झाला होता. त्यांच्या त्या आनंदात काही कमतरता यावी, अशी इच्छा माझ्याही मनात नव्हती. म्हणून मी तो प्रश्न तसाच तेथे सोडून दिला.     

गेल्या ४० वर्षांत राज्य विधानसभेची धरून, दहा निवडणुका मी लढविल्या. कधी चुरशीच्या, कधी थोड्या मतांनी, कधी लाख मतांनी, तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीतील अनुभव वेगळा, राजकीय कसोट्या वेगळ्या, त्या वेळचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे, अशा होत्या. पण १९४६ सारखी सर्वमान्य निवडणूक कधीच झाली नाही. ही आणि नाशिकची पार्लमेंटची निवडणूक सोडली, तर माझ्या सर्व निवडणुका मोठ्या वादळी होत्या. प्रतिपक्षांनी आपापल्या मुलुखमैदानी तोफा डागल्या होत्या. अभद्र आणि कटुतेच्या प्रचाराचा त्यांनी कळस केला. या सर्व निवडणुकांत माझा सर्वांत मोठा प्रचारक माझा मीच असे. संभाषणशैलीतील मनमिळाऊ, सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ आणि प्रांजळ प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे, असे माझ्या लक्षात आले; आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व माझ्या कार्यकर्त्या मित्रांच्या संघटित सहकार्याने मी अपराजित ठरलो. लोकशाहीच्या राजकारणात याच्यापेक्षा अधिक काय अपेक्षा करावयाची?

लोकसभेसाठी १९६३ साली नाशिक जिल्ह्यातून मी निवडणूक लढविली, तेव्हा मी बिनविरोध निवडून आलो; परंतु त्यामुळे लोकांमध्ये प्रचारासाठी जाण्याचे कारण पडले नाही व जनसंपर्क आला नाही, ही त्या निवडणुकीतील एक उणीव मला भासली. नाशिककरांनी मला बिनविरोध निवडून दिले, याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. नाशिकच्या या निवडणुकीनंतर  नाशिक येथे भरलेल्या एका सभेत कवी कुसुमाग्रज यांनी काढलेले पुढील उद्गार मी कधीच विसरणार नाही :
''भूगोलात कृष्णा-गोदावरीचा संगम नाही, पण या निवडणुकीने हा संगम इतिहासात घडून आला.''

१९४६ मधील या निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी मी कराडमध्ये राहिलो. मतमोजणी सातारा येथे होती. माझे प्रतिनिधी म्हणून मी माझे बंधू श्री. गणपतराव यांना पाठवून दिले. त्यांची इच्छा होती आणि हौस होती. मलाही बरे वाटले, की ते हे काम पाहायला गेले. निवडणुकीचा निकाल तर स्पष्टच होता. फक्त तांत्रिक दृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या तो जाहीर व्हायचा होता.

आम्ही काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आलो आणि मी जीवनाच्या एका नव्या आणि अनोख्या पण आकर्षक क्षेत्रात पदार्पण केले. यामुळे माझ्या जीवनाला संपूर्ण वेगळे वळण लागणार आहे, असे तेव्हा माझ्या लक्षात आले नाही. परंतु या निवडणुकीने माझ्या जीवनामध्ये संपूर्ण बदल केला, ही गोष्ट मला मान्य केली पाहिजे. माझ्या बंधूंचा सल्ला न मानता मी किंचित बाजूला राहण्याचा प्रयत्न केला असता, तर ती आयुष्यातील फार मोठी चूक झाली असती, असे मला प्रामाणिकपणे कबूल केले पाहिजे.