कृष्णाकांठ१७१

ऍटली यांनी १९४५ साली राष्ट्रीय सरकार पुढे चालू न ठेवता निवडणुका घेणे अपरिहार्य ठरविले, त्यामुळे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवायला फार मोठी मदत झाली आहे, ही गोष्ट लक्षात यावी, म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कामाचा येथे मी उल्लेख केला आहे. चर्चिल या निवडणुकीला फारसे उत्सुक नव्हते. युद्धाचे नेतृत्व करण्यास लागणारे वक्तृत्व, लढाईच्या तंत्राचे ज्ञान आणि लोकांना लढाईच्या काळामध्ये हवे असणारे ढंगदार नेतृत्व देण्याचे कौशल्य हे सर्व त्यांच्याजवळ होते. पण प्रत्यक्ष लोकमताच्या परीक्षेची वेळ जेव्हा जवळ आली, तेव्हा ती टाळावी, असाच त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या युद्धाच्या आठवणींच्या शेवटच्या ग्रंथामध्ये दिलेला एक प्रसंग सहज माझ्या ध्यानात येतो. निवडणुका जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करून ते पोटसँडम येथील बैठकीकरता चालले असताना वाटेत स्पेनच्या सीमेवर एका अतिशय सुंदर स्थळी विश्रांतीसाठी थांबले होते आणि वेळ जावा, म्हणून त्यांचा चित्रकलेचा जो नाद होता, तो पुरा करण्यासाठी हातामध्ये ब्रश घेऊन ते त्यांच्या आवडीची दृश्ये टिपत होते. त्यांनी सांगितले आहे, की
'या कामात मी गुंतलो असतानासुद्धा ही निवडणूक दारावर टकटक करते आहे, किंवा खिडक्यांतून वाकून बघते आहे, असे मला वाटू लागले.'

चर्चिलने निवडणुकीची किती धास्ती घेतली होती, याचा यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे आहे? १९४५ च्या जुलैच्या आठवड्यात निवडणुकींचा निकाल लागला आणि युद्धकाळाचा हा इंग्लंडचा परमश्रेष्ठ नेता एका पराभूत पक्षाचा नेता ठरला. हिंदुस्थानातील सत्तांतराच्या राजकीय हालचालींनी ह्या क्षणी जन्म घेतला, असे म्हटले, तरी चालेल.

१९४५ साल सुरू झाल्यानंतर स्थानबद्ध असलेल्यांपैकी पुष्कळ लोक सुटून येऊ लागले. वर्किंग कमिटीचे बरेच नेते सुटून बाहेर आले आणि एक प्रकारचे मोकळे वातावरण राजकारणामध्ये सुरू होऊ लागले. मला आठवते, याच काळात गांधीजी विश्रांतीसाठी पाचगणीला आले होते. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीसंबंधाने सरकारी प्रचार अगदी एकांगीपणाने चाललेला होता. भूमिगत चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बदनाम करण्याचा संघटित प्रयत्न सरकारने सुरू केला होता आणि त्याला ते प्रसिद्धि देत होते. या भूमिगत चळवळीची माहिती गांधीजींच्या कानांवर गेली होती. एवीतेवी ते आता आपल्या जिल्ह्यात आलेच आहेत, तेव्हा त्यांच्याशी जाऊन भेटून बोलले पाहिजे आहे, असे मी आणि माझ्या मित्रांनी श्री. भाऊसाहेब सोमण यांना आग्रहाने सांगितले आणि पाचगणीला गांधीजींशी आम्ही मुलाखत मागितली. गांधीजी तेथे विश्रांतीसाठी आले होते, त्यामुळे त्यांना जास्त त्रास द्यावयाचा नाही, असे सामान्यत: धोरण होते. पण अर्ध्या तासाचा वेळ त्यांनी आमच्यासाठी दिला आणि ते आमच्याशी फार मोकळे वागले. शांतपणे आमचे बोलणे त्यांनी ऐकून घेतले. भूमिगत चळवळीच्या लोकांची बाजू मांडण्याचे काम श्री. भाऊसाहेब सोमण आणि मी केले. गांधीजींनी आम्हांला सांगितले,
''मी या संबंधाने सगळे ऐकले आहे. या चळवळीच्या सर्व प्रकारांबद्दल मी माझे मत देऊ इच्छीत नाही. पण या चळवळीत काम करणारे सर्व देशभक्त आहेत, हे मी मान्य करतो. त्यांच्या पद्धती ह्या माझ्या पद्धती नाहीत, हेही मला स्पष्ट केले पाहिजे...'' वगैरे वगैरे.

आम्हांला एवढेही पुरेसे होते. गांधीजींच्या तोंडून भूमिगतांच्या कार्यक्रमाला आशीर्वाद मिळविणे शक्य नव्हते आणि आवश्यकही नव्हते. परंतु भूमिगतांच्या सर्व क्रियाशीलेतेच्या पाठीमागे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीची ऊर्मी होती, ही गोष्ट या देशाच्या सर्वश्रेष्ठ नेत्याने मान्य केली, यात सर्व काही पोहोचले, अशी आमची भावना आहे.

त्यानंतर वृत्तपत्रांत पंडित नेहरूंची भूमिगत चळवळी संबंधीची मुलाखत वाचली आणि अभिमानाने ऊर भरून आला.

'जेव्हा राष्ट्र दडपशाहीखाली दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा जनता जर बंड करून उठली नसती, तरच आश्चर्य होते. हिंसे-अहिंसेचे हे प्रश्न तांत्रिक आहेत.' अशा अर्थाचे पत्रक त्यांनी काढले होते आणि भूमिगत चळवळीला आणि कार्यकर्त्यांना नैतिक पाठबळ दिले होते.