महाराष्ट्रातील दुष्काळ - ६५

घनमापन पद्धतीचे फायदे  :

१)  नवीन कालवे आठमाही असावेत की बारमाही हा वाद संपुष्टात येईल.  घनमापन पद्धत जुन्या व नव्या कालव्यांवर सर्वांना सारखीच लागू करावयास काहीच अडचण नाही.

२)  पाणीवाटप क्षेत्राच्या समप्रमाणात होत असल्यामुळे समादेश क्षेत्रामधील सर्वांना पाण्याचा फायदा मिळेल.

३)  हल्ली चालू असलेल्या बारमाही पद्धतीने सरकारी तिजोरीत जितका पैसा जमा होतो तितकाच पैसा घनमापन पद्धतीने जमा होईल.

४)  हल्ली चालू असलेल्या पद्धतीत पीक पक्वदशेस आणण्याची जबाबदारी शासनाची आहे.  घनमापन पद्धतीत ही जबाबदारी शेतकर्‍याची राहील.

५)  घनमापन पद्धतीने पाणी दिल्यामुळे शेतकर्‍याला हवे असलेले ज्यादा पाणी ती विहिरी खणून उपलब्ध करेल.  विहिरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेण्याचा प्रश्न राहाणार नाही.

७)  पाणी अगदी काटकसरीने वापरावे लागणार असल्यामुळे जमिनी उपळट होणार नाहीत.

८)  जुन्या कालव्यावर वडिलोपार्जित चालू असलेली ब्लॉकची मक्तेदारी पद्धत कमी होऊन पाण्याचे वाटप समप्रमाणात झाल्याने कालव्याच्या बिगर बारमाही व कोरड भणातील शेतकर्‍यांना पाण्याचा फायदा घेता येईल.