• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-४३

खालचा समाज अजून भोळा, अज्ञ आहे. जनसंघाची जनतेबद्दलची ही जी भावना आहे ती चुकीची आहे. आज खालचा समाज ते समजतात तितका भोळा राहिलेला नाही. कोणी कितीही मोठा असला तरी त्याचे राजकारण जोखून पाहिल्याशिवाय जनता आंधळेपणाने त्याच्या मागे जाणार नाही. जनसंघाने समाजाची ही परिस्थिती न ओळखल्यामुळेच जनतेमध्ये त्या पक्षाची शक्ती वाढत नाही. त्या पक्षामध्ये काही शक्ती आहे हे मी जरूर मानतो. परंतु जनता अज्ञ आहे आणि तिला भिवविण्याचा प्रयत्‍न केला जातो अशी जी त्यांची समजूत आहे ती चुकीची आहे. विजयी पक्षाकडून इन्टिमिडेशन होते अशा प्रकारची हवा पसरविण्याचा जो प्रयत्‍न केला जात आहे ती एक प्रकारची आसुरी भावना आहे असे मी म्हटले तर कोणी राग मानू नये. या सभागृहात ज्यावेळी गंभीर आरोप केला जातो त्यावेळी तो आरोप सिद्ध झाला तर ज्या सरकारवर आरोप केला जातो त्या सरकारला स्वतःला सरकार म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. इतके मौलिक महत्त्व मी या प्रश्नाला देतो. लोकशाहीत विरोधी पक्षाचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरलो तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून राहण्याचे आमचे हक्क आम्ही सोडून दिले पाहिजेत. परंतु त्याचबरोबर हेही खरे की, वर्तमानपत्रात आलेली प्रत्येक हकीगत बरोबर असते असे धरून चालता येत नाही.

काँग्रेसपक्षाकडून झालेल्या अपराधांचा पाढा वाचला गेला. परंतु विरुद्ध पक्षाकडून काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाचा पाढा मी वाचू शकतो. गेल्या १९६२ च्या निवडणुकीत माझा स्वतःचा जो अनुभव आहे तो मी या ठिकाणी सांगत बसत नाही.परंतु त्या अनुभवावरून काँग्रेसपक्षातील माणसेच तेवढी दडपशाही करतात आणि इतर पक्षाची करीत नाहीत असे म्हणता येणार नाही. मला अनुभवास आलेल्या सगळयाच गोष्टी मी सांगत नाही. तथापि एक अनुभव मी पोलीस ऑफिसरना सांगितला तो या ठिकाणी सांगतो. निवडणुकीच्या आदल्या दिवशी माझ्या शहरात मी प्रचारासाठी हिंडत असताना विरोधी पक्षातील एक चांगले कार्यकर्ते रस्त्यातच माझ्या अंगावर येऊन आदळले. त्यांच्या तोंडाला दारूचा वास येत होता. माझ्या गळयात येऊन पडल्यानंतर त्यांनी मला विचारले, ''मी दारू प्यालो आहे असे तुम्हाला वाटते काय ?'' या कार्यकर्त्यांच्या तोंडाला दारूचा वास तर येत होता, अशा परिस्थितीत काय करावे असा माझ्यापुढे प्रश्न होता. दुसर्‍या दिवशी निवडणूक होती आणि मी आज काही केले असते तर त्यांचा गैर रीतीने अर्थ लावला जाण्याचा संभव होता. शेवटी मी त्याला म्हटले, ''बाबा रे, तू दारू प्यालेला नाहीस, आता घरी जाऊन स्वस्थ झोप.'' मी त्यावेळी या राज्याचा मुख्यमंत्री होतो तरी असहाय्य होतो. त्या वेळच्या राजकीय वातावरणात मी काही केले असते तर गैरसमज निर्माण झाला असता. तेव्हा मी विचार केला की आज या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे. मी हा माझा अनुभव सांगितला. अशा परिस्थितीत मी काय करणार ? सन्माननीय सभासद खासगी चर्चा करणार असतील तर मी अशा अनेक मनोरंजक हकिगती सांगेन. मी असे म्हणत नाही की काँग्रेसच्या बाहेरचेच लोक चुकीचे वर्तन करतात. परंतु कृपा करून असेही समजू नका की लोक काँग्रेसमध्ये आले म्हणजेच त्यांच्या या भावना होतात. विजय मिळाल्यानंतर सगळयाच माणसांच्या मनात अशा तर्‍हेची वृत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जे पराजित झालेले असतात त्यांच्याही मनात अशा तर्‍हेची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून समतोल सांभाळण्याचे काम तुम्हा आम्हाला, शासनयंत्रणेला, केले पाहिजे आणि म्हणून या बाबतीत नुसते मोघम बोलण्यामध्ये अर्थ नाही.  सहा महिन्यानंतर अशा तर्‍हेचे मोघम आरोप करण्यापेक्षा त्याचवेळी निश्चित आणि स्पष्ट शब्दात तक्रारी केल्या पाहिजेत, म्हणजे त्यांची चौकशी करून आवश्यक ती उपाययोजना करणे शक्य होते. ज्यावेळी अशा घटना घडल्या असतील आणि त्यात गुन्हेगारांना शासनयंत्रणेने प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्‍न केला असेल त्यावेळी त्या माझ्या किंवा त्या त्या ठिकाणच्या अधिकार्‍याच्या नजरेला आणल्या पाहिजेत. ते न करता सवडीनुसार आणि सोयीस्कर वाटेल तेव्हा अशा तर्‍हेच्या भावना पसरविण्याने दुसर्‍या पक्षावर अन्याय होतो आणि म्हणून मला साफ सांगितले पाहिजे की, एखाद्या पक्षाविरुद्ध किंवा शासनयंत्रणेविरुद्ध अशा तर्‍हेची सरसकट टीका करण्याची दृष्टी बरोबर नाही. निवडणुका झाल्यानंतर मी आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि विजयी उमेदवारांना कटाक्षाने सांगितले होते की, विजय विनयाने घ्या. त्यानंतर ज्या ज्या वेळी भाषणे करण्याची मला संधी आली आणि आमच्या प्रांतिक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना बोलण्याचा प्रसंग आला त्या त्या वेळी त्यांनी आग्रहाने हीच गोष्ट मांडली. सन्माननीय सभासदांनी त्या वेळचे वृत्तपत्रांचे रकाने शोधून काढले तर त्यांना हे सापडेल. आम्ही निव्वळ एका पक्षाचे सरकार म्हणून या ठिकाणी काम करीत नाही. सरकार लोकांचे, सर्व जनतेचे आहे, म्हणून सरकारने जनतेच्या मूलभूत हक्कांचे रक्षण केले पाहिजे असे आम्ही मानतो. या प्रांतात कायद्याचे राज्य राहिलेले नाही असा आरोप करण्यात आला. तो ऐकून मला खरोखर आश्चर्य वाटले.

अध्यक्ष महाराज, I must repudiate this allegation with all the emphasis at my command. मी निषेध करीत नाही, कारण निषेधाची भाषा मला मंजूर नाही. परंतु आपण मोघम बोलू नका हे मला सांगितले पाहिजे. आपल्या काही तक्रारी असतील तर आपण मला त्या निश्चित स्वरूपात सांगा. शासनयंत्रणेतील त्या त्या ठिकाणच्या अधिकार्‍याना सांगा, कलेक्टर, डी.एस.पी. आदी अधिकार्‍याना सांगा. त्या तक्रारीचे निवारण करण्याच्या कामी शासनयंत्रणेची संपूर्ण ताकद मदतीला येईल असे मी सांगू इच्छितो. परंतु केवळ संशयाने असे खोटे वातावरण निर्माण करू नका असे मला सांगावयाचे आहे. दुसरे असे की आम्ही नेहमीच प्रचंड बहुमताने निवडून येऊ असे नाही, आज विरोधी पक्ष दुबळा आहे, पण गेल्या वेळी आम्ही दुबळे होतो आणि विरोधी पक्ष सबळ होता. पण त्यावेळी आम्ही तक्रार केली नाही. रागावलो नाही, तर लोकांची सेवा करीत राहिलो. विरोधी पक्षाचे लोक आमच्यावर दडपण आणतात अशी तक्रार केली नाही. त्यावेळी विरोधी पक्षांनी स्वीकारलेले मार्ग आणि पद्धत यांची आठवण झाली की त्यावेळी लोकशाही कोठे गेली होती असे वाटू लागते. त्यावेळी आम्हालाही काही मते होती आणि ती मांडण्याचा आम्हाला हक्क होता. परंतु आम्ही आमची मते जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्‍न करीत असताना विरोधी पक्षांच्या लोकांनी आमच्याशी कसे वर्तन केले, ते आमच्याविरुद्ध काय काय बोलले, काय प्रचार केला, याची त्यांनी आपल्या मनाशी आठवण करावी, हे जे सहन करावयाला शिकतात त्यांना लोकमताला मार्ग दाखविण्याचा अधिकार मिळतो. त्यावेळी आमची मते आमच्या विरोधी पक्षांच्या मित्रांना मंजूर नसतील. आमची ती मते कदाचित खरी किंवा खोटी ठरली असतील. पण आम्हाला आमची मते मांडण्याचा अधिकार होता. तो अधिकार आम्हाला वापरू दिला का ? मते मांडण्याचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे.