• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-४४

परंतु त्या आत्म्याची त्यावेळी काय थट्टा केली गेली याचा विचार केला पाहिजे. अर्थात त्यावेळी विरोधी पक्षांच्या लोकांनी काही गोष्टी केल्या असतील म्हणून आम्ही त्या आज केल्या तर क्षम्य आहे असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. परंतु मी हे सांगू इच्छितो की, जेव्हा आम्ही दुबळे होतो तेव्हा कधीही असे झाले नाही अशी तक्रार केली नाही, आम्ही त्यावेळी विचार केला की आपण काम केले पाहिजे, लोकांची आणखी सेवा केली पाहिजे आणि आपली शक्ती वाढविली पाहिजे. आजही आमच्या पक्षात काही माणसे अशी असतील की, जी योग्य रीतीने वागत नसतील. ती जबाबदारी मी टाळू इच्छित नाही. परंतु कृपा करून असे समजू नका की अशा माणसांचा मक्ता आमच्याच पक्षाने घेतला आहे. कोणत्या पक्षातील कोणती माणसे काय करतात हे मी खाजगी रीत्या नावनिशीवार सांगू शकेन. गेली पंधरा वर्षे मी राज्यकारभारात आहे. तसेच, वयाच्या १६ व्या वर्षापासून मी राजकारणामध्ये वाढलो आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षातील व्यक्तींना मी नावाने आणि कामाने ओळखतो. केवळ पोलिसांच्या रिपोर्टावर काम करणारा मी मनुष्य नाही. माझ्यातील दोषांची आणि गुणांची जशी मला जाणीव आहे तशीच त्यांच्यातीलही दोषांची आणि गुणांची मला माहिती आहे. तेव्हा एकाच पक्षामध्ये वाईट गोष्टी आहेत अशा कल्पनेने किंवा भावनेने चुकीचे वातावरण निर्माण करू नका. काहीतरी चुकीच्या कल्पना मनाशी धरून महाराष्ट्रात न्यायाचे वातावरण नाही, कायद्याचे राज्य राहिलेले नाही, असे वृथा आरोप करून महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या जनतेवर, महाराष्ट्राच्या सरकारवर अन्याय करू नका, असे मला सांगावयाचे आहे.

प्राचार्य खर्डेकर यांच्याबद्दल मला आदर आहे. ज्या कॉलेजात मी शिक्षण घेतले त्या कॉलेजात ते प्राध्यापक होते. आजही मला कळले की ते मुंबईत आले आहेत तर वेळात वेळ काढून मी त्यांना भेटण्याचा प्रयत्‍न करतो. अशा माणसासंबंधी कोणी वाईट घोषणा केल्या असतील तर त्याला मी केव्हाही चांगले म्हणणार नाही. पण कोणी घोषणा केल्या, काय म्हटले, कसे म्हटले हे निश्चित माहिती असल्याशिवाय त्याबाबत काही करणे कठीण आहे. विजयी झाल्यानंतरसुध्दा त्या लोकांच्या मुखातून अशा घोषणा निघाल्या नसतील असे नाही. सांगलीला व औरंगाबादला जेव्हा काही प्रकार घडले तेव्हा श्री. वसंतराव पाटील ६८ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) आणि श्री. केशवराव सोनवणे ६९ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांच्यासारख्या मंडळींनी त्या लोकांना आवरण्याचा प्रयत्‍न केला आणि तो सर्व ठिकाणी केला पाहिजे. परंतु यावरून असे सिद्ध होत नाही की सर्व गैरप्रकार करण्याचा मक्ता फक्त या पक्षाकडे आला आहे. असे म्हणून त्यातून कोणी सुटू शकणार नाही. वास्तविक, असले प्रश्न - सार्वजनिक जीवनात नेहमी उद्‍भवणारे प्रश्न - तुम्ही आम्ही सगळयांनी विचार करून सोडवावयाचे आहेत. अर्थात जजेस् म्हणून कोणाला दोषी ठरविण्याकरिता म्हणून बसत असाल तर आम्ही बसू इच्छित नाही. तुम्ही स्वतः न्यायाधीश होणार आणि आम्ही तुमच्यापुढे आरोपी म्हणून उभे राहणार हे मला मान्य नाही. सार्वजनिक जीवनात प्रत्येकाने कसे वागावे यासंबंधी आचारसंहिता निश्चित करण्याकरिता बसण्याची आमची तयारी आहे. अर्थात ते एकमेकांच्या उणीवा काढण्याच्या दृष्टीने नव्हे तर सार्वजनिक जीवन अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने. परंतु तुम्ही स्वतः न्यायाधीश होणार आणि आम्हाला आरोपी करणार हे आम्हाला अमान्य आहे. अशा तर्‍हेची जिम्मेदारी कोणत्या माणसावर द्यावी यासंबंधी चर्चा झाली होती. ट्रिब्युनल नेमावे अशी चर्चा झाली होती, परंतु असे ट्रिब्युनल नेमणे शक्य नाही अशा निर्णयाला ती मंडळी आली. कारण न्यायाधीश बनणे फार कठीण आहे. कारण ती व्यक्ती संपूर्णपणे राजकारणाच्या बाहेर असली पाहिजे, तिच्या मनातील राग, लोभ, पूर्वग्रह तिने विसरले पाहिजेत आणि राजकारणासंबंधीचे रागलोभ नसणारी माणसे महाराष्ट्रात आहेत असे मी आग्रहाने म्हणणार नाही, मी म्हणू इच्छित नाही. ती चांगली माणसे आहेत, मोठी माणसे आहेत, पण सर्वोदयवादीसुध्दा राजकारणी नाहीत असे मी मानीत नाही. अर्थात ती मोठी माणसे आहेत, चांगली माणसे आहेत. पण ते राजकीय पक्षात नसले तरी राजकारणात आहेत. श्री. जयप्रकाश नारायण ७० (टिप पहाण्यासाठी येथे क्लिक करा)  यांनी सांगितले की मी कोणत्याही राजकीय पक्षात नाही, पण तेही राजकारणावर मधून मधून बोलत असतात. या देशामध्ये सगळयांना राजकीय दृष्टिकोन आहे. तेव्हा राजकारणापासून संपूर्णपणे अलिप्त असे जजेस् तुम्हाला मिळणार नाहीत. तेव्हा याबाबत एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे काही सिध्दांत मान्य करून त्यांचे पालन कोणत्या पक्षाकडून किती प्रमाणात होते हे पाहाण्याचे काम लोकांवर सोपविणे. या बाबतीत लोकांचे, जनतेचे, जे काही व्हर्डिक्ट असेल ते स्वीकारावयाला मी तयार आहे. I am prepared to accept the verdict of the people. आपण मार्ग काढण्यासाठी, चर्चेसाठी बसावयाला हरकत नाही. परंतु काँग्रेस हा राज्यकर्ता पक्ष आहे म्हणून सगळे आरोप त्याच्याविरुद्ध करण्याचे आणि तोच विजयोन्मत्त पक्ष आहे असे म्हणण्याने एकत्र बसण्याची भूमिकाच नाहीशी होते. काही माणसांना विजयाने, तर काहींना पराजयानेही उन्माद चढतो. पराजित माणसाच्या मनातही द्वेषाची, उन्मादाची भावना निर्माण होऊ शकते. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. द्वेष व उन्माद विजयामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यापेक्षा पराजयातून तो निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. ती एक मानसिक प्रक्रिया आहे. अर्थात याकडे दुर्लक्ष करता कामा नये. पण त्यासाठी मला आपण सांगितले पाहिजे, निश्चित स्वरूपात सांगितले पाहिजे की, अशा एक, दोन, तीन केसेस आहेत, त्यासंबंधी कारवाई करा, मी जरूर करीन ही यासंबंधी सरकारची भूमिका आहे,एवढे नम्रपणे सभागृहापुढे मांडण्याव्यतिरिक्त मी काय करणार ?
--------------------------------------------------------------------------------------
Shri Y. B. Chavan, Chief Minister, while replying to the discussion regarding the alleged panicky situation created by the Congress Party Workers, refuted the charges levelled by the Opposition members against the Congress workers. He cited, on the other hand various cases of intimidation on the part of the Opposition workers threatening the Congressmen, after the elections.