• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-८

पश्चिम महाराष्ट्रातदेखील मराठी भाषा १०-१० मैलांवर थोडयाशा निराळया पद्धतीने बोलली जाते आणि प्रत्येक ठिकाणच्या लोकांना ते ज्या पद्धतीने मराठी बोलतात त्या पद्धतीचा अभिमान वाटतो. पुण्याची मराठी चांगली समजली जाते आणि इतर ठिकाणचे लोक पुण्याच्या मराठीसारखी मराठी बोलणे आपल्याला जमते काय हे पाहण्याचा प्रयत्‍नही करतात. परंतु असे असले तरी पुण्याला राहणार्‍या प्रत्येक माणसाला आपल्या ठिकाणच्या मराठी बोलण्याच्या पद्धतीबद्दल एक बारीकसा का होईना पण अहंकार वाटतो. अभिमान वाटतो, जवळीक वाटते, सातारी पद्धतीने मराठी बोलणारी व्यक्ती भेटली तर मला हे कबूल केले पाहिजे की, त्या मराठीबद्दल अगदी पाच टक्के नाही तरी अर्धा टक्का तरी जवळीक मला वाटायला लागते. हा मनुष्यस्वभावाचा दुबळेपणा आहे. परंतु तो वीकनेस आहे, परंतु तो ह्यूमन वीकनेस आहे. तेव्हा अशी परिस्थिती राहणारच आणि ती राहणे स्वाभाविकच आहे. म्हणून विदर्भाचा अभिमान कोणाला वाटत असेल, विदर्भाच्या प्रश्नासंबंधी कोणाला आपुलकी आणि जिव्हाळा वाटत असेल तर त्यात काही गैर नाही. तशी ती आपुलकी किंवा जिव्हाळा वाटला पाहिजे. वाटला नाही तरच अडचण आहे. इतकेच नव्हे तर त्यात किंचितसा आरोग्यदायी स्पर्धेचा भाग असेल तर त्यातदेखील काही गैर नाही. म्हणूनच मी म्हटले की, आम्ही जेव्हा भावनात्मक ऐक्याची गोष्ट बोलतो तेव्हा आम्हाला मेंटल रेजिमेंटेशन किंवा युनिफॉर्मिटी किंवा एकसाचेपणा निर्माण करावयाचा आहे असा त्याचा अर्थ नाही. परंतु त्याचबरोबर एकजिनसी एकराज्य निर्माण करण्याकरिता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांचादेखील आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्याकडे आपले दुर्लक्ष होऊ देता कामा नये.

या सगळया पार्श्वभूमीवर या ठरावाचा आपण विचार केला पाहिजे. जेव्हा असेंब्लीचे अधिवेशन नागपूरला नेण्याचा आम्ही प्रयत्‍न करतो तेव्हा त्याच्यामध्ये हाही एक भाग आहे की, नागपूरमध्ये अधिवेशनासाठी लागणार्‍या सगळया सोयी आहेत. एक राजधानीचे शहर म्हणून वाढल्यामुळे त्या ठिकाणी असेंब्लीचे अधिवेशन भरविण्याकरिता लागणार्‍या वृत्तपत्रीय संघटनेचे क्षेत्र आहे. त्यासाठी आवश्यक असणारे सामाजिक जीवन तेथे तयार आहे आणि त्याचबरोबर त्यांची जी परंपरा चालत आली आहे किंवा त्यांचे जे प्रवाही जीवन चालत आले आहे, ते आज कुंठित झाले आहे अशी जी भावना तेथील लोकांमध्ये निर्माण झाली आहे तीही दूर केली पाहिजे. सन्माननीय सभासद श्री. हॅरिस ६५ (टिप पाहाण्यासाठी येथे क्लिक करा) यांनी आपल्या भाषणात नागपूरच्या जीवनाचा त्यांना जो अनुभव आला त्याचा उल्लेख केला. प्रत्येक वेळी नागपूरला जाऊन आल्यानंतर आपला काहीतरी फायदा झाला असे त्यांना वाटल्याचे त्यांनी सांगितले. अशा तर्‍हेच्या काही चांगल्या गोष्टी नागपूरला जरूर आहेत. परंतु तशा काही गोष्टी मुंबईतसुध्दा आहेत, पुण्यामध्येसुध्दा आहेत, औरंगाबादमध्ये आहेत, अकोल्याला आहेत, सावंतवाडीला आहेत, मालवणला आहेत आणि कर्‍हाड, सातारा, सांगलीच्या बाजूलासुध्दा आहेत. (काही सन्माननीय सभासद - आहेत, आहेत.) तेव्हा नागपूरच्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा आम्हाला उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्यांच्या साहाय्याने आम्हाला आमचे जीवन एनरिच केले पाहिजे. परंतु हे करीत असताना आपली एकराज्याची जी मूलभूत कल्पना आहे तिच्याशी कोठे काही विसंगती निर्माण होते की काय तेदेखील आपण पाहिले पाहिजे. त्या दृष्टीने त्यांची जी सूचना आहे की नागपूर शहराला पर्यायी राजधानीचा दर्जा दिला पाहिजे ती या एक राज्याच्या कल्पनेशी विसंगत आहे काय हे पाहिले पाहिजे. या राज्याच्या एकंदर ज्या भावना आहेत त्या विदर्भातील जनतेला समजल्या पाहिजेत आणि तिच्यामध्ये राज्याविषयी जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे या प्रकारचा जो प्रश्न आहे तो सोडविण्यासाठी, नागपूरला अधिवेशनाच्या वेळी सरकारने काही महिने राहिले पाहिजे ही गोष्ट कबूल करण्यात आलेली आहे.

अध्यक्ष महाराज, सन्माननीय सभासद श्री.व्यास यांनी शेवटी डीसेंट्रलायझेशनसंबंधी जी सूचना केली आहे तिच्या संदर्भात शासनाची जी कल्पना आहे तिचा अर्थ ह्या ठिकाणी स्पष्ट करावासा वाटतो. त्यांनी असे सुचविले आहे की, नागपूर येथे काही खाती व त्या खात्याचे सेक्रेटरी नेण्यात यावेत. सर्व दुनियेच्या शासनाबद्दल बोलण्याची हमी न घेता, हिंदुस्थानच्या शासनापुरती मर्यादित स्वरूपाची मला जी माहिती आहे ती मी सभागृहापुढे ठेवतो. सरकारकडे इन् दि लास्ट अ‍ॅनॅलिसिस पॉलिसी मेकिंगचा अधिकार असतो. अर्थात् सरकारने आखून दिलेल्या धोरणाची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा असते ती दुसरी असते. सचिवालयाची यंत्रणा ही धोरण ठरविणारी यंत्रणा असून तिची वेगवेगळया ठिकाणी वाटणी झाली तर डिसेंट्रलायझेशन न होता डिस्इंट्रिग्रेशन होईल. सन्माननीय सभासद श्री. व्यास यांची डिसेंट्रलायझेशनची जी कल्पना आहे ती एकराज्याच्या कल्पनेशी विसंगत आहे म्हणून त्यांनी सुचविल्याप्रमाणे धोरण ठरविणार्‍या यंत्रणेची वाटणी करण्याचे ''डिसेंट्रलायझेशन'' आम्ही स्वीकारू शकणार नाही. जेव्हा नागपूर ह्या ठिकाणी अधिवेशन भरविले जाईल तेव्हा सेक्रेटरीएटचा स्केलेटन स्टाफ जाईल परंतु त्या ठिकाणी अथवा औरंगाबादसारख्या ठिकाणी कायम स्वरूपात खाती ठेवून दौलताबाद ह्या ठिकाणी राजधानी नेण्याच्या ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती आम्हाला करावयाची नाही.