“मी पाहिलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व”
आज कराडमध्ये यशवंतरावांच्या ११ व्या पुण्यतिथिच्या निमित्ताने आपण मला बोलाविले, यशवंतरावांच्या स्मृतिला आणखी उजाळा देण्याची, तसेच आपण केलेले कार्य बघण्याची संधी दिली, याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.
कराड आणि कराडच्या आसपासचा जो प्रदेश आहे, तो यशवंतरावांच्या स्मृतिने भारावलेला आहे. येथे जवळच यशवंतरावांचे जन्मस्थान आहे. यशवंतरावांचे शिक्षण येथे झाले. येथेच ते लहानाचे मोठे झाले. स्वातंत्र्य युद्धात त्यांनी येथेच भाग घेतला. येथेच त्यांनी इतिहास घडविला. येथूनच वेळोवेळी मुंबईच्या विधिमंडळामध्ये व नंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ते निवडून आले, आणि शेवटी, येथेच त्यांनी चिरंतन समाधी घेतली. आज माझे मन या सर्व आठवणींनी भारावलेले आहे.
यशवंतराव आणि माझा संबंध ३५ वर्षापूर्वी त्यांचा स्वीय सहायक म्हणून झाला. परंतु मित्रत्वाचा संबंध शेवटच्या दिवसांपर्यंत राहिला. असा संबंध निरनिराळ्या त-हेने, निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या प्रकारे जिव्हाळ्याचा निर्माण झाला. माझे आणि त्यांचे नाते अत्यंत नाजूक, पण बंधुत्वाचे होते. मी शासकीय चाकोरीत होतो. ते राजकीय नेते होते. एक राजकीय उच्च पदस्थ नेता आणि एक उच्च पदस्थ शासकीय अधिकारी यांच्या संबंधामध्ये जे एक नाजूक नाते असते, त्याची त्यांना चांगली जाणीव होती. जिव्हाळ्याचे संबंध, वैयक्तिक संबंध आणि शासनामधील संबंध यांच्यामध्ये कुठेतरी लक्ष्मणरेषा असायला पाहिजे, अशी त्यांची भावना असे आणि त्यांनी ती पाळली होती. मीही, ही लक्ष्मणरेषा कधी पार केली नाही. आमच्या संबंधाविषयीची माहिती जुन्या, माहितगार लोकांना होती. त्यांच्या मित्रांना होती, तसेच त्यांच्या नातेवाईकांना होती. हे जे संबंध निर्माण झाले, या संबंधातून गेल्या चार दशकात मला यशवंतरावांचे निरनिराले पैलू बघण्याची संधी मिळाली. आज मी या विविध पैलूंविषयी बोलणार आहे.
आज यशवंतरावांची ११ वी पुण्यतिथि. गेली दहा वर्षे यशवंतरावांच्या विषयी लिहिण्याचे मनात होते. परंतु योग आला नव्हता. तो आपल्या आमंत्रणाच्या स्वरूपात आला. मनात आले की, कराडला जावयाच्या अगोदर यशवंतरावांच्या आयुष्यातील जो एक अत्यंत महत्वाचा क्षण व काळ होता, त्या विषयी आपण काही लिहावे व त्या दृष्टीतूनच मी ‘वादळ माथा’ हे पुस्तक लिहिले. दोन दिवसांपूर्वी पुण्यात ते प्रसिद्ध झाले आहे. आज मी कराडला, आपल्या सर्वांच्या साक्षीने ‘वादळ माथा’ यशवंतरावांच्या स्मृतिस अर्पण करीत आहे.
यशवंतरावांच्या आयुष्यातील वादली काळ सुरू झाला, नोव्हेंबर १९६२ मध्ये. चीनने पूर्व व पिश्चिमेच्या सरहद्दीवर युद्ध सुरू केले. भारतीय सैन्याची सर्वत्र माघार होत होती. दिल्लीचे तख्त हादरून गेले होते. अशा बिकट परिस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतरावांना दिल्लीला भारताचे संरक्षण मंत्री होण्यासाठी पाचारिले. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात, व विशेष म्हणजे कराडात, आनंदाची लाट लोटली. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जात आहे’ या शब्दात यशवंतरावांचे सर्वत्र कौतुक झाले. आपले यशवंतराव दिल्लीला जाताच काहीतरी चमत्कार करतील, ही जनतेची अपेक्षा. आणि तसाच काही चमत्कार झाला. २० नोव्हेंबरला यशवंतराव दिल्लीत दाखल झाले व त्याच रात्री चीनने युद्धबंदी जाहीर केली. असे काही होईल हे कोणाच्या स्वप्नातही नव्हते.
युद्धबंदी तात्पुरती आहे व चीन चार-पाच महिन्यानंतर परत युद्ध सुरू करील असा एक अंदाज होता. त्या युद्धासाठी तयारी, शस्त्रांची जमवाजमव व सैन्याचे मनोधैर्य मजबूत करण्यासाठी यशवंतराव संरक्षण मंत्र्यांच्या गादीवर बसले व जिद्दीने कामास लागले. पण दिल्ली व दिल्लीचे राजकारण म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण नव्हे याची त्यांना प्रचिती आली. त्या राजकारणामुळे यशवंतरावांना कित्येक मनोव्यथा सहन कराव्या लागल्या. त्या बिकट परिस्थितीत त्यांनी सर्व काही सहन केले. ते त्या विषयी कोणाशी बोलले नाही. म्हणून मुद्दाम त्यांच्या ११ व्या पुण्यतिथीला, त्या व्यथा मराठी जनतेसमोर आणाव्यात म्हणून मी ‘वादळ माथा’ लिहिले. ते आता आपल्यासमोर आहे. त्यातून आपणास यशवंतरावांच्या कित्येक पैलूंचे दर्शन होईल. आजच्या प्रसंगी मी काही निवडक पैलंविषयीच बोलणार आहे.