• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९२-२ (9)

दुसरी एक गोष्ट आहे की जी माझ्या दुस-या भाषणाशी जास्त संबंधित आहे व विस्ताराने येणारच आहे, ती अशी की विकासाचं प्रतिमान राबवीत असताना आदर्श कोणाचा? गांधींचा की नेहरूंचा? असा एक प्रश्न यशवंतरावांच्या मनामध्ये पडलेला सतत जाणवतो. बोलताना ते गांधी – नेहरु असा संयुक्त नामोल्लेख वारंवार करतात. गांधी – नेहरुंची पुण्याई, गांधी – नेहरुंचा देश, गांधी – नेहरुंची ध्येयवादिता, गांधी – नेहरूंचा कार्यक्रम, वगैरे वगैरे. म्हणजे जणू काही गांधी व नेहरु हे समानार्थीच आहेत! अशाप्रकारची मांडणी त्यांनी अनेक ठिकाणी केली. खोलात जाऊन विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की यशवंतराव ‘गांधीवादी’ असण्यापेक्षा, ‘नेहरूवादी’ च जास्त होते. मला गांधी अथवा नेहरु याच्यापैकी कोणाचाही अधिक्षेप करायचा नाही. परस्पविरुद्ध अशी ही दोन प्रतिमानं आहेत. विशेषतः ज्या विकासाच्या संकल्पनेविषयी आपण बोललो आहोत, दोन तीन दिवस बोलणार आहोत, त्या संदर्भामध्ये गांधी व नेहरू ही दोन भिन्न प्रतिमानांची नावे आहेत, या दोन्हीपैकी एकाची निवड करण्याची वेळ जेव्हा जेव्हा आली तेव्हा यशवंतरावांनी ‘नेहरू मॉडेल’ ची निवड केलेली आहे आणि हे त्यांच्या अपयशाचं एक मुख्य कारण आहे, असं मी म्हणतो. बेलेस हैजेन नावाचा एक माणूस आहे आणि त्यानं “हू आफ्टर नेहरू” या नावाचा ग्रंथ लिहिला. ‘हू आफ्टर नेहरु’ हे लिहिणारा हैजेन हा यशवंतरावांना पूर्णपणे अनुकूल असलेला लेखक आहे. किंबहुना त्याने ज्या ८-१० व्यक्तींची नेहरुंचा संभाव्य वारसदार म्हणून एकेका प्रकरणामधून ऊहापोह केलेला आहे किंवा जो तपशील सांगितला आहे त्यात सर्वात जास्त अनुकूल अभिप्राय यशवंतरावांबद्दल आहे त्यांच्या मते यशवंतरावच नेहरुंच्या पश्चात या देशाची धुरा समर्थपणे सांभाळू शकतील. कारण त्यांच्या ठिकाणी जी कर्तबगारी आहे, जी परिपूर्णता, जी परिबद्धता आहे, जी कुवत आहे, जी लोकप्रियता आहे ती अन्य कोणत्याच नेत्यापाशी नाही. हे त्याने फार पूर्वीच नेहरुंच्या निधनाच्या आधीच सांगितले होते. मी हे यासाठी सांगतो आहे की हा लेखक पूर्ण संशोधनान्ती लिहिणारा असून यशवंतरावांचा तो चाहता आहे. आपल्या यशवंतरावांविषयीच्या विवेचनात आधी सगळ्या गोष्टी अनुकूल नोंदविल्यानंतर हैजेन असे म्हणतो की यशवंतराव म्हणजे “स्वतःला गांधीवादी न म्हणवून घेणारा पहिला भारतीय नेता मला भेटलेला आहे.”

यशवंतराव खादी वापरत असत. परंतु खादीचं संपूर्ण तत्वज्ञान यशवंतरावांनी मान्य केलं होतं असं नाही. विरक्तीपूर्ण जीवनाचं फार कौतुक त्यांनी कधीच केलेलं नाही. त्यांना सुखावस्तुपणा आवडायचा. अधूनमधून गांधींचे उल्लेख त्यांनी केलेले असले तरी गांधींच्या विचारप्रमाणीमध्ये या समाजाच्या मूलभूत समस्यांचे निराकरण होऊ शकेल असा विश्वास यशवंतरावांचा नव्हता. जे गांधीवादी विकास-प्रतिमान आहे, त्या मार्गाने जाऊन या समाजातल्या तळागाळातल्यांचे प्रश्न मिटू शकतील किंवा या समाजाच्या मूलभूत समस्यांचे निराकरण होऊ शकेल यावर यशवंतरावांचा विश्वाम नव्हता आणि त्यामुळे देखील कदाचित असेल की, गांधीप्रणीत मार्गापेक्षा नेहरुंच्या समाजवादाचं आकर्षण यशवंतराव चव्हाणांना कायम वाटत गेलं आहे. आणि कधी कधी तर त्यांची ही नेहरुनिष्ठा त्यांच्यातल्या जमाजवादावरसुद्धा मात करताना आपल्याला दिसते. एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळात, आपण नेहरुंना महाराष्ट्रापेक्षा मोठं मानतो असं यशवंतराव स्पष्टच म्हणाले होते आणि त्याबद्दल त्यांच्यावर बरीच टीका झाली होती हे आपल्याला माहीत असेलच. नेहरुनिष्ठा सुद्धा कशासाठी तर सबंध काँग्रेस पक्षाच्या एकात्मतेचं प्रतिक म्हणून नेहरू! त्यामुळे नेहरू जे म्हणतील किंवा नेहरू जे करतील त्याला समाजवाद म्हणावयाचं अशाप्रकारची तडजोड यशवंतरावांनी नंतरच्या त्यांच्या काळात केली. तळपातळीवर त्याचे फार भीषण परिणाम झाले आहेत आणि हे अपयश यशवंतरावांचेच नाही तर हे अपयश नेहरूंच्या विकास प्रतिमानाचेच अपयश आहे. त्यामुळे यशवंतरावांना दोष देणं हा येथे हेतू नाही. पण त्याबरोबर हे स्पष्ट सांगायलाच हवे की बालपणीच्या संस्कारांतून मूळ धरलेली आणि पुढे जीवनाच्या प्रत्यक्ष अनुऊभवातून साकार झालेली जी विकास संकल्पना यशवंतरावांना लाभली होती ती प्रत्यक्षात राबविली गेली नाही, किंवा ती प्रत्यक्ष राबवली जात असताना त्यात विकृती आल्या. सामान्य माणसाला मध्यवर्ती ठेवून विकासयोजना राबवण्याऐवजी त्याला गृहीत धरुनच सारं काही केलं गेलं. त्यामुळे ते त्याच्या हिताचं होऊच शकलं नाही. सबंध विकास कल्पनेची २०-२५ वर्षे उलटून गेल्यानंतर आपण हे पाहतोय की, तिची जी फलश्रुती झाली ती अपेक्षित फलश्रुती नाही. आणि म्हणूनच आपण इथे एका टप्प्यावर येतो, जेथे हा प्रश्न उभा राहतो की नेहरु-चव्हाण यांच्या विकासचं हे प्रतिमान खरोखरच आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली जी उद्दिष्टं आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने उपयोगी पडणार आहे काय? उद्योगधंदे केवळ खेड्यामध्ये काढल्याने खेड्याचा विकास होऊ शकतो का? आज अनेक सिडको, एम. आय. डी. सी अमुक तमुक सगळीकडे झालेले आहेत आणि तिथे एका ठराविक पद्धतीचे कारखाने निघाले आहेत. अशा पद्धतीचे कारखाने गावोगाव काढताना स्थानिक साधनसामग्रीचा स्थानिक लोकांच्या गरजांच्या सहभागाचा काहीही विचार केला गेलेला नाही. अशाप्रकारचे हे ठोकळेबाज औद्योगीकरण आणि असा विकास हा देशाच्या लोकशाहीचा स्थिर करण्याच्या दृष्टीने या देशाच्या लोकशाहीला बळकट पाया प्रदान करण्याच्या दृष्टीने कितपत उपयोगी पडणार आहे? असा एक लाखमोलाचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. आजच्या व्याख्यानाच्या परिमित कक्षेमध्ये यशवंतरावांची विकासकल्पना, तिची फलश्रुती व तिच्या अपयशाची कारणमीमांसा एवढ्या तीनच गोष्टींचा विचार मी आपल्यासमोर मांडला आहे. शेवटी जो लाखमोलाचा प्रश्न मी उपस्थित केला आहे, उद्याच्या माझ्या भाषणात त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विकासाचा जो नमुना आपण स्वीकारला आहे तो किती विनाशकारी आहे यावर मी उद्या बोलणार आहे आणि पर्यायी विकासाचा नमुना कसा असू शकतो याची मांडणी परवाच्या भाषणात करीन. आज मी जे बोललो ते आपण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी आजच्यापुरता आपला आभारी आहे. उद्या आपण पुढे बोलू या.