• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९९२-२ (10)

आपल्या विकासाची दिशा आणि लोकशाहीचे भवितव्य
१३ मार्च १९९२
‘विकासाचा विनाशकारी नमुना’
- डॉ. भा. ल. भोळे
नागपूर विद्यापीठ, नागपूर

अध्यक्ष महाराज आणि मित्रहो, आपला देश प्रगतीच्या मार्गावर जायचा असेल तर आपल्याला पाश्चात्त्य विज्ञान तंत्रज्ञान यांचा अवलंब करुन आधुनिकीकरणाच्या वाटेने गेले पाहिजे अशी पंडित जवाहरलाल नेहरुंची धारणा होती. नेहरु पश्चिमी संस्कारात वाढले होते आणि त्यामुळे त्यांच्या मनात अशी पक्की समजूत होती की, विज्ञान आणि तंत्रज्ञान हा मानवी मुक्तीचा मूलमंत्र आहे. विज्ञान व तंत्रान यामधून समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडून येऊ शकते. समाजाचे मन्वंतर घडून येऊ शकते. एखाद्या राष्ट्राला जर पुढे जायचे असेल तर विज्ञान – तंत्रज्ञानाखेरीज दुसरा तरणोपाय नाही. यशवंतरावांचाही या आशावादावर स्वाभाविकच विश्वास होता, किंबहुना त्यावेळच्या संपूर्ण शिक्षित पिढीचा होता. त्यांना असं वाटत होतं की आपला देश मागास आहे याचं एक महत्वाचं कारण इते अपुरा तंत्रविकास झाला हे आहे. आपली शेती काय परवडत नाही? कारण शेतीचं तंत्र हे मागासलेलं आहे, आपण जुन्या काळापासून ज्या लाकडी – लोखंडी नांगराने नांगरत आलो आहोत त्याच पद्धतीने आजही नांगरतो, त्याच पद्धतीनं पेरतो, इतरत्रही समाज जीवनात तीच सगळी पारंपारिक रचना सांभाळतो आणि यामध्ये काहीतरी आगळवेगळं केल्याशिवाय आपला विकास होणे नाही. आधुनिकीकरण करावयाचे म्हणजे यंत्रे आणली पाहिजेत. जपानमध्ये झालेले शेतीचे प्रयोग, तिकडं युरोपात झालेले प्रयोग, त्या प्रयोगांचं इथे आपण प्रशिक्षण शेतक-यांना दिलं पाहिजे, त्यांच्या हाती यंत्रसामग्री दिली पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या केल्या पाहिजते. आणि शेतीचे आधुनिकीकरण केलं पाहिजे. शेती परवडेनाशी झाली आहे, शेतीवर जास्त भार पडलेला आहे, आणि हा भार हलका केल्याखेरीज आपल्याला स्वयंपूर्ण समाज निर्माण करताच येणार नाही. आपल्या देशाची जी दारिद्र्याची समस्या, मागासलेपणाची समस्या आहे ती जर दूर करायची असेल तर यांत्रिकीकरण, औद्योगीकरण, शहरीकरण याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.

कृषी-औद्योगिक समाजाचा जो प्रयोग होता, ज्याच्या पाठीशी यशवंतरावांनी शासनाची शक्ती उभी केली असं मी काल म्हणालो, तोसुद्धा या प्रकारच्या धारणेतून निर्माण झालेला होता की आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. नेहरुंच्या तर कित्येक भाषणांमधून हे व्यक्त झाले आहे की विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय आपल्याला पर्याय नाही. रशियाचा नियोजित विकासाचा नमुना नेहरुंच्या समोर होता आणि रशियाप्रमाणे आपल्यालाही करता आलं पाहिजे, आपणसुद्धा नियोजनाचा मार्ग अवलंबायला पाहिजे, आपणसुद्धा विकासमग्न नोकरशाहीची यंत्रणा अवलंबली पाहिजे. आपणसुद्धा पंचवार्षिक योजना राबवल्या पाहिजेत, याप्रकारच्या महत्वाकांक्षा नेहरुंनी रशियापासून उचलल्या होत्या. यामागे एक गृहीत असे होते, ही राज्यसंस्था हे सामाजिक परिवर्तनाचं एक केंद्र होऊ शकतं, एक साधन होऊ शकतं. राज्यसंस्थेच्या पुढाकाराने समाजाचा चेहरामोहरा बदलला जाऊ शकतो. समाजामध्ये एक आर्थिक स्थित्यंतर आणलं जाऊ शकतं. आर्थिक प्रगती करण्याचं साधन राज्यसंस्था होऊ शकते. राज्यसंस्था ही तटस्थ असते, राज्यसंस्थेचे स्वतःचे असे काही हितसंबंध नसतात. राज्यसंस्था ही संपूर्ण समाजाच्या विकासाची जबाबदारी पार पाडू शकते. संपूर्ण समाजाच्या हे मी मुद्दाम जोर देऊन म्हणतोय कारण राज्यसंस्थेला विकासप्रक्रियेत भावात्मक भूमिका देणारी असे गृहीत धरीत असते की राज्यसंस्था पक्षपात करीत नसते. तिला समाजातील सगळीच माणसे सारखीच असतात. राज्यसंस्था ही परिवर्तनाच्या कामांमध्ये शासनाच्या योजनांच्याद्वारे नवा समाज घडवून आणू शकते. कृषि औद्योगिक समाजाच्या उभारणीचा प्रयत्न माननीय यशवंतरावांनी महाराष्ट्रात केला त्यामागची भूमिका हीच की जो कृषक समाज आहे, हा जो कृषिप्रधान समाज आहे याला औद्योगिककरणाच्या दिशेने न्यायचं आणि औद्योगिक समाजाच्या जवळ हा जाईल असा प्रयत्न करायचा.

आता काय असतंय की कुठलेही तंत्रज्ञान जे आहे त्याचे काही सामाजिक – आर्थिक – सांस्कृतिक परिणाम होतच असतात. तंत्रज्ञान तटस्थ असतं असं आपण कधी – कधी म्हणतो. वाचतो, पण ते खरं नसतं. तंत्रज्ञान शस्त्राप्रमाणे तटस्थ असतं असं कधी-कधी भासवलं जातं. असं की त्याची इष्टनिष्टता ते वापरण्यावरती अवलंबून आहे. तंत्रज्ञान हे मुळात चांगले किंवा वीईट नसतं. पण वस्तुस्थिती अशी आहे की तंत्रज्ञान कधीच तटस्थ नसं, तंत्रज्ञान हे मूल्यमुक्तसुद्धा नसतं. तंत्रज्ञान काही मूल्यांची रुजवात करतं. ती मूल्यं आपल्याला हवीत की नकोत हे ठरवायला हवं. आपण जी मूल्यं प्रमाण मानतो त्या मूल्यांची रुजवात या तंत्रज्ञानातून होते की नाही हे आपल्याला ठरवायला लागेल. मूल्यांशी तंत्रज्ञानाचा – विज्ञानाची संबंध असतो. आताच नव्हे पूर्वीपासून तो आहे आणि आधुनिक समाजातच नव्हे तर पारंपारिक समाजातही आहे, थेट आदिम समाजातसुद्धा आहे. अगदी दोन ठळक उदाहरणे मानसशास्त्रामध्ये सांगितली जातात.