व्याख्यानमाला-१९८७-२ (23)

इतिहासाचा वापर
विदेशी इतिहासकारांपैकी इ. एच. कार, टॉयनबी आणि विल ड्युरांट हा जसा माझ्या आदराचा विषय आहे तसाच मराठी इतिहासकारांपैकी प्रसिध्द इतिहास संशोधक त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे सारे जीवन, त्यांची या क्षेत्रातील तपश्चर्या आणि त्यांनी केलेले इतिहास लेखन हा सुध्दा माझ्या आदराचा विषय आहे. त्यांचे स्मरण केल्याशिवाय या विषयावर बोलताच येणार नाही.
 
आपण इतिहास लेखन कसे होते ? या कूट प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी या इतिहासाच्या वापरासंबंधी शेजवलकर काय म्हणतात ते बघू. इ. स. १९४० साली शेजवलकर म्हणाले होते “ महाराष्ट्राला एक जबरदस्त भूत, एक फार मोठा समंध बाधत आहे. त्याचे नाव इतिहास ” शेंजवलकर इतिहासाबद्दल जेव्हा असे म्हणतात त्यावेळी त्यांच्यासमोर महाराष्ट्राची आणि जागतिक तत्कालीन परिस्थिती होती. ‘ इतिहास माणसाला शहाणा करतो ’ हा बेकनचा विचार होता. परंतु त्या काळातले वास्तवही भीषण होते. आपआपल्या इतिहासाचा वारसा सांगणारांनी आणि त्याचा अवाजवी अभिमान धरणारांनी जी कृत्ये आरंभिली होती त्यामुळे बेकनचा हा विचार व्यवहारात उलट झालेला दिसत होता. इतिहासाने माणसाला शहाणे बनविण्याऐवजी, त्याला शहाणपण देण्याऐवजी तो माणसांना पागल बनवितांना शेजवलकर प्रत्यक्ष बघत होते. जगातील अनेक आपत्ती आणि अनर्थ इतिहासातून निर्माण होतांना दिसत होते. यहुद्यांना इतिहास नसता तर त्यांची बिटंबना, शतकानुशतके त्यांचा होत असलेला छळ थांबला असता. हिटलर सारख्या मानवतेला काळीमा फासणा-या महाक्रूरर्म्याच्या उद्याचे एक कारण खुडले गेले असते. त्याच प्रमाणे महाराषेट्राला इतिहास नसता तर म.गांधीजींच्या विरूध्द जी अढी महाराष्ट्रात दिसली आणि आजही दिसते ती मुळातच धरली गेली नसती. त्यांच्या विरूध्द जी धुळवड उडाली ती उडाली नसती असे शेजवलकरांचे मत होते. शेजवलकरांनी आपले हे मत गांधीजींच्या एका कडव्या हिन्दुत्ववादी राष्ट्रवाद्याकडून झालेल्या खुनापूर्वी आठ वर्षे अगोदर नोंदवून ठेवलेले आहे यात त्यांचे द्रष्टेपण दिसते. शेजवलकर आपल्या व्यासंगाने आणि संशोधनाने मराठीतील इतिहासाचे दालन समृध्द करणारे एक इतिहास संशोधक आहेत. संपूर्ण आयुष्यत दारिद्र्याशी संघर्ष करून त्यानी आपले संशोधन केले परंतु असा हा संशोधक जेव्हा “ सर्व जगाचा, सर्व लोकांचा इतिहास एकसमयावच्छेदेकरून भस्मसात  होईल तर जगातील सर्व आपत्ती मुळातच नष्ट होतील. युध्दाची आद्य करणे दबून जातील. समाज सुधारकांचा मार्ग, विश्व-कुटुंब-वाद्यांचा मार्ग, नवयुग सुरू करू पाहणारांचा मार्ग निष्कंटक खुला होईल ”  असे म्हणतात आणि आपल्या आयु्ष्यातील प्रत्येक क्षण इतिहास संशोधनांत आणि लेखनात वेचतात त्यावेळी सामान्य माणसाला भांबावल्यासारखे होते. अशा प्रकारे इतिहास जाळून टाकणे खरोखरच कोणाला शक्य आहे काय ? परंतु ते शक्य झाले तरी ते योग्य आहे काय ? हा खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. खुद्द शेजवलकरांनाही ते मान्य नव्हते याची साक्षत्यांच्या ऐतिहासिक संशोधनाचा आयुष्यभर चाललेला खटाटोपच आपल्याला देतो.

जगाचा इतिहास भस्मसात झाला तर विश्व कुटुंब स्थापन होईल हे निर्भीडपणे सांगणारे शेजवलकर इतिहासातील ‘निजाम-पेशवे’ संबंध कसे होते, ‘ पानीपत ’ वर काय झाले हे सांगतात आणि ‘ छ. शिवाजीच्या संकल्पित चरित्रा ’ साठी एवढी प्रचंड ऐतिहासिक साधन सामग्री जमवून त्याला एक दीर्घ प्रस्तावना लिहितात. सारा खटाटोप ते मग कशासाठी करतात ? या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे शेजवलकर इतिहासाकडे कोणत्या दृष्टीने पहात होते याची चर्चा करणे होय. परंतु ही चर्चा करताना शेजवलकर आणि त्यांचे समकालीन इतिहासकार कोणत्या सामाजिक वातावरणात इतिहास लिहीत होते याचाही विचार करावा लागेल.