व्याख्यान तिसरे - दिनांक १४ मार्च १९८६
विषय - "दिल्ली दरबारातील यशापयशाची मीमांसा"
व्याख्याते - मा. श्री. द्वा. भ. कर्णिक
आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे, “दिल्ली दरबारातील यशापयशाची चिकित्सा.” दिल्ली दरबार हा शब्दप्रयोग मी जाणूनबुजून केलेला आहे. कारण दिल्ली ही अनेक साम्राज्यांची राजधानी झालेली आहे. मोगल साम्राज्याची, ब्रिटिशांची आणि आता भारतीय लोकशाहीची. ब्रिटिशांनी आपली सलतनत कलकत्त्याहून हलविली आणि ते दिल्लीला येऊन थडकले याचं कारण असं आहे की दिल्लीला फार मोठा इतिहास आहे आणि प्रत्येक राजवटीला पुढे घडवावयाचाही होता. तो दिल्लीमध्येच घडेल अशी सर्वसाधारण आकांक्षा होती. खरं सांगावयाचं तर ती वैभवशाली नगरी आहे. साम्राज्याची राजधानी होण्याच्या लायकीचे ते वैभव आहे. आपल्यापैकी ज्यांनी दिवाण ई आम्, दिवाण ई खास पाहिला असेल त्यांना तेथे एक वचन कोरलेले आढळून आले असेल. फारसी भाषेतील तें वचन आहे ते असे :
“अगर बर रूहे जमीनस्त । हमीनस्तो, हमीनस्तो, हमीनस्त”
त्याचं भाषांतर असं आहे की, “या पृथ्वीतलावर जर कोठे नंदनवन असेल, तर ते इथे आहे, इथे आहे. इथेच आहे.” दिल्लीचं जे महात्म्य आणि वैभव आहे ते या वचनामध्ये अतिशय चांगल्या रीतीने समाविष्ट झालेलं आपल्याला आढळून येईल. दिल्लीच्या दरबाराचं असं वैशिष्ट्य सांगता येईल की तेथे जाणा-या प्रत्येक व्यक्तीला, पुढा-याला हे महात्म्य जाणून आपली पावलं टाकली पाहिजेत. म्हणजे तिथे जे काही प्रकार घडतील, जी जी संकटे येतील त्यांच्याशी सामना देऊनच आपलं राजकारण केलं पाहिजे. दिल्ली दरबार म्हटला, त्यातील राजवटींची आठवण केली की आपल्या डोळ्यासमोर कट, कारस्थाने वगैरे अशा गोष्टी येतातच. सुदैवाने भारतीय लोकशाहीची जी राजवट आहे तीत कट, कारस्थाने होत नाहीत. पण राजकीय डावपेच मात्र खेळले जातात. हे जे मी सांगतो आहे त्याच्या पाठीमागची माझी भूमिका अशी आहे की यशवंतराव चव्हाण दिल्लीमध्ये गेले तेव्हां त्यांना पुरेपूर कल्पना होती की इथे राजकीय डावपेच खेळले जातात आणि त्या डावपेचांना तोंड देऊनच आपल्याला आपलं कर्तव्य करावे लागेल. अर्थात आपल्या लोकशाहीमध्ये जे डावपेच होतात ते इनोसंट अशाच प्रकारचे असतात. ते डावपेच मात्र खरे.
पहिल्या प्रथमच मी तुम्हाला सांगतो, आपलं स्वातंत्र्य आलं, आपली राज्यघटना तयार झाली. आणि ज्यावेळी राष्ट्रपतींची निवड करावयाची वेळ आली तेव्हा पंडितजींचं असं मत होतं की हे सन्मानपद राजाजींना देण्यात यावं. अत्यंत हुशार आणि कर्तबगार अशी ती व्यक्ती होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिले गव्हर्नर जनरलही ते झाले होते. पण राजाजींचा इतिहास जरा निराळा होता. ते पाकिस्तानचे पुरस्कर्ते म्हणून बदनाम झालेले होते. काँग्रेसमधील पुढा-यांना म्हणजे स्वतः वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांना राजाजींना हा सन्मान द्यावा असे वाटत नव्हते. पहिला वहिला सन्मान होता तो. म्हणून त्यांनी पंडितजींना सांगितलं की या पदावर बसावयाला योग्य व्यक्ती असेल तर बाबू राजेंद्र प्रसाद हे होत. पंडितजी हे लोकशाहीवादी आणि लोकशाहीचे कट्टे पुरस्कर्ते. त्यांनी हे मत मान्य केलं. आणि राजेंद्रप्रसाद पहिले राष्ट्रपती झाले.