• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९८६-१८

ही कल्पना त्यांना पंडितजींच्या दृष्टिकोणातून, गांधीजींच्या ध्येयधोरणातून आली आणि त्यांनी मनाशी ठाम निर्णय केला की काँग्रेस या दोन नेत्यांची आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकणं हा आपला धर्म आहे. त्या भावनेनेच त्यांनी आपली पावले टाकली. यशवंतरावांचे भावी काळात स्थान कोणते राहिले असते याचा आपण आज विचार करू शकत नाही, परंतु एवढं मात्र खरं की यशवंतराव हे विचारी नेते म्हणून या देशामध्ये कायमचे आठवले जातील. त्यांनी वेळोवेळी विचार दिला. समाजपरिवर्तनाची जी कार्ये आहेत त्या कार्यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळवून दिला. काँग्रेसमधील भिन्न भिन्न गटांना एकत्र ठेवण्यात यशवंतरावांचंच कौशल्य उपयोगी पडलेलं दिसून येईल. त्यांनी वेळोवेळीं तडजोडी केल्या. कॉन्सेन्सस निर्माण करण्यासाठी काही वेळी माघारी ही घेतली. पण ही तडजोड त्यांनी कधीही तत्वावर केली नाही. त्यांचे ध्येयधोरण एकच होते आणि ते म्हणजे सर्वांना शक्यतो बरोबर घेऊन आणि निरनिराळ्या घटक विभागांना विश्वास देऊन राज्यकारभार करणं हे होय. त्यांच्या कारकीर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोठलाही संघर्ष निर्माण झाला नाही. त्यांनी उभ्या महाराष्ट्रावर जशी छाप टाकली तशीच भारतावरही आपल्या व्यक्तित्वाची, विचारनिष्ठेची छाप टाकली.

कधीमधी मात्र विचार येतो की १९६२ साली केंद्रस्थानी जाण्याऐवजी ते महाराष्ट्रातच राहिले असते तर? तर कदाचित् महाराष्ट्राची जडणघडण अधिक कौशल्याने झाली असती. यशवंतरावांचं मनही महाराष्ट्राभोवतीच घोटाळत होतं. त्यांना महाराष्ट्राला काही नवीन दिशा दाखवावयाची होती. त्यांना दलितांच्या दृष्टीने विचार करून आंबेडकरांचे अपुरे राहिलेले कार्य पुरे करावयाचे होते. त्यांना महाराष्ट्राचा सांस्कृतिक विकास घडवून आणावयाचा होता. पण त्याहि पलिकडे महाराष्ट्रात खंबीरपणे पाय रोवून त्यांना काँग्रेसची एकता राखावयाची होती. बंगलोरच्या अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये दुफळी पडत असलेली पाहून त्यांनी एकजुटीचा एक ठराव काँग्रेसपुढे मांडला होता. त्या ठरावाचा गौरव करताना के. के. शहांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या शिबिरात असे उद्गार काढले होते की यशवंतरावांचा ठराव हा गीता, बायबल आणि कुराण यांच्याइतका पवित्र आहे. यशवंतरावांना साध्य करावयाची होती ती काँग्रेसची एकता. त्यांचा ध्यास होता तो काँग्रेसचा प्रवाह अखंडित ठेवण्याचा. हा प्रवाह जितका शुद्ध ठेवता येईल तितका ठेवावा हीच त्यांची आकांक्षा होती. उभ्या जन्मभर त्यांनी काँग्रेसची सेवा केली. ती सेवा त्यांनी निष्ठेने केली आणि त्या निष्ठेच्या जाणीवेनेच ते स्वगृही परत गेले. यशवंतरावांच्या निष्ठावंत जीवनाचा परिपाक आणि प्रतीक म्हणूनच मी या घटनेकडे पाहतो.